उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल, मजूर, बाजारपेठ, वाहतूक खर्च यांसारख्या विविध आर्थिक घटकांचा विचार करून उत्पादन खर्च सर्वांत कमी आणि नफा सर्वांत जास्त मिळेल, अशा योग्य जागेची निवड करण्याच्या शास्त्रीय अभ्यासाला औद्योगिक स्थान निश्चितीचा सिद्धांत म्हणतात. एकोणिसाव्या शतकातील उत्तर जर्मनीतील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ जोहान हेन्रिक व्हॉन थ्यूनेन यांनी इ. स. १८२६ मध्ये द आयसोलेटेड स्टेट या ग्रंथातून प्रथम आर्थिक भूगोल, भूमीचा वापर यांची मांडणी केली. ती मूळ मांडणी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डेव्हिड रिकार्डो यांच्या भाडेतत्त्वाच्या सिद्धांताशी जोडून एक नवीन विचार मांडला. त्यामुळे त्यांना ‘स्थान सिद्धांताचा जनक’ असे म्हटले जाते. त्यानंतर इ. स. १८८२ मध्ये व्हिल्हेल्म लिओनार्दो या जर्मन गणितज्ज्ञाने औद्योगिक स्थान सिद्धांताचा पहिला महत्त्वपूर्ण विचार सादर केला. त्याच धर्तीवर पुढे ॲल्फ्रेड वेबर यांनी ‘औद्योगिक स्थान निश्चितीचा’ सिद्धांत विकसित करून सविस्तरपणे मांडला आणि इ. स. १९०९ मध्ये उत्पादन उद्योगांचे स्थान निश्चित करणारा सिद्धांत जर्मन भाषेत विकसित केला. नंतर इ. स. १९२९ मध्ये त्या सिद्धांताचे इंग्रजीत भाषांतर झाले. देशविदेशांतील उद्योगांचे असमान आस्थापने या समस्येला या सिद्धांताने एक विश्लेषणात्मक दृष्टीकोन दिला. प्रसिद्ध जर्मन भूगोलज्ञ वॉल्तर ख्रिस्तॉलर यांनी इ. स. १९३३ मध्ये ‘सेंट्रल प्लेस थिअरी’ (केंद्रीय स्थान सिद्धांत) मांडून त्या अनुषंगाने उद्योगांचे स्थान निश्चितवर भाष्य केले. या व्यतिरिक्त उद्योगांच्या आंतरराष्ट्रीय जागा निवडीसंदर्भात ओहलीन, थिओडोर, सबथिल, मुरे, गोएत्ते इत्यादींचेही योगदान उल्लेखनीय आहे.

वेबर यांच्या मते, उद्योगांचे स्थान हा विषय सामान्यतः मानवी वस्ती, उद्योग स्थळ, कच्च्या मालाची उपलब्धता, सेवा स्पर्धा आणि ग्राहकांच्या वागणुकीशी संबंधित भौगोलिक जागांची वैशिष्टे या महत्त्वाच्या घटकांशी निगडित असते. त्यांनी सर्व उद्योगांशी संबंधित प्रामुख्याने वाहतूक खर्च, कामगार किंमत आणि कच्च्या मालाची किंमत हे तीन सामान्य घटक आपल्या सिद्धांतात मांडले आहे. वेबर यांच्या दृष्टीकोनातून वाहतुकीच्या खर्चाच्या संदर्भात औद्योगिक स्थान स्पष्ट करून कामगार खर्च/किंमत यातील बदल आणि कच्च्या मालाची किंमत या घटकांचे परीक्षण करणेच योग्य होते. त्यासाठी वेबर यांनी पुढील गृहीतके मांडली :

  • कच्च्या मालाचे स्थान निश्चित आहे.
  • उपभोक्ता केंद्राची स्थिती आणि आकार माहित आहे.
  • कामगार पुरवठा हा अमर्यादित असून तो निश्चित दराला उपलब्ध आहे.
  • कर आकारणी, व्याज, विमा इत्यादी संस्थात्मक घटक या सिद्धांतासाठी महत्त्वहीन आहेत.
  • राजकीय प्रणाली आणि आर्थिक संस्कृती ही सर्व स्थानांसाठी एकसमान आणि स्थिर आहे.
  • पूर्ण स्पर्धेचे गृहीतकही या सिद्धांतासाठी वापरण्यात आले आहे.

