मरी, जोझफ : (१ एप्रिल १९१९ — २६ नोव्हेंबर २०१२). अमेरिकन शल्यचिकित्सक. त्यांनी मानवी रोगांच्या उपचारांमध्ये अवयव आणि पेशी प्रत्यारोपणासंबंधीचे संशोधन केल्यामुळे ई. डोनाल टॉमस यांच्यासह १९९० मधील शरीरक्रियाशास्त्र वा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून प्रदान करण्यात आले.

मरी यांचा जन्म मिलफर्ड येथे झाला. शालेय वयातच त्यांना फुटबॉल, बर्फातील हॉकी व बेसबॉल खेळात आवड होती. बेसबॉल या खेळात भविष्य घडविता यावे याकरिता त्यांनी होली क्रॉस महाविद्यालयात प्रवेश घेतला, परंतु बेसबॉल खेळाच्या वेळा व प्रयोगशाळेतील प्रयोगांच्या वेळा एकसारख्याच असल्याने त्यांना बेसबॉल खेळ सोडून द्यावा लागला. तत्त्वज्ञान व इंग्रजी विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली (१९४०). नंतर त्यांनी केंब्रिज येथील हार्व्हर्ड मेडीकल स्कूलमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली (१९४३). त्यानंतर त्यांनी बॉस्टन येथील पीटर बेंट ब्रिघम हॉस्पिटलमध्ये (आताचे ब्रिघम अँड विमेन्स हॉस्पिटल) निवासी शल्यचिकित्सक आणि मुख्य प्रत्यारोपण शल्यचिकित्सक (१९६४—८६) म्हणून काम केले. पुढे त्यांनी बॉस्टन येथील चिल्ड्रन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटरमध्ये मुख्य प्रत्यारोपण शल्यचिकित्सक पदावरही काम केले (१९७२—८५). त्यानंतर ते हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमध्ये शल्यचिकित्सेचे प्राध्यापकही झाले (१९७०) आणि तेथूनच ते गुणश्री प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले (१९८६).

मरी यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान जखमी सैनिकांवर त्वचेचे प्रत्यारोपण केले. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की प्रत्यारोपण केवळ एकसारख्या जुळ्यांमध्येच सुसंगत होते. या अनुभवावरून त्यांनी अंतर्गत अवयवांच्या प्रत्यारोपणाकरिता कुत्र्यांवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रयोग केले. त्यांनी जनुकीयदृष्ट्या जुळ्या दात्याद्वारे १९५४ मध्ये आणि समजाती दात्याद्वारे १९६२ मध्ये यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. त्यानंतर त्यांनी समजाती प्रत्यारोपण आणि मृत्युत्तर प्रत्यारोपण पद्धतींनी जागतिक पातळीवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे प्रयोग यशस्वी केले. त्यांनी इमुरान (ॲझॅथिओप्रिन) व प्रेड्‍निसोलोन या प्रत्यारोपण अस्वीकृतता विरोधात प्रभावी औषधांची निर्मिती केली. त्यामुळे संबंध नसलेल्या दात्यांचेसुद्धा प्रत्यारोपण यशस्वी झाले आणि प्रत्यारोपण तंत्र अधिक विकसित झाले. त्यांनी अनेक शल्यविशारदांना अवयव प्रत्यारोपणाचे प्रशिक्षणसुद्धा दिले.

मरी यांना शल्यचिकित्सक व शल्यशस्त्रक्रियामधील प्रामुख्याने अवयव प्रत्यारोपणातील योगदानामुळे पुढीलप्रमाणे अनेक मान-सन्मान मिळाले : राष्ट्रीय शास्त्र अकादमीचे सभासदत्व, अमेरिकन शल्यविशारद संघटनेचे पदक, अमेरिकन प्लॅस्टिक सर्जन अवॉर्ड तसेच नॅशनल किडनी फाउन्डेशन तर्फे जीवनगौरव’ पुरस्कार इत्यादी. त्यांनी स्वत:चे सर्जरी ऑफ द सोल : रिफ्लेक्शन्स ऑन अ क्यूरियस करिअर नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले (२००१).

मरी यांचे निधन बॉस्टन येथे झाले.

कळीचे शब्द : #अवयव #प्रत्यारोपण

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.