लिथियमयुक्त फॉस्फेट खनिज. रासायनिक संज्ञा LiAlPO₄(F,OH). फ्ल्युओरीन (F) व हायड्रॉक्सिल (OH) यांपैकी कोणते प्रमाण जास्त आहे यावरून त्याचे प्रकार ठरतात. जर प्ल्युओरीनचे प्रमाण हायड्रॉक्सिलपेक्षा अधिक असेल तर अँब्लिगोनाइट आणि याउलट हायड्रॉक्सिलचे प्रमाण जास्त असेल, त्या प्रकाराला माँटेब्रॅसाइट (Montebrasite) म्हणतात. या दोन्ही खनिजांमध्ये घन द्रावण (solid solution) मालिका आढळते. लिथियमच्या जागी काही प्रमाणात सोडियम येऊ शकते. हे खनिज प्रामुख्याने ग्रॅनाइट पेग्मटाइटमध्ये आढळते तसेच ते लिथियम धातूचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

स्फटिक प्रणाली : त्रिनताक्ष (Triclinic) स्फटिक विरळ आढळतात; बहुधा भरड, दाणेदार किंवा पाटनक्षम पुंजांच्या स्वरूपात. पाटन (001) उत्कृष्ट (100) चांगले, पाटन पृष्ठांमधील कोन बोथट असल्यामुळे याला अँब्लिगोनाइट (ग्रीक amblys = बोथट, gonia = कोन) नाव देण्यात आले आहे.

अँब्लिगोनाइट प्रामुख्याने ग्रॅनाइट, पेग्मटाइट शिलारचनांमध्ये तयार होते. हे खनिज स्पॉड्युमीन (Spodumene), टूर्मलीन (Tourmaline), लेपिडोलाइट (Lepidolite), ॲपेटाइट (Apatite), तसेच लिथियमयुक्त खनिजांच्या जोडीने आढळते.  पेग्मटाइटमध्ये शेवटच्या टप्प्यात स्फटिकीकरण होणाऱ्या, सुबाष्पनीय घटकांनी (volatile components) समृद्ध द्रवांपासून याची निर्मिती होते. त्यामुळे हे खनिज सामान्य ग्रॅनाइटमध्ये विरळ, पण पेग्मटाइटमध्ये तुलनेने जास्त आढळते.

भौतिक गुणधर्म : अँब्‍लिगोनाइट बहुधा दुधी-पांढऱ्या, फिकट हिरव्या, पिवळ्या, करड्या किंवा निळसर छटांमध्ये आढळते.

त्याची मोत्यासारखी पाटनपृष्ठ चमक ओळखण्यास उपयुक्त ठरते. कठिनता ६, विशिष्ट गुरुत्व ३.०-३.१, भंजन- खडबडीत ते अर्ध-शंखाभ, ठिसूळपणा ठिसूळ, चमक काचेसारखी ते मेणासारखी; (001) पाटन पृष्ठ मोत्यासारखे, पारदर्शकता अर्धपारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी, कस पांढरा.

प्राप्तिस्थान : भारतामध्ये बस्तर जिल्हा (छत्तीसगड) येथे ग्रॅनाइट पेग्माटाइट खनिजांमध्ये अँब्लिगोनाइट आढळले आहे. विशेषतः चिउरवडा (Chiurwada) आणि आसपासच्या पेग्माटाइट खणीत या खनिजाची नोंद आहे.

भारतामध्ये काही लिथियमधारक पेग्माटाइट प्रदेश आहेत, तेथे अँब्लिगोनाइट मिळण्याची शक्यता आहे: कर्नाटक, हिमाचल प्रदेश (उदा. किन्नौर), झारखंड आणि बिहारमधील लिथियम पेग्माटाइट प्रदेश राजस्थान व मेघालयमधील पेग्माटाइट क्षेत्रे. तसेच जागतिक स्तरावर अँब्‍लिगोनाइट मुख्यतः युगांडा, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, स्पेन, पोर्तुगाल या प्रदेशांत आढळते. ब्राझीलमधील पेग्मटाइट पट्टे विशेषतः लिथियम खनिजांसाठी प्रसिद्ध आहेत.

आर्थिक महत्त्व : अँब्लिगोनाइट हे लिथियम धातूचे महत्त्वाचे धातुखनिज (ore mineral) आहे. लिथियमचा वापर  लिथिअम-आयन बॅटऱ्या, काच व सिरॅमिक उद्योग, ॲल्युमिनियम मिश्रधातू, औषधनिर्मिती. हरित ऊर्जा (Green Energy) युगात लिथियमची मागणी झपाट्याने वाढत असल्यामुळे अँब्लिगोनाइटचे आर्थिक महत्त्व अधिक वाढले आहे.

संदर्भ :

  • Deer, W.A., Howie, R.A., & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals, Longman, 1992.
  • Read, H., Rutley’s  Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.

समीक्षक : उदय कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.