असगरीबाई : (१२ ऑगस्ट १९१८–९ ऑगस्ट २००६). अभिजात भारतीय हिंदुस्थानी रागदारी संगीतातील प्राचीन व उच्च श्रेणीच्या धृपद गानप्रकारातील गायिका. त्यांचा जन्म बिजावर (छतरपूर जिल्हा, मध्य प्रदेश) येथे झाला. असगरीबाईंची आई नजीर बेगम या बिजावर येथील पूर्वीच्या शाही परिवाराच्या एक गायिका होत्या. तसेच त्यांची आजी (वडिलांची आई) बलायत बीबी अजयगढ रियासतीच्या दरबार गायिका होत्या.
परंपरेने असगरीबाईंना गाण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. सहा वर्षांच्या असतानाच त्या उस्ताद जहूर खाँ यांच्यासोबत टिकमगढ येथे आल्या. टिकमगढचे राजे महाराज वीरसिंह जुवेद यांना आपल्या राज्यात एक अशी गायिका हवी होती, जी त्यांच्या दरबारातील धृपद गायनाची परंपरा जिवंत ठेवू शकेल. त्यावेळी त्यांच्या दरबारातील उस्ताद जहूर खाँ यांनी छोट्या असगरीबाईंना दत्तक घेऊन टिकमगढ येथे गाण्याची तालीम द्यायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच असगरीबाईंना सर्व राग परिचित झाले होते. तासंनतास रियाज करून अत्यंत मेहनतीने त्यांनी धृपद गायनात विशेष प्राविण्य प्राप्त केले. अनेकविध तालांवर आधारित हे गायन असल्याने ते अत्यंत अवघड समजले जात असे. धृपद गायनासाठी दमदार गळा आणि पुरेशा श्वासाची क्षमता आवश्यक असते. तसेच धृपद गायन ही पुरुषप्रधान गायकी समजली जात असल्याने असगरीबाईंच्या रूपाने एक स्त्री गायिका या धृपद गायन परंपरेत सिद्ध झाली होती. असगरीबाईंच्या गायनाने प्रभावित होऊन महाराज वीरसिंह जुवेद यांनी त्यांची टिकमगढ किल्ल्यातील राधा-माधव मंदिरात गायिका म्हणून नेमणूक केली होती.
त्याकाळी धृपद गायन हे मंदिरापुरतेच मर्यादित होते; पण असगरीबाईंनी आपल्या दमदार आवाजात प्रथम राज दरबारात व नंतरच्या काळात सार्वजनिक रंगमंचावर या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. दरम्यानच्या काळात अनेकजण त्यांच्या गायकीचे चाहते झाले. बुंदेलखंडातील प्रख्यात हिंदी कवी, लेखक आणि साहित्यकार गुणसागर सत्यार्थी यांनी असगरीबाईंचे नाव भोपाळमधील अल्लाउद्दीन खाँ संगीत अकादमीच्या कलाकारांच्या यादीत सामील करायला सांगितले. नंतरच्या काळात असगरीबाईंना अनेक प्रतिष्ठित अशा संगीत महोत्सवात आमंत्रित केले जाऊ लागले. तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या उपस्थितीत असगरीबाई यांनी ८४ वेळा ताल बदलत ध्रुपद गायन सादर केले होते. ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये उच्च श्रेणीच्या गायक कलाकार म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रम केले. टिकमगढच्या राजदरबारात त्या ३५ वर्षे कार्यरत राहिल्या. ओरछा राजवंशाच्या त्या मुख्य गायिका होत्या. अनेक शाही परिवारांकडून त्यांना गायनासाठी आमंत्रित केले जात असे. असगरीबाई धृपद गायनाव्यतिरिक्त उपशास्त्रीय संगीतातील बुंदेलखंडी लोकगीत, गझल, दादरा, ख्याल, ठुमरी, धमार असे अनेक गायन प्रकार सादर करीत असत.
आग्र्याचे कोळसा व्यापारी चिमणलाल गुप्ता यांच्याशी असगरीबाईंचा परिचय झाला. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. असगरीबाईंना पाच मुलगे आणि तीन मुली झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात राजाश्रय गेल्यानंतर असगरीबाईंना खूप वाईट परिस्थितीशी सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात त्यांचे गायन बंद झाले. पतीच्या निधनानंतर उपजीविकेसाठी त्यांनी बिडी आणि लोणची विकण्याचा छोटासा उद्योग सुरू केला. अनेक वर्षे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत व्यतीत केली. त्यावेळी परिस्थितीला कंटाळून, निराश होऊन त्यांनी आपले सर्व पुरस्कार शासनाने परत घ्यावे असे आवाहन केले. त्यानंतर मध्य प्रदेश शासनाने टीकमगढ जिल्ह्यात धृपद केंद्र स्थापन केले आणि असगरीबाईंना तेथे गुरू म्हणून नियुक्त केले; परंतु त्यामधून त्यांना फारसे आर्थिक स्थैर्य मिळू शकले नाही. त्या १९३५ ते २००५ सालापर्यंत गायनात सक्रिय होत्या.
असगरीबाईंना मध्य प्रदेश शासनाचा तानसेन सन्मान (१९८५) तसेच संगीत नाटक अकादमीचा सन्मान आणि मध्य प्रदेश शासनाकडून शिखर सन्मान या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित केले (१९९०). आईटीसी संगीत संमेलनात त्यांना आईटीसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले (१९९७).
असगरीबाईंचे टिकमगढ येथे दीर्घकालीन आजाराने निधन झाले. भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात देशातील प्रमुख ध्रुपद गायिका म्हणून असगरी बाईंचे नाव नोंदले गेले आहे.
संदर्भ :
- Ranade, G. H., Hindusthani Music : An Outline of its Physics and Aesthetics, Poona, 1951.
समीक्षक : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.