(ॲमेझॉन स्टोन). हिरवट-निळ्या मायक्रोक्लीन फेल्स्पार (Microcline Feldspar) खनिजाचा प्रकार. ॲमेझॉन नदीवरून या खनिजाला नाव दिले असले, तरी तिथे त्याचे मोठे साठे आढळत नाहीत.

रासायनिक संघटन : पोटॅशियमयुक्त फेल्डस्पार समूहातील खनिज. रासायनिक संज्ञा KAlSi₃O₈. यामध्ये अणुरचना त्रिमितीय टेक्टोसिलिकेट जाळ्यापासून बनलेली असून SiO₄ आणि AlO₄ चतु:पृष्ठकी (टेट्राहेड्रा) एकमेकांशी सर्व ऑक्सिजन अणू सामायिक जाळ्यासारखी रचना तयार करतात आणि या जाळ्यामध्ये निर्माण झालेल्या पोकळ्यांमध्ये पोटॅशियम (K⁺) आयन स्थित असतात.

भौतिक गुणधर्म :‍ रंग हिरवट-निळा किंवा पिवळसर-हिरवा असून त्यात पांढऱ्या रेषा. काठिण्य ६-६.५. विशिष्ट गुरुत्व २.५५-२.६०. स्फटिक त्रिनताक्ष. विदलन दोन दिशांत उत्तम. चमक काचेसारखी व अपारदर्शक ते अर्धपारदर्शक. स्फटिक किंवा दाणेदार स्वरूपात.

प्रकाशीय गुणधर्म : आकार सामान्यतः अपृष्ठीय किंवा अंशपृष्ठीय. उठाव कमी ते मध्यम. विदलन स्पष्ट. काही नमुन्यांमध्ये पट्ट्यासारखी रचना.

काट निकोलखालील गुणधर्म : व्यतिकरण रंग पहिल्या श्रेणीतील. अपवर्तनांतर कमी ते मध्यम द्विअपवर्तन. विषमदिकता विषमदिक. फेल्स्पार समूहाचे टारटान काट यमलन (tartan twinning) आणि स्थिर स्फटिक संरचना. काही ठिकाणी दोलनी अंधारण दिसते.

टारटान काट यमलन

आढळ :‍ ॲमेझोनाइट प्रामुख्याने ग्रॅनाइट आणि पेग्मटाइट खडकांमध्ये तयार होते. ते उष्णजलीय प्रक्रियांमुळेही तयार होऊ शकते. मॅग्मा थंड होत असताना पोटॅशियम-समृद्ध द्रवातून सुरुवातीला ऑर्थोक्लेज किंवा सॅनिडीन तयार असतांना नंतर तापमान हळूहळू कमी झाल्यावर स्फटिक संरचनेत पुनर्रचना होऊन ऑर्थोक्लेजचे रूपांतर मायक्रोक्लीनमध्ये होते. ही प्रक्रिया प्रामुख्याने मॅग्माच्या धीम्या गतीने थंड होण्यामुळे घडते.

भारतात ॲमेझोनाइट प्रामुख्याने पेग्मटाइट खडकांमध्ये आढळतो. राजस्थान (अजमेर व उदयपूर परिसर), कर्नाटक व आंध्र प्रदेश तसेच बिहारमधील अभ्रकाच्या खाणींमध्ये व काश्मीरच्या काही भागात ते आढळते. जगभरात या खनिजाचे समृद्ध साठे रशिया (विशेषतः उरल पर्वत प्रदेश), अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील कोलोरॅडो व व्हर्जिनिया भागात, ब्राझील, मादागास्कर व नॉर्वे या ठिकाणी आढळतात.

उपयोग : रत्न म्हणून दागिन्यांमध्ये वापर, सजावटीच्या वस्तू व कोरीव काम, मणी व अलंकारिक दगड म्हणूनसुद्धा ते वापरतात.

संदर्भ :

  • Deer, Howie and Zussman. Rock-Forming Minerals, 3rd edition, 2013.
  • Walter Schumann,Robert Bradshaw, Handbook of Rocks, Minerals, and Gemstones, 1993.
  • D. Nesse, Introduction to Optical Mineralogy, Oxford University Press, 2004.

                                                                        समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.