जुन्नर परिसरातील लेण्याद्री व त्याच्या शेजारील टेकडीवरील प्रसिद्ध थेरवाद (हीनयान) पंथीय लेणी-समूह. जुन्नरपासून ५ किमी. उत्तरेस कुकडी नदी ओलांडून या समूहास जाता येते. मध्ययुगीन काळात सध्याच्या गणेश लेणी-समूहातील लेणे क्र. ७ मध्ये गणेशाची स्थापना झाल्याने या संपूर्ण टेकडीलाच ‘लेण्याद्री’ किंवा ‘गणेश टेकडी’ (गणेश पहाड) या नावाने ओळखले जाऊ लागले. यापूर्वी या टेकडीस ‘सुलेमान’ टेकडी म्हणण्याचा प्रघात होता. या लेणी-समूहाच्या पूर्वेकडे काही लेण्यांचा समूह असून तो ‘गणेश लेणीच्या पूर्वेकडील समूह’ म्हणून ओळखला जातो.

लेणे क्र. ६ व ७, गणेश लेणी, जुन्नर.

गणेश लेणी-समूह : या लेणी-समूहात एकूण ३० लेणी असून, त्यांत दोन चैत्यगृहे व बाकीचे विहार व साध्या खोल्या आहेत. या लेण्यांत एकूण सहा ब्राह्मी शिलालेखही कोरण्यात आले आहेत. सातवाहनकाळात गणेश लेण्यांत ‘कपिचित’ नावाचा संघ राहत होता. लेण्यांचा क्रम साधारणतः ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे आहे.

लेणे क्र. १ ते ४ सामान्य प्रतीची असून त्यांस बाहेर ओसरी, आत भिक्षूंच्या निवासासाठी खोल्या व दगडी बाक कोरले आहेत. लेणे क्र. ५ हा एक लहानसाच, पण महत्त्वाचा विहार आहे. यास बाहेर ओसरी असून आत काटकोनी मंडप किंवा सभागृह आहे. तसेच बाजूंच्या व मागील भिंतींत दगडी बाक कोरले आहेत. यास मागील व उजवीकडील भिंतींत एकूण सात खोल्या आहेत. बाहेरील ओसरीच्या डाव्या बाजूस पाण्याची टाकी (पोढी) आहे. या विहारातील शिलालेखात, धान्याच्या व्यापाऱ्यांनी सात दालने असलेले लेणे आणि पाण्याची टाकी दान दिल्याचे म्हटले आहे.

चैत्यगृह, लेणे क्र. ६, गणेश लेणी, जुन्नर.

