सल्फेट गटातील खनिज. रासायनिक संज्ञा CaSO4 (कॅल्शियम २९.४४, सल्फर २३.५५, ऑक्सिजन ४७.०१). भूवैज्ञानिक ए. जी. वेर्नेर यांना १७९४ मध्ये हे खनिज प्रथम आढळून आले. यामध्ये पाण्याचा अंश नसल्याने निर्जल या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून त्याचे नाव पडले. पाण्याच्या संपर्कात आल्यावर त्याचे रूपांतर जिप्सम या खनिजात होते; तर ४० C च्या वर तापमानात जिप्समचे ॲनहायड्राइटमध्ये रूपांतर होते. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन हे खनिज तयार होते. स्फटिक प्रणाली समचतुर्भुज. याचे जुळे स्फटिकही आढळतात. हे खनिज सामान्यत: संपुंजीत, कधी तंतुमय, पापुद्र्याच्या, तर कधी दाणेदार स्वरूपात सापडते. काही वेळेस गाठींच्या स्वरूपातही आढळून येते.

भौतिक गुणधर्म : रंग पांढरा, करडा, फिकट निळा, जांभळा वा रंगहीन, कस पांढरा, द्युती मोती वा काचेसारखी, पृष्ठभागावर वर्तुळाकार रेषा दिसतात. पारदर्शक वा अर्धपारदर्शक असतो. कठिनता ३-५. विशिष्ट गुरुत्व २.९७. पाटन तीन दिशात. या तीन पाटनांच्या दिशा एकमेकींशी काटकोनात असल्यामुळे त्यांच्या राशी घनीय खनिजाच्या राशीसारख्या दिसतात.

प्रकाशीय गुणधर्म : अपवर्तनांक  १.५८, विलोपन समांतर, अपस्करण क्षीण, वर्णबदल मध्यम, व्यतीकरण उच्च श्रेणी.

आढळ : ॲनहायड्राइट खनिज कमी पावसाच्या शुष्क प्रदेशात अथवा समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन तयार होते. गाळाच्या खडकात, तसेच घुमटाकार आकारात ते तयार झालेले आढळते.

उपयोग : ॲनहायड्राइट खनिजाचा बांधकामात वापर केला जातो. तसेच सिमेंट व प्लास्टिक उद्योगात फिलर म्हणून त्याचप्रमाणे सल्फ्युरिक आम्ल तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. परिपूर्ण बाजू असलेला निळ्या रंगाचा ॲनहायड्राइटचा एकल स्फटिक महत्त्वपूर्ण दुर्मीळ रत्न आहे. या खनिजाच्या काही उपप्रकारांचा दागिने तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी ते उपयुक्त आहे. ॲनहायड्राइटच्या अँजेलाइट या प्रकाराचा औषधीत उपयोग होतो.

संदर्भRead, H., Rutley’s, Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                         समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.