वाढत्या उत्पन्नामुळे करदाते आपोआप उच्च कर मर्यादेत ढकलले जाऊन शासनाचा कर महसूल वाढतो; मात्र नागरिकांची खर्च करण्याची क्षमता कमी होते, याला राजकोषीय ओढ
असे म्हणतात. यास वित्तीय सहजविस्तार असेही म्हणतात. राजकोषीय ओढ या संकल्पनेबाबत अमेरिकेच्या आर्थिक सल्लागार समितीचे तत्कालीन अध्यक्ष गार्डनर ॲकले यांच्या लिखाणात आढळते. सार्वजनिक व्ययाच्या क्षेत्रात स्वयंचलित स्थिरके ही एक महत्त्वाची संकल्पना असून तिच्याशीदेखील राजकोषीय ओढीचा संबंध आहे. सर्वसाधारण कर दरावर चलनवाढीचा होणारा परिणाम, असे राजकोषीय ओढ या संकल्पनेचे साधे व सोपे वर्णन करता येते. मुळात अर्थशास्त्रीय परिभाषेत राजकोषीय ओढीचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात : एक, ज्यामुळे आर्थिक प्रगती वा विकासाला खीळ बसेल, असे घटक किंवा संबध नसलेल्या घटकांवर विनाकारण ताण पडून त्यांच्याही नकळत ते एखाद्या आर्थिक प्रक्रियेत ओढले जाणे. सार्वजनिक वित्त या विषयात अतिशय मोठा अधिकार असलेले अर्थतज्ज्ञ मसग्रेव्ह यांनी राजकोषीय ओढीची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते, ‘करांचे दर आणि खर्चाच्या योजना स्थिर असतील, तर कर उत्पन्नात जी अंगभूत वाढ होते, ती वाढ पूर्ण रोजगार उत्पन्न पातळीला वाढीव शिल्लक दिसून येते; त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक प्रकारची ओढ जाणवते, हीच राजकोषीय ओढ होय’.
प्रगतीशील कराच्या बाबतीत जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न वाढत असते, तेव्हा आपोआपच कोणत्याही विशेष प्रयत्नाशिवाय कर महसूल हा लोकांच्या खर्चयोग्य उत्पन्नापेक्षा खूप जास्त वाढतो; कारण आर्थिक वृद्धीच्या काळात प्रगतीशील प्रत्यक्ष कर महसूल वाढतो, तसेच अधिकाधिक करदाते करांच्या जाळ्यात आपोआपच अडकले जातात. त्याच प्रमाणे आर्थिक वृद्धीचा एक सहज परिणाम हा चलनवाढीच्या रूपात समोर येतो. चलन वाढीच्या निर्देशांकाशी उत्पादन घटकांचे उत्पन्न निगडीत असते. म्हणजे, जितकी चलनवाढ जास्त, तेवढे नाममात्र उत्पन्न जास्त असते आणि त्याच प्रमाणात सरकारला मिळणारा महसूलही वाढत असतो. राजकोषीय ओढ यामध्ये चलन वाढीमुळे वास्तव उत्पन्नात वाढ झालेली नसते, तरीही करदात्यांवर कराचे ओझे मात्र जास्त पडते. एका बाजूने कर महसूलाच्या रूपातील सरकारी उत्पन्न स्वयंचलित पद्धतीने वाढत जाते, उत्पादन घटकांचेही उत्पन्न चलनवाढीमुळे वाढत असते; पण त्याचा उपभोग घेणे व वस्तू व सेवा यांची मागणी वाढणे हे शक्य होत नाही. म्हणजेच वस्तू व सेवा यांची मागणी आणि त्यानुसार त्यांचा पुरवठा या आर्थिक चक्राला खीळ बसते. उत्पादन घटकांचे नाममात्र उत्पन्न केवळ वाढल्यामुळे असे सर्व घटक प्रगतीशील करप्रणालीत वरच्या श्रेणीत आपोआप जातात आणि त्या श्रेणीत अर्थातच करदर जास्त असल्याने (प्रगतीशील करप्रणाली) सरकारचा कर महसूल वाढतो; मात्र उत्पादन घटकांसाठी एक प्रकारची ओढ किंवा ताण निर्माण होते, एकूणच कर ओझ्याचे असंतुलन निर्माण होते. अशा प्रकारची राजकोषीय ओढ ही प्रामुख्याने जेथे नाममात्र उत्पन्न हे करदर निश्चितीचा आधारभूत घटक असतो, अशा अर्थव्यवस्थांमध्ये निर्माण होऊन तेथील अर्थव्यवस्थेला या ओढीची झळ बसू शकते.
राजकोषीय ओढ ही नाममात्र आणि वास्तव अशा दोन प्रकारे आढळून येते: मात्र या दोन्ही प्रकारांचे आर्थिक परिणाम मात्र वेगवेगळे असतात. चलनवाढीमुळे कर महसूल वाढत जाते.
प्रगतीशील कराचा संबंध जर चलनवाढीशी निर्धारित केला नसेल, तर चलनवाढीमुळे करदाते सीमांत करपात्र उत्पन्नाच्या वरच्या पातळीत ढकलले जाऊन करउत्पन्न गुणोत्तर वाढते. म्हणजे,च प्रत्यक्ष आर्थिक वृद्धी न होता केवळ सरकारचे करउत्पन्न वाढते. यालाच नाममात्र राजकोषीय ओढ असे म्हटले जाते. याउलट, जेव्हा राजकोषीय ओढ ही चलन वाढीवर अवलंबून नसते आणि करउत्पन्न गुणोत्तर वाढल्याने जेव्हा वास्तव उत्पन्न वाढते, तेव्हा खऱ्या अर्थाने आर्थिक वृद्धी होत असते. अशा प्रकारची राजकोषीय ओढ ही अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करते. नाममात्र राजकोषीय ओढ ही एक प्रकारे मुद्राभ्रम (मनी इल्यूशन) निर्माण करत असते.
राजकोषीय ओढ टाळण्यासाठी कराचा व कराच्या भाराचा संबंध करदात्यांच्या वास्तव उत्पन्नाशीच लावायला हवा. कर प्रगतीशील करताना वास्तव उत्पन्न विचारात घेतले, तरच सरकारचा महसूल वाढेल; वस्तू व सेवा यांची मागणी व त्यानुसार त्यांचा पुरवठा हे चक्र अबाधित राहील आणि आर्थिक वृद्धीला खीळही बसणार नाही. याचा परिणाम म्हणून उत्पादन घटकांसाठी राजकोषीय ओढ किंवा ताणाची परिस्थिती निर्माण होणार नाही.
संदर्भ : https://econpapers.repec.org/
समीक्षक : अविनाश कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.