लेणे क्र. ६ हे चैत्यगृह दक्षिणाभिमुख असून याचा चैत्यगवाक्ष पूर्णपणे बंद आहे. हा लयननिर्माण तंत्रातील बदल निश्चितपणे चैत्यगृहस्थापत्यातील नवा टप्पा सूचित करतो. या लेण्याला ६.३० मी. रुंद, २.०३ मी. खोल आणि ३.७६ मी. उंच असा ओळीने स्तंभ असलेला (Pillar fronted) मुखमंडप (ओसरी) आहे. पायऱ्यांच्या चौकोनी शंक्वाकृती घटकावर कुंभाकार तळखडा, अष्टकोनी स्तंभ, घंटाशीर्ष, आमलकयुक्त पेटीसारखा घटक, पायऱ्यांचा उलटा चौकोनी शंक्वाकृती घटक आणि त्यावर पशुशीर्ष असा या स्तंभांचा घटकक्रम आहे. यात पाठीला पाठ टेकून बसलेले हत्ती (आतील बाजूस सिंह) आहेत. या मुखमंडपातून आपण सभामंडपात जातो. आत याचे विधान चापाकार आहे. सभागृहाचे छत गजपृष्ठाकार असून त्यावर दगडी तुळया (फासळ्या) कोरल्या आहेत. मागच्या बाजूस अखंड दगडात स्तूप कोरला असून खालच्या गोलाकारावर वेदिकापट्टी, त्यावर अंड व हर्मिका कोरलेली आहे. हर्मिकेचा वरील भाग सपाट असून मध्ये लाकडी छतासाठी खोबण कोरलेली आहे. लयन स्थापत्यानुसार हे चैत्यगृह इ. स. दुसऱ्या शतकाच्या पहिल्या दशकात खोदल्याचे सांगितले जाते. या लेण्याच्या आतील बाजूस अर्धस्तंभ व त्याच्या मागे, डावीकडे व उजवीकडे एकूण सोळा स्तंभ आहेत. स्तूपाच्या मागील सहा स्तंभ साधे अष्टकोनी आहेत; तर बाकीचे मुखमंडपातील स्तंभांसारखेच अलंकृत असून वरती पशुशीर्ष आहेत. डावीकडील दुसरा व उजवीकडील चौथा यांत स्त्रीमुखे असलेले ‘स्फिंक्स’ कोरले आहेत. त्यांचे शरीर घोड्यासारखे दिसते. अशाच प्रकारची स्त्रीमुखे असलेले स्फिंक्स पितळखोरे व कार्ले लेण्यांतही आढळून येतात. यवन किंवा ग्रीकांच्या प्रभावामुळे वरील प्रकारचे स्फिंक्स महाराष्ट्रातील लेण्यांत कोरले असावेत, असे सुरेश जाधव यांचे मत आहे. या लेण्यातील शिलालेखात कल्याणच्या हेरणिकचा पुत्र ‘सुलसदत्त’ याने हे चैत्यगृह अर्पण केल्याचे म्हटले आहे.

लेणे क्र. ७ हे जुन्नरमधील लेण्यांत आकाराने सर्वांत मोठा विहार असून यात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्यांचा जिना आहे. विहाराच्या प्रांगणात व डावीकडे पाण्याची टाकी खोदली आहेत, तर दर्शनी भागावर दगडी बाकांवर आधारित सहा स्तंभ आणि दोन्ही बाजूंच्या कडेस अर्धस्तंभ कोरले आहेत. दगडी बाकांस कक्षासने व त्याच्या बाहेरील बाजूस वेदिकापट्टीचे नक्षीकाम केलेले दिसते. स्तंभांवर वरील बाजूस पाठीला पाठ टेकून बसलेले सिंह, हत्ती व बैल कोरले आहेत. विहाराचा सभामंडप १७.३९ मी. खोल, १५.५५ मी. रुंद व ३.३८ मी. उंच असून मंडपात कोठेही खांबांचा आधार नाही. याच्या तिन्ही बाजूंस दगडात कोरलेला अखंड बाक असून बाजूंच्या भिंतींत एकूण २० खोल्या भिक्षूंच्या निवासासाठी कोरल्या आहेत. लेण्यात मध्यभागी गणेशशिल्प असून मंडपाच्या भिंतींवर सतींचे हात कोरले आहेत. गर्भगृहाच्या डावीकडील खोलीत अठराव्या शतकातील हिंदू देव-देवतांची भित्तिचित्रे आहेत.

लेणे क्र. ८ ला समोर ओसरी असून डावीकडे एका दगडी बाकासहित खोली व उजव्या बाजूस चिंचोळा रस्ता आहे. त्याच्या मागील भिंतीत अगदी अरुंद दगडी बाक आहे; याचा उपयोग बौद्ध भिक्षूंनी कदाचित ध्यानस्थ बसण्यासाठी केला असावा. यापुढील लेणी सामान्य आहेत.

