स्वतंत्र खनिज नसून प्रामुख्याने जिप्सम खनिजाचा सूक्ष्मस्फटिकी प्रकार. काही ठिकाणी कॅल्साइटपासून बनलेला ॲलॅबॅस्टरही आढळतो, परंतु सर्वसाधारणपणे ॲलॅबॅस्टर म्हणजे जिप्सम मानला जातो. प्राचीन काळापासून शिल्पकला, मूर्ती, सजावटी वस्तू, दिव्यांच्या कवचांसाठी आणि भांडी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.

नैसर्गिक खनिज व त्यापासून साकारलेली मूर्ती. 

रासायनिक संघटन : रासायनिक संज्ञा CaSO₄·2H₂O. यात कॅल्शिअम (Ca), सल्फर (S), ऑक्सिजन (O) व  पाणी (H₂O) यांचा समावेश होतो. स्फटिक संरचनेत दोन पाण्याचे अणू  असतात. त्यामुळे उष्णतेमुळे पाणी बाहेर पडल्यास प्लास्टर ऑफ पॅरिस तयार होते.

स्फटिक एकनताक्ष सममिती प्रणालीतील खनिज. त्याच्या रचनेत SO₄²⁻ (सल्फेट) आणि Ca²⁺ (कॅल्शिअम) आयन असतात. सल्फेट आयनमध्ये सल्फर अणूभोवती चार ऑक्सिजन अणू चतुष्फलकीय  रचनेत असतात. ते सल्फेट समूह कॅल्शियम आयनांशी आयनी बंधाने जोडलेले असतात.

स्फटिक जाळ्यात पाण्याचे अणू (H₂O) निश्चित स्थानांवर स्थित असतात आणि ते हायड्रोजन बंध तयार करतात. ही जलयुक्त रचना ॲलॅबॅस्टरला मऊपणा आणि विशिष्ट पारदर्शकता देते.

भौतिक गुणधर्म : ॲलॅबॅस्टर खनिज सूक्ष्मकणीय, रंग पांढऱा, फिकट करडा, पिवळसर, गुलाबी असून काही वेळा तपकिरी छटा दिसतात. कठिनता २ (अतिशय मऊ; नखाने ओरखडा पडतो), विशिष्ट गुरुत्व सु. २.३,  चमक काचेसारखी ते रेशमी, विदलन १. ॲलॅबॅस्टरमध्ये एका प्रमुख दिशेत उत्कृष्ट विदलन आढळते. हे विदलन सामान्यतः (010) तलात आढळते. खनिज पातळ, सपाट पत्रकांमध्ये किंवा समतल तुकड्यांमध्ये सहज तुटते. विदलन पृष्ठभाग गुळगुळीत व किंचित चमकदार दिसतो. भंजन असमान, पारदर्शकता अर्धपारदर्शक ते अपारदर्शक. ॲलॅबॅस्टर अतिशय मऊ असल्यामुळे त्यावर सहज कोरीव काम करता येते. त्यामुळे शिल्पनिर्मितीसाठी तो अत्यंत लोकप्रिय आहे.

प्रकाशीय गुणधर्म : ॲलॅबॅस्टर (जिप्सम) एकनताक्ष सममिती प्रणालीतील आणि द्विवैध अपवर्तक  खनिज आहे. स्फटिकांचे रंग रंगहीन, स्फटिकांचा उठाव कमी, द्विवर्णता कमी ते मध्यम, अपवर्तनांक सु. १.५२ – १.५३.

काट निकोलखालील गुणधर्म : व्यतिकरण रंग प्रथम क्रमाचे फिकट रंग. यामध्ये स्पष्ट विदलन दिसते आणि कधीकधी यमलनही आढळते. सूक्ष्मदर्शकाखाली त्याची एकसंध व सूक्ष्म स्फटिकीय रचना दिसून येते. स्फटिकांचे स्वरूप  द्विअक्षीय (+).

प्राप्तिस्थान : ॲलॅबॅस्टर प्रामुख्याने अवसादी वातावरणात तयार होतो. समुद्र किंवा सरोवरातील पाण्याचे बाष्पीभवन  झाल्यावर त्यातील विरघळलेले कॅल्शिअम सल्फेट स्फटिकीभूत होऊन जिप्सम तयार होतो. अशा साठ्यांना बाष्पनज साठे म्हणतात. भारतामध्ये जिप्समचे मोठे साठे राजस्थान (विशेषतः बिकानेर, जैसलमेर), गुजरात, तमिळनाडू व जम्मू आणि काश्मीर या राज्यांत आढळतात. राजस्थानातील वाळवंटी प्रदेशात बाष्पनज ॲलॅबॅस्टर साठे मोठ्या प्रमाणावर आढळतात. अमेरिकेचे संयुक्त संस्थाने, चीन, इराण, स्पेन व मेक्सिको हे जगातील प्रमुख जिप्सम (ॲलॅबॅस्टर) उत्पादक देश आहेत.

संदर्भ :

  • Deer, W.A., Howie, R.A., & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals. Longman, 1992.
  • Walter Schumann, Robert Bradshaw, Handbook of Rocks, Minerals and Gemstones, 1993.
  • Nesse, W. D., Introduction to Optical Mineralogy, Oxford University Press, 2004.
  • Read, H., Rutley’s  Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.