भोजली गीत : छत्तीसगढ राज्यातील लोकप्रिय लोकगीत. श्रावण महिन्यात महिलांनी हे गीत गाण्याची प्राचीन परंपरा आहे. भोजली या शब्दाचा अर्थ भो-जली असा होतो, म्हणजे भूमीत पाणी यावे अशी प्रार्थना होय. हे लोकगीत प्रकृती पूजन, भूमी पूजन आणि उर्वरता यांचे प्रतीक आहे. हे गीत छत्तीसगढ राज्यातील विशेषतः रायपूर, सुर्गुजा, फुलझरी, मगरलोड, बस्तर, कोरबा, दुर्ग, राजनांदगाव, बिलासपूर आणि कबीरधाम या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांत, आदिवासी व गैर-आदिवासी समुदायांत प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागात गावोगावी घरी, शेतात किंवा नदीकिनारी हे गीत ऐकू येते. यामुळे ते छत्तीसगढाच्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक बनले आहे. भोजली गीताचा पूर्व इतिहास अत्यंत प्राचीन आणि मौखिक परंपरेवर आधारित आहे. भोजली गीताचा उल्लेख मध्य भारताच्या लोकगीत परंपरेच्या संदर्भात येतो. श्रावण महिन्यात पाऊस न पडल्यास शेती नष्ट होते, म्हणून महिलांनी भूमीला ‘जल’ देण्याची प्रार्थना केली. भोजली देवी (पिली बाई, भोजली दाई) या प्रकृतीची मूर्त स्वरूपात पूजा केली जाते. गीतांमध्ये गंगा देवीचा वारंवार उल्लेख येतो, ज्यामुळे नद्या व पाण्याशी संबंध दिसतो. हे गीत लिखित स्वरूपात नव्हते, तर पिढ्यांपिढ्या ते चालत आले आहे.
छत्तीसगढच्या लोककथांमध्ये प्रकृती पूजनाचे संदर्भ येतात आणि भोजली गीत त्याच परंपरेचा भाग आहे. आधुनिक काळात २० व्या शतकात छत्तीसगढ राज्य स्थापन झाल्यावर त्याला अधिक ओळख मिळाली. राष्ट्रीय भोजली महोत्सव ,रायपूर या सारख्या कार्यक्रमांमुळे ते राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. तरीही त्याचे मूळ ग्रामीण-आदिवासी जीवनात आहे आणि ते बदलत्या काळातही टिकून आहे. छत्तीसगढातील इतर लोकगीतांशी (सुआ गीत, जनवारा गीत, धनकुल गीत, कर्मा गीत) त्याचा निकट संबंध आहे. हे गीत महिलांच्या भावना, प्रकृती पूजन आणि ऋतूशी निगडित आहेत. उदाहरणार्थ, सुआगीतही श्रावणात गायले जाते आणि शेती-कुटुंब यांचे वर्णन करते. उत्तर भारतातील तीज गीत (राजस्थान, उत्तर प्रदेश) यामध्येही मुसळधार पावसाची आणि उर्वरतेची कामना असते. पण भोजली गीत छत्तीसगढ पुरते विशिष्ट आहे. मध्य प्रदेशातील भुजालिया किंवा कुजलिया पर्वाशी त्याचे साम्य आहे ,
भोजली गीत मुख्यतः भोजली पर्व किंवा भोजली उत्सवाच्या प्रसंगी गायले जाते. हा उत्सव भाद्रपद महिन्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) सुरू होतो आणि नऊ दिवस चालतो. रक्षाबंधन किंवा श्रावण पूर्णिमेनंतर विसर्जन होते. काही ठिकाणी नाग पंचमीपासून ते रक्षाबंधनापर्यंत ते गायले जाते. गीतांत ‘देवी गंगा देवी गंगा लहर तुरंगा’ अशा ओळी येतात. हे गीत शेतात धानाची मशागत करताना, तसेच एकटे-समूहानेही गायले जाते. या गीतातून ‘पानी बिना मछरी, पवन बिना धाने, सेवा बिना भोजली के तरसे पराने’ अशा ओळींमधून जल, हवा आणि भोजली देवीच्या सेवेची आवश्यकता सांगितली जाते. भोजली देवी ही गंगा, पिली बाई किंवा प्रकृतीची मूर्ती आहे. मुली एकमेकींना ‘भोजली’, ‘गुइयां’, ‘मितानिन’ म्हणतात. कुटुंबही ही मैत्री मानते. या गीतांमधून स्त्रियांच्या कष्ट, आनंद, लालसा या भावना व्यक्त होतात. हे गीत सामुदायिक श्रम ,पर्यावरण संरक्षण आणि स्त्री एकतेचे माध्यम आहे. गीत गाताना स्त्रिया एकत्र येतात, कष्ट विसरतात आणि आनंद घेतात.
भोजली गीत गायनात मुख्यतः स्त्रिया आणि तरुणी सहभागी होतात. विवाहित महिलांना बधू म्हणतात आणि त्या एकट्या किंवा समूहात गातात. अविवाहित मुली हे पर्व मुख्यतः साजरे करतात. लहान मुलीही सहभागी होतात आणि भोजली देवीला गुस्सा नको असे सांगतात. या गीताचे गायन स्त्री-केंद्रित आहे. आधुनिक काळात गायक-गायिकांना (अलका परगनिहा, छाया चंद्राकर, आरती सिंह, आरु साहू इ.) स्टेजवर गाण्याची संधी मिळते आणि राष्ट्रीय भोजली महोत्सवात हजारो लोक सहभागी होतात.
भोजली गीत छत्तीसगढाच्या लोकजीवनात खोलवर रुजले आहे. शेतात, स्वयंपाकघरात, धान कुटताना हे गीत ऐकू येते. या गीतामध्ये आभूषणे, शेती साधने, पशू-पक्षी, भावना यांचे वर्णन येते. उदाहरणार्थ, ‘हमरो भोजली देवीला चंदन के छिटका’, ‘आठे के चाउर नवमी बोवा’ अशा ओळी रोपांच्या वाढीचे वर्णन करतात. विसर्जनात ‘हमरो भोजली दाई के निकलत है आंसू’ अशा ओळी भावनिक आहेत. हे गीत स्त्रियांच्या संवेदना व्यक्त करते. भोजली गीत छत्तीसगढाच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवते. ते कृषी, प्रकृती आणि मानवी संबंध यांचा समन्वय दाखवते.
संदर्भ : Flueckiger, Joyce Burkhalter, Gender and Genre in the Folklore of Middle India, Cornell University Press, 1996.
समीक्षक : प्रकाश खांडगे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.