पहिला प्रस्ताव : वेबर यांच्या विश्लेषणातील पहिल्या प्रस्तावानुसार ज्या ठिकाणी वाहतूक किंमत ही कमीतकमी असते, त्याच ठिकाणी उत्पादन संस्था त्यांची स्थाननिश्चिती करताना आढळतात.

वाहतूक खर्च हे किती वजनाची वाहतूक करायची आहे आणि किती अंतर पार करायचे आहे, या  दोन गोष्टींद्वारे निर्धारित होत असते. वेबर यांनी कमीतकमी वाहतूक खर्च दर्शविण्यासाठी सोबतच्या आकृतीद्वारे स्पष्ट केले आहे.

आकृतीत ‘अबक’ हा त्रिकोण आहे, ज्यात ‘अ’ समजा फक्त एकच उपभोक्ता केंद्र आहे आणि ‘ब’ आणि ‘क’ हे दोन प्रमुख कच्च्या मालाची निश्चित पुरवठा केंद्रे आहेत. ‘ब’ कच्च्या मालाच्या केंद्राकडून ‘ख’ इतका माल आवश्यक आहे आणि ‘क’ कच्च्या मालाच्या केंद्राकडून ‘ग’ इतका माल आवश्यक आहे. आणि ‘च’ हे तयार झालेल्या मालाचे वजन आहे. वरील आकृतीत बिंदू ‘ड’ ला त्रिकोणाचे तीनही कोपरे आपल्याकडे खेचत आहेत. बिंदू ‘ड’ इथे स्थीर होऊ पाहणाऱ्या उद्योगाची प्रतिमा दर्शवतो. बिंदू ‘ड’ चे स्थान हे त्रिकोणाच्या तीनही (‘अबक’) बिंदूच्या ‘ड’ बिंदुला आपल्याकडे खेचण्याच्या समतोल कसरतीवर ठरेल. या त्रिकोणाला आल्फ्रेड वेबर यांनी ‘स्थान त्रिकोण’ असे म्हटले आहे. म्हणून येथे अ-१, ब-१ आणि क-१ हे त्रिकोणाचे मुख्य बिंदू अ ब क आणि मध्य बिंदू ड यांतील अंतर दर्शविते. म्हणूनच प्रति एक उत्पादन हे एकूण टन-मैल वाहतुकीनुसार ठरेल. म्हणजेच, (ब-१) (ख) + (क-१) (ग) = (अ-१) (च).

येथे उद्योगाचे स्थान निश्चित करण्यासाठी आकृतीतील ‘ड’ बिंदूवरील समीकरणाचे मूल्य कमीतकमी असायला हवे. बिंदू ‘ब’ येथे असलेला कच्चा माल बिंदू ‘ड’ पर्यंत आणण्यासाठी ब-१ एवढे अंतर कापावे लागणार असून त्याची किंमत ब-२ आहे. बिंदू ‘क’ येथे असलेला कच्चा माल बिंदू ‘ड’ पर्यंत आणण्यासाठी क-१ एवढे अंतर कापावे लागणार आहे आणि त्याची किंमत क-२ आहे. बिंदू ‘ड’ येथे बिंदू ‘ब’ आणि बिंदू ‘क’ कडून आलेल्या कच्चा मालापासून तयार झालेले अंतिम उत्पादन हे उपभोक्ता केंद्र ‘अ’ पर्यंत नेण्यासाठी बिंदू ‘ड’ ते ‘अ’ यांमधील अ-१ एवढे अंतर कापावे लागणार आहे. ज्याची किंमत अ-२ आहे. म्हणजेच, याचे समीकरण पुढील प्रमाणे असेल : (ब-२) (ब-१) (ख) + (क-२) (क-१) (ग) + (अ-२) (अ-१) (च).