लेणे क्र. १४ हे या गटातील दुसरे चैत्यगृह आहे. परंतु याचा आकार गजपृष्ठाकृती नसून काटकोनी आहे. पूर्वी दर्शनी भागावर कलश व अष्टकोनी स्तंभ होते; त्यांचे काही अवशेष छतावर शिल्लक आहेत. घराच्या छतास लाकडी तुळया लावतात, तसेच येथेही बाहेरील छतावर तुळयांची प्रतिकृती दगडात दिसते. या चैत्यगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या आतील मंडपाचे छत सपाट असून, मागील बाजूस भिंतीपासून अलग असलेला स्तूप कोरलेला आहे. त्यावर वेदिकापट्टी, हर्मिका व छतात कोरलेली छत्री आहे. स्तूप, भिंती व छतावर मातीचा गिलावा व रंगकाम केल्याचे काही अवशेष दिसतात. या चैत्यगृहाच्या दरवाजावरील शिलालेखात उपासक तापसचा पुत्र व उपासक कपिलचा नातू ‘आनंद’ याने हे चैत्यगृह पुण्यकर्मार्थ दान दिल्याचे म्हटले आहे.

लेणे क्र. १५ ते १९ यांचा विन्यास बराचसा लेणे क्र. ८ शी जुळतो; परंतु ठिसूळ दगडांच्या थरांमुळे यांतील बऱ्याच लेण्यांचे दर्शनी भाग व आतील काही भिंती पडल्या आहेत.

लेणे क्र. २० हे लेणे नसून एका ओळीत पाण्याची तीन टाकी आहेत. त्यांतील दोन टाक्यांवर दान दिल्याचे लेख आहेत. पहिल्यात कल्याणचा सुवर्णकार कुडीरचा मुलगा ‘सधक’ याने हे टाके खोदण्यास दान दिल्याचा उल्लेख आहे. तर दुसऱ्यात दोन स्त्रिया, तोरिकाची पत्नी ‘लक्ष्मी’ आणि ऋषी मूल्यस्वामीची पत्नी ‘नादबालिका’ यांनी सदर टाकीस दान दिल्याचा उल्लेख आहे.

लेणे क्र. २१ व २३ यांचा वापर ‘भोजनमंडप’ म्हणून केला जात असावा, असे नागराजू यांचे मत आहे. २१ क्र.च्या बाहेर डाव्या बाजूस विशाल टाकी आहे.

लेणे क्र. २५ ते २८ यांचे विधान थोड्याफार फरकाने लेणे क्र. ८ प्रमाणेच आहे. लेणे क्र. २६ मधील शिलालेखात, कपिचितच्या संघास उपासक सामरचा पुत्र शिवभूतीने लेणे दान दिल्याचा उल्लेख आहे. उर्वरित लेणी साधारण आहेत.

गणेश लेणीच्या पूर्वेकडील लेणी-समूह, जुन्नर.

