रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ. दापोलीपासून सु. ३० किमी., तर दापोली-खेड रस्त्यावर वाकवली फाट्यापासून १९ किमी. अंतरावर हे ठिकाण आहे. पन्हाळे गावाच्या दक्षिणेकडील डोंगर-माथ्यावर ‘पन्हाळे’ नावाचा एक दुर्ग आहे. जवळच झोलाई देवी या ग्रामदेवतेचे मंदिर आहे. शिलाहारांच्या बाराव्या शतकातील दोन ताम्रपटांत या ठिकाणाला ‘प्रणालक’ म्हणून संबोधित केल्याचे दिसते. सतराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाही काळात येथे नियुक्त केलेल्या एका काजीमुळे पन्हाळे नावाबरोबर ‘काजी’ हा शब्द जोडला गेला. अत्यंत निसर्गरम्य अशा सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी कोटजाई व धाकटी नदीच्या खोऱ्यात हे स्थळ असून साधारणतः इ. स. तिसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत समृद्ध अशा इतिहासाची साक्ष असणाऱ्या एकूण २९ लेणी येथे खोदण्यात आल्या आहेत. यांपैकी २८ लेणी कोटजाईच्या उजव्या किनाऱ्यावर उत्तराभिमुख असून २९ वे लेणे बागवाडीजवळ ‘गौर लेणे’ या नावाने प्रसिद्ध आहे. हीनयान (थेरवाद), वज्रयान, शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायाचा ठसा या लेण्यांवर पडलेला दिसून येतो.

पन्हाळे-काजी येथील लेणीसमूह.

पन्हाळे-काजी येथील लेण्या सर्वप्रथम दाभोळच्या अण्णासाहेब शिरगावकर यांनी १९७० साली प्रकाशात आणल्या. परंतु त्यापूर्वी जेम्स बर्जेस यांनी या ठिकाणाचा उल्लेख करून येथे काही कोरीव बाक असल्याचे एका वृतांतात नमूद करून ठेवले होते (१८७०). मुळात हा लेणीसमूह काही पूर्ण व काही अर्धी अधिक नदीच्या गाळाने व डोंगरावरून पडलेल्या मलब्यामुळे भरून गेला होता. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याने या लेण्यांतील बहुतांश गाळ व इतर राडा-रोडा काढण्याचे काम केले. त्यानंतर म. न. देशपांडे यांनी या लेण्यांचे सखोल संशोधन केले. शोभना गोखले यांनी प्रकाशात आणलेल्या ११३९ सालच्या विक्रमादित्यच्या ताम्रपटात या स्थानाचा उल्लेख आढळून येतो. वा. वि. मिराशी यांनी कॉर्पस इन्स्क्रिप्शन इंडिकॅरमच्या सहाव्या भागात हा ताम्रपट सांगोपांग चर्चेसह संपादित केला. या लेखावरून असे दिसून येते की, शिलाहार राजा प्रथम अपरादित्य (११२७–११४८) याने कदंबांना कोकणातून हुसकावून लावल्यावर आपल्या विक्रमादित्य या प्रिय पुत्रास प्रणालक या राजधानीच्या शहरी दक्षिण कोकणचा अधिपती बनवले.

इ. स. सु. तिसऱ्या शतकात हीनयान पंथाच्या भिक्षूंसाठी पन्हाळे-काजी येथे लेणी तयार केली गेली. या लेणी-समूहातील लेणी क्र. ४, ५, ६, ७, ८ व ९ मूलतः सु. तिसऱ्या शतकात खोदल्या गेल्या. लेणी क्र. २, १०, ११, १२, १३ व १८ या साधारणतः चौथ्या-पाचव्या शतकात खोदल्या गेल्या. त्यानंतर साधारणतः दहाव्या शतकात वरील सर्व लेण्यांमध्ये वज्रयानी पंथीयांनी बरेचसे फेरफार केले.

वज्रयानी पंथीयांनी दहाव्या शतकात लेणी क्र. १, ३, १४, १५, १६, १७, १९, २१ व २७ या नव्याने खोदल्या असल्याचे दिसते. पुढे तेराव्या शतकात यातील लेणी क्र. १४, १५, १७, १९ व २१ ब्राह्मण (हिंदू) धर्माच्या प्रभावाखाली आल्या. यातील लेणे क्र. १४ नाथ संप्रदायाच्या ताब्यात आले. ब्राह्मण धर्मीयांसाठी बाराव्या-तेराव्या शतकात लेणी क्र. २०, २२, २३, २४, २५, २६ व २८ या नव्याने खोदल्याचे दिसून येते. यांपैकी लेणे क्र. २२ नंतर चौदाव्या शतकात नाथ संप्रदायाच्या प्रभावाखाली आले, तर लेणे क्र. २९ नाथ-संप्रदायासाठी चौदाव्या शतकात खोदण्यात आले.

लेणी क्र. ४, ५ व ६ मध्ये स्तूप स्थापन केल्याचे आढळून येते. लेणे क्र. ५ मधील पाठीमागच्या भिंतीत अर्धोत्कीर्ण स्तूप आहे. लेणी क्र. ७, ८ व ९ ही मुळात भिक्षुगृहे (विहार) होती. यांतील काही लेण्यांसमोर नंतर वृत्तचितीच्या आकारातील स्तूपही स्थापिले गेले.

