जगातील अनेक देशांचे एकमेकांतील आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध कमी होणे अथवा आकुंचन पावणे या प्रक्रियेला ‘अ-जागतिकीकरण’ असे म्हणतात. ही संकल्पना जागतिकीकरणाच्या उलट आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील अनेक राष्ट्रे एकमेकांशी अनेक प्रकारे एकत्रितपणे निगडीत असतात. त्यांच्यात भांडवल, श्रमिक, उद्योगधंदे, उत्पादन, बाजारसंस्था, व्यापार अशा अनेक घटकांचे एकत्रीकरण व त्यांचे देशादेशांतील सहजतेने होणारे विस्तार हे सामायिक पद्धतीने होतात. अशा या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा मूळ गाभा हा उद्योगांना विस्तारित बाजारपेठ मिळवून देणे, देशांच्या सीमांपलीकडचा व्यापार शक्य करणे, व्यापार निर्बंध कमी करणे, उत्पादनाच्या घटकांना योग्य ती किंमत मिळवून देणे, जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीला चालना देणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळविणे हा होता. थोडक्यात, व्यापाराच्या उदारीकरणातून जागतिकीकरणाची प्रक्रिया सुलभतेने घडली; पण याच्या अगदी उलट अशी अ-जागतिकीकरण ही संकल्पनासुद्धा काही काळात विकसित होऊन घडून आलेली दिसते.

फिलिपीन्स देशातील फिलिपीन्स विद्यापीठातील समाजशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासनाचे प्राध्यापक वाल्दन बेल्लो यांनी सर्वप्रथम अ-जागतिकीकरण ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते, अ-जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करून स्थानिक व राष्ट्रीय अर्थव्यवस्था जास्त सशक्त आणि सक्षम करणे होय. भांडवलाच्या आधारे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत एकत्रित झालेल्या व त्यामुळे स्वतंत्र निर्णयाची क्षमता गमाविलेल्या अशा सर्व अर्थव्यवस्थांच्या अस्तित्वाबाबत अ-जागतिकीकरण प्रश्नचिन्ह उपस्थित करते. अ-जागतिकीकरणाचा अर्थ लोक, समाज, राष्ट्र, आर्थिक संस्था यांच्या भूमिकेतून आणि त्यांच्या आधारे एकत्रीकरणाची प्रक्रिया राबविणे होय. यात पुढील एकमेकींशी संबंधित अशा तीन अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया अंतर्भूत आहेत. (१) भविष्यातील जागतिकीकरण व त्याच्या वेगवेगळ्या अवस्था समजून घेणे. (२) जागतिकीकरणाच्या विस्ताराबाबत उलगडून सांगणे, त्याचा सामना करणे, प्रक्रियेचा वेग कमी करणे व त्याला विरोध करणे. (३) जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील भांडवलाचे हस्तगत करण्याबाबत अन्य पर्याय शोधणे.

अ-जागतिकिकरणाची वैशिष्ट्ये : अ-जागतिकिकरणाचे प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :

  • आंतरराष्ट्रीय व्यापारी निर्बंध : स्थानिक उद्योगांना संरक्षण मिळावे या हेतूने प्रत्येक देश आयातीवर जास्त कर (टॅरिफ्स) लावतो किंवा व्यापारावर मर्यादा आणत असतो. म्हणजेच एकप्रकारे व्यापारावर निर्बंध घालणे होय.
  • आत्मनिर्भरता : यामध्ये देश एकमेकांकडून वस्तू आयात करण्याऐवजी स्वतःच्या देशात त्या त्या वस्तूंचे उत्पादन करण्यावर जास्त भर देतात. म्हणजेच देश जागतिक पुरवठा साखळीवर (ग्लोबल सप्लाय चेन) अवलंबून न राहता स्वतःच्या गरजा स्वतः भागविण्याला प्राधान्य देऊन आवश्यक वस्तूंचे उत्पादन करण्यास सुरुवात करतात.
  • विदेशी गुंतवणुकीत घट : एका देशातून दुसऱ्या देशात होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण कमी होणे, हे अ-जागतिकिकरणाचे वैशिष्ट आहे.
  • स्थलांतरावर मर्यादा : लोकांच्या एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यावर किंवा स्थलांतर करण्यावर कडक निर्बंध लादले जातात.

