मासकावा, तोशिहिडे : (७ फेब्रुवारी १९४० – २३ जुलै २०२१). जपानी भौतिकशास्त्रज्ञ. निसर्गात क्वार्कचे किमान तीन प्रकार अस्तित्वात असल्याचा अंदाज लावणाऱ्या खंडित सममितीच्या उत्पत्तीचा शोध लावल्याबद्दल तोशिहिडे आणि माकोटो कोबायाशी यांना २००८ मधील भौतिकशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक अर्धे विभागून देण्यात आले. तर अवअणू भौतिकीतील उत्स्फूर्त खंडित सममिती यंत्रणेचा शोध लावल्याबद्दल योइचिरो नांबू यांना अर्धे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

मासकावा यांचा जन्म जपानमधील नागाया शहरात झाला. त्यांनी नागाया विद्यापीठातून पदवी आणि पीएच.डी पदवी (१९६७) संपादन केल्यात. त्यांनी त्यांचे संशोधन शोईची सकाता यांच्या मार्गदर्शनाखाली केले असून त्यांचा संशोधनाचा विषय कणभौतिकशास्त्र शाखेतील होता. त्यांनी टोकियो विद्यापीठाच्या अणू अभ्यास संस्थेत आणि क्योटो-सांग्यो विद्यापीठात अध्यापन केले. ते क्योटो विद्यापीठातील युकावा सैद्धांतिक भौतिकशास्त्र संस्थेचे संचालक होते (१९९७ — २००३). तेथून ते गुणश्री प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. नागोया विद्यापीठात ते विशेष निमंत्रित विद्यापीठीय प्राध्यापक होते.

सममिती हे निसर्गाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून कण-प्रतिकण यांनाही हे तत्त्व लागू असल्याचे भौतिकशास्त्रज्ञांची धारणा होती. परंतु केऑन (के मेसॉन) कण सममिती तत्त्वाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आले. अणूतील न्यू्ट्रॉन आणि प्रोटॉन हे क्वार्क कणांनी बनलेले असून त्यांचे निसर्गत: तीन गट असावेत असा निष्कर्ष मासाकावा आणि कोबायाशी यांनी काढला. त्यांनी १९७२ मध्ये क्वार्कच्या चार प्रकाराव्यतिरिक्त (फ्लेवर्स; अप, डाउन, चार्म, स्ट्रेंज) किमान दोन अतिरिक्त क्वार्क अस्त‍ित्वात असल्यास अवअणू कणांच्या मानक प्रतिकृतीचा प्रभारसंयुग्मन-समता उल्लंघन (CP voilation) हा अंगभूत गुणधर्म असल्याचे प्रस्तावित केले. पुढे नवीन दोन क्वार्कांची [बॉटम (१९७७) आणि टॉप (१९९५)] प्रयोगाद्वारे सिद्धताही करण्यात आली.

मासाकावा यांना मिळालेले काही मान- सन्मान पुढीलप्रमाणे : निशिना स्मृती पारितोषिक (१९७९), जे. जे. साकुराई पुरस्काराचे पहिले मानकरी (१९८५), जपान प्रबोधिनी पारितोषिक (१९८५), असाही पारितोषिक (१९९५), युरोपिअन फिजिकल सोसायटीतर्फे उच्च ऊर्जा आणि कणभौतिकशास्त्र पारितोषिक (२००७), चू-निची सांस्कृतिक पारितोषिक (२००८), जपान प्रबोधिनीचे सन्मान्य सदस्यत्व (२०१०) इत्यादी.

मासाकावा यांचे क्योटो येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #क्वार्क #नोबेल पारितोषिक २००८

संदर्भ :

समीक्षक : सुधीर पानसे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.