गणेश लेणीच्या पूर्वेकडील लेणी-समूह : या समूहाकडे जाण्यासाठी लेण्याद्री डोंगराच्या पायथ्यापासून पूर्वेकडे, सुमारे १.०६ किमी. अंतरावर, बल्लाळवाडीच्या साधारण वायव्येस असलेल्या दोन डोंगरांच्या घळीत जावे लागते. उजव्या डोंगरावर पाच व त्याच्या विरुद्ध बाजूच्या डोंगरावर तीन अशी एकूण आठ लेणी येथे आहेत. येथे उजव्या बाजूस एक सुंदर चैत्यगृह आहे. चैत्याचा दर्शनी भाग सरळ उभ्या असलेल्या (किंवा जमिनीशी काटकोनात) उंच कपारीत कोरला असून दर्शनी भागाची उंची ७.६२ मी. व रुंदी ६.१० मी. तर चैत्यगृहाची खोली सुमारे ७.८० मी. आहे. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर अप्रतिम नक्षीकाम केले आहे. प्रवेशद्वार १.०६ मी. रुंद असून त्यावर व त्याच्याशी समांतर दोन्ही बाजूंस अशा एकूण ३ चैत्यकमानी कोरल्या आहेत. त्याच्या वरच्या बाजूस लहानसा अरुंद सज्जा (Gallery) आहे. त्यावर पिंपळाच्या पानाच्या आकारासारखे एक देखणे चैत्यगवाक्ष असून ते आरपार कोरलेले आहे. संपूर्ण गवाक्षाच्या अर्धवर्तुळाकार पट्टीवर एकात-एक गुंफलेली सहा पाकळ्यांची फुले कोरली आहेत. एका पाकळीची दुसऱ्या पाकळीशी गुंफण फारच प्रमाणबद्ध कोरली आहे. वरील टोकास त्रिरत्नांचे चिन्ह आहे. पश्चिम भारतातील कोणत्याही चैत्यगवाक्षाच्या पट्टीवर याच्यासारखी नक्षी कोरलेली नाही. चैत्यकमानीच्या वरील बाजूस दोन लहान चैत्यकमानी असून त्यांत स्तूप कोरलेले आहेत. गवाक्षाच्या उजव्या बाजूस एकात-एक गुंफलेल्या त्रिदलाची नक्षी (Triskelion) व त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर स्वस्तिकांचा पट्टा चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस कोरला आहे. तसेच उजव्या भिंतीवर चैत्यकमानीत पीठावर धर्मचक्र कोरले आहे. याच्यावर पुन्हा लहान चैत्यकमानी व वेदिकापट्टीची नक्षी दिसते. डाव्या बाजूस भिंतीवर असेच कोरीव काम असून मोठ्या कमानीत बोधिवृक्ष कोरला आहे. यातील त्रिदल नक्षीचे खास वैशिष्ट्य आहे. नाशिकच्या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर ही नक्षी कोरली असून महाराष्ट्रातील इतर कोणत्याही लेण्यांत ती दिसत नाही. प्राचीन ग्रीक नाण्यांवर हे चिन्ह दाखविले आहे. येथून जवळच असलेल्या बल्लाळवाडीनजीक ‘इरॉस’ या ग्रीक देवतेचे लहानसे शिल्प सापडले होते. या सर्व निरीक्षणांवरून देणगी देणारा किंवा कारागीर यवन म्हणजे ग्रीक असावा, असे सुरेश जाधव यांचे मत आहे.

चैत्यगृहाची दर्शनी बाजू, गणेश लेणीच्या पूर्वेकडील लेणी-समूह, जुन्नर.

चैत्याच्या आत, मागील भिंतीपासून अलग असलेला, हर्मिकेसह स्तूप दिसतो. चैत्यगृहाचे विधान चापाकार आहे. तसेच छत गजपृष्ठाकृती आहे. परंतु एकंदरीत ही लेणी अपूर्ण राहिली आहे. याचे विधान व सर्वसाधारण कलाकुसर नाशिक लेणे क्र. १८ व अजिंठा लेणे क्र. ९ च्या चैत्याशी जुळणारी आहे. सुरेश जाधव यांनी या चैत्यगृहाचा काळ इ. स. पू. पहिल्या शतकाच्या अखेरीस किंवा इ. स. पहिल्या शतकातील पहिली दोन दशके ठरविला आहे. या समूहातील इतर लेणी साधी आहेत. त्यांतील एक बऱ्यापैकी विहार आहे. त्यास ओसरी, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस खिडक्या, आत मंडप व काही खोल्या आहेत.

 

 

संदर्भ :

  • Dhavalikar, M. K. Late Hinayana Caves of Western India, Pune, 1984.
  • Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980.
  • Jadhav, Suresh Vasant, A Little-known “Caitya” Hall at Junnar, Ars Orientalis, Michigan, 1986.
  • जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२.
  • जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१, भाग-२), स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, मुंबई, २००२.
  • गणेश लेणीच्या पूर्वेकडील चैत्यगृह (दर्शनी बाजू), छायासौजन्य : प्रवीण पाटील.                                                                                                                                                                               समीक्षक :  मंजिरी भालेराव