‘ख’ आणि ‘ग’ हे आवश्यक कच्च्या मालाचे प्रमाण असून ‘च’ हे अंतिम उत्पादनाचे वजन आहे.

वरील समीकरणानुसार जेव्हा या तीनही प्रकारची वाहतूक किंमत ही कमीतकमी असेल, तेव्हा बिंदू ‘ड’ जवळ उद्योग स्थापित होईल.

दुसरा प्रस्ताव : वाहतूक किमतीव्यतिरिक्त ‘कामगार किंमत’सुद्धा उद्योगाचे स्थान निश्चित करते. पहिल्या प्रस्तावातील वेबरच्या समीकरणाप्रमाणे जर वाहतूकखर्च हा कमीतकमी म्हणजेच अनुकूल असेल आणि कामगार किंमत प्रतिकूल म्हणजेच खूप जास्त असेल, तर उद्योगाचे स्थान निश्चित करणे कठिण होते. एखाद्या उद्योगासाठी कामगार किंमत खूप महत्त्वाचा घटक असू शकतो. उदा., चर्म उद्योग, खाद्य उद्योग, इत्यादी. कामगार किंमत हा घटक उद्योगामध्ये किती महत्त्वाचा आहे, हे ठरविण्यासाठी वेबरने कामगार किंमत निर्देशांक निश्चित केला.

कामगार किंमत निर्देशांक = कामगार किंमत ÷ उत्पादनाचे वजन

कामगार किंमत निर्देशांक मूल्य खूप जास्त असेल, तर असे म्हणता येईल की, मजुरांवरील किमतीची बचत ही वाहतूक किमतीतील वाढीपेक्षा जास्त आहे. याउलट, कामगार किंमत निर्देशांकाचे मूल्य कमी असेल, तर वाहतूक किंमत ही उद्योगाचे स्थान निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरून उद्योग हे कामगार केंद्राच्या जवळ स्थापित होत नाहीत.

तिसरा प्रस्ताव : वेबरने तिसऱ्या प्रस्तावात उत्पादन साहित्याचा निर्देशांक मांडला असून साहित्य निर्देशांक किंवा कच्च्या मालाच्या स्रोताचे परिणाम उद्योगांच्या स्थान निश्चितीत तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावतात, असे म्हटले आहे. साहित्य निर्देशांकांचा उपयोग हा उद्योगांच्या स्वरूपांचे वर्गीकरण त्यांच्या कच्च्या मालाच्या उपयोगानुसार करता येण्यासाठी होतो.

साहित्य निर्देशांक = स्थानिक सामुग्रीचे वजन ÷ तयार उत्पादनाचे वजन

साहित्य निर्देशांक एकापेक्षा जास्त असेल, तर उद्योगांनी कच्च्या मालाच्या स्रोतांच्या जवळपास स्थित व्हावे. याउलट, साहित्य निर्देशांक एकापेक्षा कमी असेल, तर उद्योग हा उपभोग/वापर केंद्राच्या जवळ स्थित असावा, असे वेबर म्हणतात.

वरील तीनही प्रस्तावांव्यतिरिक्त इतर असे काही दुय्यम घटक आहेत की, जे उद्योगांचे स्थान निश्चित करण्यामध्ये सहभागी होतात.

  • एकत्रीकरणाचे घटक (ॲग्लोमिरेटिव्ह फॅक्टर्स) : असे घटक की, ज्यामुळे एका विशिष्ट ठिकाणी उद्योग केंद्रीकृत होतात. उदा., बँका, विमा सुविधा, वीज, पाण्याची सुविधा इत्यादी.
  • विखुरलेले निरनिराळे घटक (डिग्लोमिरेटिव्ह फॅक्टर्स) : असे घटक की, जे उद्योगांच्या विकेंद्रीकरणासाठी कारणीभूत ठरतात. उदा., जमीन भाडे, कर दर, सरकारी अनुदान इत्यादी.

