युनेस्कोद्वारा घोषित जागतिक भूवैज्ञानिक उद्यान. उत्तर अटलांटिक महासागरातील पोर्तुगालच्या हद्दीत नऊ बेटांच्या अझोर्स द्वीपसमूहाला यूनेस्काने २०१५ मध्ये जागतिक भूवैज्ञानिक उद्यानाचा दर्जा दिला. या द्वीपसमूहावर भव्य पर्वतरांगा, सुप्त, शंकूच्या आकारांची व महाकुंभ स्वरूपाची ज्वालामुखी पर्वते, लुप्तप्राय सागरी आणि वन्य प्रजाती, समृद्ध जल–औष्णिक प्रणालींसह विविध प्रकारीच औषधी आणि उष्ण पाण्याचे झरे, धूममुखे इ. भू–विविधता निर्माण झालेली आहे.
अमेरिकन, यूरेशियन आणि आफ्रिकन या तीन भूसांरचनिक भूपट्टांच्या सीमांच्या संपातबिंदूवर अझोर्स द्वीपसमूह आहे. या द्वीपसमूहातील बेटांची नावे पुढीलप्रमाणे : तर्सेईरा, ग्रस्योझा, पीकू, फयाल, सेंट जॉर्ज, सेंट मायकेल, सेंट मेरी, कोर्व्हू आणि फ्लोरेस. ही बेटे सु. ७ ते ७५० चौ.किमी. क्षेत्रफळांची आहेत. ज्वालामुखी क्रियेने ही बेटे बनलेली असून ती अटलांटिक महासागराच्या अटलांटिक रिज या सागरी डोंगररांगेच्या पाण्याबाहेर आलेल्या भागांपैकी आहेत. अटलांटिक महासागरातील भूकंपप्रवण आणि सक्रिय ज्वालामुखीच्या क्षेत्रांपैकी हा एक द्वीपसमूह आहे. येथील बेटे डोंगरकड्यांनी युक्त असून सेंट मेरी बेटांशिवाय सर्वत्र लाव्हा रसापासून बनलेल्या टेकड्या आढळतात. किनाऱ्यालगतचा भाग उभ्या चढणीचा व दुर्गम आहे.
अझोर्स द्वीपसमूहातील ज्वालामुखी पर्वतांची भूसांरचनिक रचना मध्यवर्ती–ज्वालामुखी पर्वताच्या उद्रेकातून असल्यामुळे शंकूच्या आकाराची टेकडी आणि माथ्यावर कटाह (कॅल्डेरा; महाकुंभ) या स्वरूपाची आहे, तर काही ठिकाणांची टेकड्यांची रचना भेगी उद्रेक या पद्धतीची आहे. शंकूयुक्त महाकुंभ स्वरूपाची रचना पीकू बेटावरील पीकू अल्टो शिखर आणि सेंट मायकेल मधील फोगो ज्वालामुखी येथे दिसूनयेते. अशा प्रकारची भूसंरचना स्तरित ज्वालामुखींमुळे तयार झालेली आहे. सु. १५ व्या शतकापासून या द्वीपसमूहावर मानवीवस्ती सुरू झाल्यापासून २८ ज्वालामुखी उद्रेक नोंदविले गेले आहेत. ज्वालामुखीपासून निर्माण झालेली गुहा, लावा नळी, किनारपट्टीवरील लावा क्षेत्र आणि मध्य सेंट मायकेल मधील निष्क्रिय शंकू पर्वते इ. भूरूपविज्ञानाची अनेक उदाहरणे तेथे निदर्शनास येतात.
अर्झोस द्वीपसमूहातील बेटांच्या निर्मितीचा क्रम पुढीलप्रमाणे : सेंट मेरी (८.१२ दशलक्ष वर्षे), सेंट मायकेल (४.१ दशलक्ष वर्षे), तर्सेईरा (३.५२ दशलक्ष वर्षे), ग्रस्योझा, (२.५ दशलक्ष वर्षे), फ्लोरेस (२.१६ दशलक्ष वर्षे), फयाल (०.७ दशलक्ष वर्षे), सेंट जॉर्ज (०.५५ दशलक्ष वर्षे), कोर्व्हू (०.७ दशलक्ष वर्षे) आणि पीकू (०.२७ दशलक्ष वर्षे). बेसाल्ट, ट्रकाइट, टेफ्रा यांसारख्या विविध प्रकारचे अग्निजन्य खडक येथे उपलब्ध असल्याने हा द्वीपसमूह अत्यंत समृद्ध असा भूवैज्ञानिक ठेवा आहे. या द्वीपसमूहात द्राक्षे, अननस आणि चहा यांचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. शेती, पर्यावरणपूरक पर्यटन आणि स्थानिक संस्कृती यांचा अपूर्व संगम येथे आहे.
अझोर्स द्वीपसमूह भू–गतिकीय वातावरणामुळे तीव्र भूकंपीय हालचालींचा केंद्र बनला आहे. भूकंपाच्या घटना वारंवार घडत असल्या तरी त्या सामान्यतः भूसांरचनिक किंवा ज्वालामुखी–भूसांरचनिक स्वरूपाच्या असतात. सर्वसाधारणपणे त्यांची तीव्रता कमी ते मध्यम असते आणि अधूनमधून रि.मा. ५ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या घटना घडतात. सर्वात तीव्र भूकंप १७५७ मध्ये कॅल्हेटाजवळ नोंदवला गेला, ज्याची तीव्रता ७ पेक्षा जास्त होती. १५२२ मध्ये झालेल्या भूकंपाने सेंट मायकेलची राजधानी गडप झाली होती. १९२६ मध्येही भूकंपाचा धक्का जाणवला होता.
संदर्भ :
- Azores Geopark. Horta (Azores), Portugal: GeoAçores Association (2013), Retrieved 24 December 2014.
- http://www.europeangeoparks.org/?page_id=2831
- https://www.azoresgeopark.com/index.php/
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.