महायान पंथीयांसाठी काही बदल केलेले दिसत नाहीत. परंतु आठव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत वज्रयान पंथीयांचे वास्तव्य येथे असावे, असे दिसते. याच काळात विशेषतः दहाव्या शतकात येथील लेण्यांत गुप्त तांत्रिक पुजाविधीस उपयुक्त असे फेरफार करून नवीन तांत्रिक देवतांच्या मूर्तींची स्थापना केल्याचे दिसून येते. मुळातील भिक्षुगृहांच्या पाठीमागच्या भिंतीत कोनाडा व गर्भगृह खोदून त्यामध्ये तांत्रिक मूर्तींची स्थापना केली होती. लेणीत दिसणाऱ्या अष्टकोनी स्तंभात बदल करण्यात आले व दर्शनी स्तंभांच्या स्तंभशीर्षात नागबंध जोडले गेले. मंडपात प्रवेश करण्यासाठी असलेल्या द्वारांवर अलंकृत ललाटबिंब कोरण्यात आली. काही वाढीव खोल्याही नव्याने खोदण्यात आल्या. ईशान्य भारतात लोकप्रिय असणाऱ्या अक्षोभ्य, सिद्धैकवीर या तांत्रिक देवतांची पूजा पन्हाळे-काजी येथे केली जाऊ लागली.

लेणे क्र. १० वज्रयान पंथाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे आहे. येथून मिळालेल्या ‘महाचंडरोषण’ या वज्रयानी देवतेच्या दुर्मीळ मूर्तीमुळे येथील भिक्षूंचा संबंध बंगाल व ओडिशा येथील तांत्रिक केंद्रांशी आला असावा, असे दिसते.

लेणे क्र. १४ मध्ये नाथ संप्रदायाशी संबंधित शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. या लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस मिळून एकूण १२ शिल्पे आहेत. यातील चौरंगीनाथ तसेच कानिफनाथ व बहुडी योगिनी यांची शिल्पे लगेच ओळखू येतात. गर्भगृहातील शिल्पांपैकी आदिनाथ व मत्स्येंद्रनाथांची शिल्पे ओळखायला सोपी आहेत. या लेण्यात गोरक्षनाथांचे एक खंडित व सुटे शिल्पही मिळालेले आहे. लेणे क्र. १५ मध्ये गणपतीची सुटी मूर्ती स्थापून हे लेणे गाणपत्य संप्रदायाशी जोडले गेले. लेणे क्र. १६ च्या समोर शिलाहारकालीन छोटेसे देवालय असल्याचे दिसते.

लेणी क्र. १८ ते २३ हा लेण्यांचा समूह आहे. यातील १८ वे लेणे वज्रयान पंथी आहे. लेणी क्र. १९ ते २३ मध्ये साधारणतः बाराव्या शतकात भरपूर कामे झाली. अकराव्या शतकात शिलाहार शैलीचे एकाश्म देवालय म्हणून १९ क्रमांकाचे लेणे साकारले गेले. या मंदिराच्या छतावर रामायण, महाभारत व कृष्ण-लीलेशी संबंधित शिल्पपट कोरण्यात आले. लेणे क्र. २१ मध्ये असलेल्या गणपतीच्या शिल्पावरून या लेण्याला ‘गणेश लेणे’ म्हणून ओळखले जाते. लेणे क्र. २२ चौदाव्या शतकात नाथ-योग्यांनी वापरायला सुरुवात केले. या लेण्याच्या गर्भगृहात पद्मासनात बसलेली नाथ-योग्याची मूर्ती कोरण्यात आली आहे. लेणी क्र. २४ ते २८ समूहातील २४ व्या लेण्यात कोणतीही मूर्ती नाही. २५ क्रमांकाचे लेणे अपूर्ण आहे. लेणी क्र. २६, २७ व २८ आकाराने लहान असून यांत वैशिष्ट्यपूर्ण असे काही नाही.

लेणे क्र. २९ हे मुख्य लेणी समूहापासून साधारणतः दीड किमी. अंतरावर आहे. हे लेणे संपूर्णतः नाथ संप्रदायाशी निगडित असून याची रचना इतर लेण्यांपेक्षा निराळी आहे. येथील मुख्य गर्भगृहातील शिल्पांमध्ये आदिनाथ-मत्स्येंद्र-गिरीजा, त्रिपुरसुंदरी व ८४ सिद्ध, तसेच प्रांगणात समोर लक्ष्मी, गणेश व सरस्वती यांची शिल्पे आहेत.

एकंदरीत पन्हाळे-काजी हे ठिकाण वज्रयान पंथाचे प्रमुख ठाणे होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीनेही याचे अत्यंत महत्त्व आहे. येथील लेणी कला व स्थापत्य या व्यतिरिक्त धार्मिक परंपरेत झालेल्या बदलांच्या अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. पन्हाळे-काजी येथील लेण्यांच्या अभ्यासातून हीनयान बौद्ध पंथाचे तांत्रिक वज्रयान पंथात कसे रूपांतरण झाले व पुढे हे ठिकाण शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायापर्यंत कसे विकसित होत गेले, हेही समजते.

संदर्भ :

  • देशपांडे, मधुसूदन नरहर, ‘ठाणाळा बौद्धलेणी – पन्हाळे काजी, वज्रयान केंद्र शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायावर नवा प्रकाश’, विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर, १९८१.
  • Deshpande, M. N., ‘The Caves of Panhāle-Kājī (Ancient Pranālaka)ʼ, Memoirs of Archaeological Survey of India, 84, New Delhi, 1986.
  • Sarde, Vijay, ‘Recently Deciphered Iconographic Representations of Kanifnath and Bahudi’, Historicity Research Journal, Solapur, Vol. 5 (1), September 2018.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : मंजिरी भालेराव