वेबरने ‘उत्पादन निर्देशांक’ मांडला असून उत्पादन निर्देशांक एकूण उत्पादन खर्चाच्या वास्तुनिर्माण खर्चाचे प्रमाण दर्शवितो, असे म्हटले आहे. जर या निर्देशांकाचे मूल्य जास्त असेल, तर उद्योगांचे एका स्थानावर आणि स्थानाच्या आजूबाजूला एकत्रीकरण झालेले आढळून येते. याउलट, याचे मूल्य कमी असल्यास उद्योगांच्या स्थान निश्चितीमध्ये असमानता आढळून येऊन उद्योग विखुरल्यासारखे आढळतात.

उत्पादन निर्देशांक = उत्पादन/वास्तुनिर्माण खर्च ÷ एकूण उत्पादनाचा खर्च

वेबरने मांडलेल्या औद्योगिक स्थान निश्चिती सिद्धांतावर पुढील टीका करण्यात आल्यात :

  • अव्यवहार्य/अयोग्य गृहीतके : वेबरने औद्योगिक स्थाननिश्चिती सिद्धांत खूप जास्त प्रमाणात सोपा केला आहे. प्रत्यक्षात औद्योगिक स्थान निश्चितीवर अनेक वेगवेगळे घटक परिणाम करत असून ते सगळे खूप गुंतागुंतीचे आहे. सिद्धांतातील अनेक गृहीतके अव्यवहार्य आहेत. वजन आणि अंतरासाठी वाहतुकीची किंमत निश्चित करण्यासाठी वेबरने केवळ दोन घटक घेतले आहेत. त्याने वाहतुकीचे प्रकार, वाहतुकीच्या वस्तूंची गुणवत्ता, भूगोलशास्त्र, प्रदेशाचे वैशिष्ट्य इत्यादी जागा दिल्या नाहीत असे काही तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
  • कामगार पुरवठा हा अमर्यादित असून तो निश्चित दराला उपलब्ध आहे, हा सिद्धांतातील विचार सदोष आहे. वास्तवात कामगार पुरवठा हा अमर्यादित आणि निश्चित दराला नसतोच. प्रत्यक्षात प्रत्येक नवीन उद्योग नवीन कामगार केंद्र तयार करत असतो आणि त्यांचा दर हा अर्थव्यवस्थेतील चढ-उतार, कामगार कौशल्य अशा अनेक घटकांनी बदलत असतो.
  • राजकीय, ऐतिहासिक आणि सामाजिक घटकांचा या सिद्धांतात अजिबात उल्लेख झालेला नाही.
  • अँड्रियास प्रिडोहल यांच्या मते, वेबरच्या सिद्धांतातील विचार हे खूपच निवडक आहे. त्यांनी परिवहन खर्च आणि कामगार खर्च केवळ सामान्य खर्च आहे, असे म्हटले आहे; मात्र भांडवली खर्च आणि व्यवस्थापन खर्च यांचा त्यामध्ये समावेश का होऊ शकत नाही, हे सांगण्यात तो अपयशी ठरला आहे.

वेबरच्या औद्योगिक स्थान निश्चिती सिद्धांतावर काही प्रमाणात टीका करण्यात आले असले, तरी त्यांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार औद्योगिक क्षेत्रांची रचना दिसून येते.

संदर्भ :

  • कुलकर्णी, अविनाश, औद्योगिक अर्थशास्त्र, पुणे, २०२१.
  • Friedrich, C. J., Alfred Webers : Theory of the Location Industries, Chicago, 1929.
  • Launhardt, Wilhelm, Theorie der Tarifbildung der Eisenbahnen, Springer, 1890.
  • McGraw Hill, New York, 1963.

समीक्षक : अविनाश कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.