अभियांत्रिकी आरेखन ही अभियंते आणि व तंत्रज्ञ यांचेकडून वापरली जाणारी वैश्विक आलेखी किंवा रेखाचित्रात्मक भाषा आहे. याद्वारे एखाद्या संकल्पनेला मूर्त स्वरूप आणण्यासाठी आवश्यक घटक उदा., त्रिमितीय संरचना, वापरलेली साधनसामग्री आणि त्याची सहनक्षमता इत्यादींची सुसंगत मांडणी केली जाते. अभियांत्रिकी आरेखनाच्या विविध प्रकारांपैकी मुक्तहस्त आरेखन हा एक प्रकार आहे.

व्याख्या : प्रमाणपट्टी, वर्तुळ रेखक, टी-गुण्या, त्रिकोणी गुण्ये, कोनमापक इ. म्हणजेच कोणत्याही आखून काढण्याच्या साहित्याशिवाय जे आरेखन केले जाते त्यास मुक्तहस्त आरेखन असे म्‍हणतात.

आ. १

मुक्तहस्त आरेखनाचे महत्त्व : अभियांत्रिकी आरेखनात मुक्तहस्त आरेखनास साहित्याच्या साहाय्याने केलेल्या आरेखनाइतकेच महत्त्व आहे. चित्रमय देखाव्याचे किंवा लंबजन्य प्रक्षेप (orthographic projection) देखाव्याचे मुक्तहस्ताने चित्रण करणे अनेक कारणांनी आवश्यक ठरते.

  • वस्तूच्या आकाराची कल्पना समजावून देण्यासाठी किंवा घेण्यासाठी जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा त्याच कल्पना, चित्र काढून दाखविल्याने लवकर समजतात.
  • अभियंत्याला जर एखादी वस्तू नव्यानेच तयार करावयाची असेल तर तो त्या आकाराचे आधी मुक्तहस्त चित्र काढतो. त्यामुळे त्याच्या कल्पनेतला आकार स्पष्ट होतो व त्यावर विचार विनिमय होऊन त्यासंबंधीच शेवटचा निर्णय घेणे सोपे होते.
  • एखाद्या यंत्रभागामध्ये काही नवीन दुरुस्ती किंवा थोडा फेरफार असेल तर त्यासंबंधीची कल्पना मुक्तहस्त चित्र काढून कारागिरास किंवा आरेखकास सांगता येते.
  • कारखन्यातल्या किंवा कामापासून दूर असलेल्या यंत्राचे किंवा यंत्रभागाचे आरेखन करावयाचे असेल तर यंत्राजवळ बसून आरेखनवहीत मुक्तहस्ताने त्याचे देखावे काढून, त्याची मापे व इतर आवश्यक माहिती नोंदवून नंतर त्या यंत्राचे किंवा यंत्रभागाचे आरेखन नीटपणे करता येते.
आ. २

मुक्तहस्त आरेखनाचे साहित्य : मुक्तहस्त आरेखनास केवळ तीन वस्तूंची आवश्यकता असते. (१) पेन्सिल : ही नेहमी गोल, निमुळती व लांब टोकदार असावी व साधारणपणे ती H किंवा HB ह्या प्रतीची घ्यावी, (२) खोडरबर, (३) आरेखन कागद किंवा आलेखवही किंवा वही. आवश्यक वाटल्यास घासकागद (sand paper) असावा.

मुक्तहस्त चित्रणात सरळरेषा, वक्ररेषा, वर्तुळखंडे, वर्तुळे, लंबवर्तुळे इ. आकार काढावे लागतात.

सरळ रेषा काढणे : आकृती (१) मध्ये सरळरेषा योग्य काढण्यासाठी कशी सुरुवात करावी व कशा पद्धतीने काढावी हे दाखविले आहे. पेन्सिलीच्या टोकापासून साधारणपणे ४० मिमी. अंतरावर पेन्सिल धरावी. (i) प्रथम रेषांची लांबी दाखविणारी दोन बिंदू काढून, नंतर एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे पेन्सिल ढिल्या हाताने मागे-पुढे फिरवावा म्हणजे रेषेच्या दिशेच्या अंतराचा अंदाज येतो. (ii) त्यानंतर हलक्या हाताने एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत ठराविक अंतरावर तुटक रेषा काढून हलक्या हाताने जोडाव्यात आणि शेवटी सावकाशपणे ती रेषा ठळक व हवी तेवढी जाड करावी. ही रेषा काढत असताना आरेखकाने आपली नजर पेन्सिलीच्या टोकावर न ठेवता शेवटच्या बिंदूवर ठेवावी. याचप्रमाणे उभ्या व तिरक्या रेषा कशा काढाव्यात हे आकृती (१) मध्ये दिले आहे.