रूढ अर्थाने जागतिकीकरणाचा पहिला टप्पा इ. स. १८०० ते इ. स. १९१४ (पहिले महायुद्धापर्यंत), तर दुसरा व अतिशय महत्त्वाचा टप्पा हा नव-उदारमतवादी आर्थिक विचारांतून १९९० च्या दशकापासून सुरू झाला. सर्वच देशांनी जवळजवळ मुक्त/खुल्या अर्थव्यवस्थेला खुलेपणाने/ सक्तीने मान्यता दिल्यानंतर हळूहळू जागतिक आर्थिक संकटांची मालिकाच सुरू झाली. यात १९९४ चे मेक्सिकोतील, १९९७ मधील आशियाई, १९९८-२००२ या काळातील अर्जेंटिनातील आर्थिक अरिष्ट आणि त्यानंतर पूर्ण जगाला जागतिकीकरणाबद्दल पुन्हा विचार करायला लावणारे २००८ चे अमेरिकेतील व पाठोपाठ यूरोपीय आर्थिक अरिष्ट यांमुळे अ-जागतिकीकरण व त्याच्या विचारांना सर्वत्र चालना मिळाली. सर्व जगभर आलेल्या २०१९-२० मधील कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला पुन्हा एकदा अ-जागतिकीकरणाचा विचार करायला लावले.

अ-जागतिकीकरणातील घटक : अ-जागतिकीकरणातील प्रमुख घटक पुढील प्रमाणे सांगता येतील.

  • राष्ट्रीय हित : व्यापार आणि आर्थिक धोरणामध्ये राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणे हा अ-जागतिकीकरणाचा मूळ गाभा असतो. यासाठी देश आयातीवर जकात लावणे, व्यापार अडथळे निर्माण करणे असे उपाय शोधतात. याचा परिणाम होऊन वस्तू व सेवांची उत्पादने, उत्पादनांच्या घटकांच्या देशादेशांत होणाऱ्या मुक्त हालचालींवर बंधने येतात. देशातील परकीय गुंतवणुकीचे, परदेशस्थ नागरिकांकडून देशात येणाऱ्या चलनाचे स्वरूप व प्रमाणही बदलते.
  • स्थानिक उद्योगांना संरक्षण : आयात केल्या जाणाऱ्या वस्तू जकातीमुळे महाग केल्या जाऊन स्थानिक उद्योगधंद्यांना संरक्षण दिले जाते. अमेरिका – चीन व्यापारयुद्ध हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. इंग्लंडचे यूरोपीय महासंघातून बाहेर पडणे (ब्रेक्झिट) हेसुद्धा अ-जागतिकीकरणामुळेच झाले आहे.

अ-जागतिकीकरणामुळे जागतिक व्यापाराचा संकोच होतो. अनेक देशांच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो आणि देशांची आर्थिक गणिते व तसेच व्यापारातील भागीदारही बदलतात. राजनैतिक संबंधांवरही त्याचा परिणाम होतो. उदा., देश विदेशांतील व्हिसा धोरणे, कायम वास्तव्याच्या बाबतीतील नियमही मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.

अ-जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत देशांनी विलग होणे किंवा ते पूर्णपणे स्वायत्त असणे केवळ अपेक्षित नाही, तर एकत्रीकरणाच्या प्रक्रियांचा विचार करणे, त्यांची योग्य ती बांधणी करणे आणि त्यात देशांचे नागरिक, पर्यावरण यांच्या केंद्रीभूत विकासाला प्राधान्य देणे असा विचार आहे. त्यात निसर्गचक्राच्या सीमा ओळखून त्यानुसार आपल्या आर्थिक कृती मर्यादित ठेवणे हेसुद्धा अपेक्षित आहे. जागतिक आर्थिक इतिहासात अशा प्रकारचा अ-जागतिकीकरणाचा विचार प्रथमतः पहिल्या महायुद्धानंतर झालेला दिसतो. या काळात अनेक देशांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालून त्यांच्या अर्थव्यवस्थाना मोठ्या प्रमाणात संरक्षण दिले. याच काळात देशांच्या चलनाचे स्पर्धात्मक अवमूल्यनसुद्धा झालेले आढळून येते. सध्या जागतिकीकरणाचे अनेकविध अनिष्ट परिणाम जाणवू लागल्यावर पुन्हा एकदा अ-जागतिकीकरणाचा विचार प्रबळ होताना दिसतो आहे.

थोडक्यात, अ-जागतिकीकरणामध्ये एखादा देश जागतिक प्रवाहात येण्यापेक्षा तो स्वत:ला जास्त महत्त्व देऊन आपल्या स्वतःच्या आर्थिक, व्यापारी आणि सांस्कृतिक सीमा सुरक्षित ठेवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत असतो.

संदर्भ :

  • Journal of International Business Studies, 2019.
  • https://systemicalternatives.org/

समीक्षक : संतोष दास्ताने


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.