सोहर गीते : छत्तीसगडच्या ग्रामीण लोकसाहित्यातील एक महत्त्वपूर्ण पारंपरिक लोकगीत प्रकार. ही गीते मुख्यतः प्रसूतीच्या वेळी, गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यात किंवा बाळाच्या जन्मानंतर स्त्रिया गातात. ‘सोहर’ शब्द संस्कृत ‘सौहार्द’ किंवा ‘सुख’ या अर्थापासून आला असावा. या गीतांमध्ये प्रसूतीच्या वेदना, मातृत्वाचा आनंद, नवजात बालकाला आशीर्वाद आणि कुटुंबीय संबंध यांचे चित्रण असते. स्त्रिया गटाने, हाक-प्रतिहाक पद्धतीने, तालबद्ध टाळ्या वाजवत गातात. हे गीते केवळ मनोरंजन नव्हे तर सामाजिक-धार्मिक विधीचा भाग आहेत. त्यात बालकाच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि कुटुंबाच्या समृद्धीची कामना व्यक्त होते. छत्तीसगडच्या लोकसंस्कृतीत सोहर गीत मातृत्वाच्या उत्सवाचे प्रतीक आहे.

सोहर गीते छत्तीसगडच्या संपूर्ण ग्रामीण भागात प्रसिद्ध आहेत. विशेषतः रायपूर, दुर्ग, बिलासपूर, राजनांदगाव, बस्तर, कांकेर आणि सरगुजा विभागात ही गीते लोकप्रिय आहेत. बस्तरच्या आदिवासी भागात आणि मैदानी भागात ही गीते वेगवेगळ्या रूपात गायली जातात. छत्तीसगडच्या ग्रामीण स्त्रिया (विशेषतः ओडिया, छत्तीसगढी आणि गोंडी भाषिक समुदाय) यात सक्रिय सहभाग घेतात. शहरी भागातही लग्नसमारंभ किंवा जन्मोत्सवात ही गीते आता ऐकली जातात. छत्तीसगडच्या लोकगीत परंपरेत सोहर या गीतांना ‘करमा’, ‘ददरिया’, ‘सुआ’ आणि ‘फाग’ गीतांसोबत समान महत्त्वाचे स्थान आहे.

सोहर गीतांची परंपरा प्राचीन भारतीय लोकसाहित्यात आढळते. रामायण आणि महाभारतात बालकांच्या जन्मावेळी गायल्या जाणाऱ्या गीतांचा उल्लेख आहे. छत्तीसगडच्या सोहर गीतांत भगवान कृष्ण आणि रामाच्या जन्माची पुनरावृत्ती केली जाते. उदाहरणार्थ, “सते सखी आगू चले, सते सखी चले, सते सखी हो ललना, बीच मे दशदा महारानी चले हो यमुना पाणी हो” या ओळींमध्ये नंद आणि सासरच्या बहिणींच्या संवादातून कृष्णजन्माचे चित्रण आहे. हे गीते मौखिक परंपरेतून चालत आले आहेत. मध्ययुगीन भक्ती साहित्यात आणि लोककथा संग्रहात सोहरचा उल्लेख आढळतो. ब्रिटिश काळातील लोकसंग्रहणात सोहर गीतांचा समावेश आहे. हे गीते छत्तीसगडच्या आदिवासी आणि ग्रामीण संस्कृतीत प्राचीन काळापासून रुजलेले आहेत. त्यात मातृत्व, कुटुंब आणि निसर्ग यांचा दार्शनिक मेळ साधला गेला आहे.

सोहर गीते मुख्यतः गावातील स्त्रिया गातात. पारंपरिकपणे कुटुंबातील वृद्ध स्त्रिया, सासू-बहू किंवा मित्रमंडळी हे गीत गातात. आधुनिक काळात मात्र छत्तीसगढी लोकगायकांनी या गीतांना नवे रूप दिले आहे. आरती सिंह आणि चंपा निषाद यांच्या आवाजात ‘झूलना मा झूले’, ‘डिग डिगा डिग डिगा हो’ सारखी गीते खूप लोकप्रिय आहेत. ओ.पी. देवांगन यांनीपारंपरिक स्वरात सोहर गीत ध्वनिमुद्रित केले आहेत. या गीतांतील तत्त्वज्ञान म्हणजे ‘सहनशीलता आणि आशावाद’. प्रसूतीची वेदना ही जीवनाची किंमत आहे, पण त्यातूनच नवजीवन जन्म घेते. गीतांमध्ये निसर्ग (यमुना, झाडे), देवता आणि कुटुंब यांचा उल्लेख असतो . तत्त्वज्ञानात ‘परस्पर सहकार्य’ आणि ‘कुटुंबीय स्नेह’ यांचे महत्त्व आहे. हे गीते केवळ जन्मोत्सव नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत. त्यात स्त्रीशक्ती, मातृत्व आणि पिढी सातत्य यांचा आदर व्यक्त होतो. छत्तीसगडच्या ग्रामीण जीवनात हे गीते मानसिक आधार देतात.

संदर्भ : Dube, S. C. Field Songs of Chhattisgarh , Lucknow , 2007.

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.