आ. ३

वर्तुळ काढणे : आकृती २ मध्ये वर्तुळ काढण्यासाठी चौरसाची मदत घेऊन ते क्रमश: कसे काढावे हे दाखविले आहे. प्रथम वर्तुळ व्यासाच्या अंतराचा चौरस हलक्या हाताने काढून त्याचे कर्ण काढावेत. त्यानंतर आकृतीत दाखविल्याप्रमाणे मध्यबिंदूपासून त्रिज्येच्या मापाच्या अंतराच्या खुणा करून, त्या आठ खुणांमधून हलक्या हाताने परंतु ठळक असे पूर्ण वर्तुळ काढावे.

आकृती ३ मध्ये वर्तुळ काढण्यासाठी मध्यरेषांची मदत घेऊन ते क्रमश: कसे काढावे हे दाखविले आहे. प्रथम परस्परांना काटकोनात दुभागणाऱ्या दोन रेषा काढून त्यांच्या मध्यबिंदूतून दुभागणाऱ्या आणखी दोन रेषा काढाव्यात. त्यानंतर या आठ रेषांवर मध्यबिंदूपासून त्रिज्येच्या अंतरावर खुणा करून त्या खुणांमधून हलक्या हाताने परंतु ठळक असे पूर्ण वर्तुळ काढावे.

आ. ४

अंतर व बाह्य वक्ररेषा काढणे : आकृती क्र. ४, ५ व ६ मध्ये अंतर व बाह्य वक्ररेषा कशा काढाव्यात हे दाखविले आहे. आकृतीचे निरीक्षण केल्यावर रचनेचे क्रमवार टप्पे लक्षात येतात.

दीर्घ वर्तुळ : पुष्कळ वेळा लंबजन्य देखाव्यात पूर्ण गोलाकार आकार दीर्घ वर्तुळासारखे दिसतात. ते कसे काढतात ते आकृती क्र. ७ व ८ मध्ये दाखविले आहे. आकृती ७ मध्ये दीर्घ वर्तुळ काढण्यासाठी आयताची मदत घेतली आहे. दीर्घ वर्तुळाचा मोठा व्यास व लहान व्यास यांच्या मापाचा आयत काढून आकृतीत दाखविल्याप्रमाणे तुटक वक्ररेषा काढावी व शेवटी हलक्या हाताने, पण ठळकपणे जोडून दीर्घ वर्तुळ पूर्ण करावे. आकृती ८ मध्ये दीर्घ वर्तुळ काढण्यासाठी दीर्घ वर्तुळाचा मोठा व्यास व लहान व्यास यांची मदत घेतली आहे. प्रथम मोठ व्यास व लहान व्यास दाखविणाऱ्या रेषा एकमेकांना विभागून काटकोनात काढून त्याच्या टोकामधून दीर्घ वर्तुळाच्या आकाराला जुळणाऱ्या तुटक वक्ररेषा काढाव्यात व शेवटी आकृतीत दाखविल्याप्रमाणे तुटक रेषा जोडून दीर्घ वर्तुळ पूर्ण करावे.

आ. ५

मुक्तहस्त आरेखनास सुरुवात करण्यापूर्वी :

  • दिलेल्या वस्तूचा आकार पूर्णपणे समजण्यासाठी किती प्रक्षेप देखावे काढावे लागतील ते प्रथम ठरवावे.
  • आपल्याजवळ असलेल्या कागदाचा आकार लक्षात घेऊन ठरविलेले देखावे जास्तीत जास्त मोठ्या आकारात कसे बसतील त्याचा अंदाज घ्यावा.
  • ते साधण्यासाठी देखाव्यावरची मोजमापेही लक्षात घ्यावयास हवीत.
  • सर्व इच्छित देखावे काढून झाले की त्यावर वस्तूची सर्व मोजमापे अवश्य दाखविली पाहिजेत.
  • मुक्तहस्त आरेखन असल्याने, आखून काढणाऱ्या साहित्याची मदत घेऊन प्रमाणाप्रमाणे देखावे काढता येत नाहीत. त्यासाठी देखाव्यावर मोजमापाची प्रमाणबद्धता सांभाळली पाहिजे. मुक्तहस्त आरेखनात ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रमाणबद्धता जर सांभाळली नाही तर वस्तूच्या आकाराची बरोबर कल्पना येत नाही.
आ. ६
आ. ७
आ. ८

 

संदर्भ :

  • Kushlan, Max, Free Hand Drawing and Designing, Chicago, 1919.
  • Singh, Lakhvinder Pal; Singh, Harwinder, Engineering Drawing : Principles and Application.
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था, इ. नववी व दहावी पाठ्यपुस्तक, यांत्रिकी चित्रकला.

 

समीक्षक : धामणगावकर, प्र. र.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.