सत्कर्माचे व असत्कर्माचे फळ कर्त्याला भोगावेच लागते. कर्ता म्हणजे जीवात्मा; हा या दृश्य भौतिक देहाहून निराळा आहे. कर्माप्रमाणे तो उच्च वा नीच योनींमध्ये शिरून जन्म घेत असतो. ही जन्म-मरण-परंपरा अनादी कालापासून सुरू असते. यालाच ‘संसार’ हा ‘सतत फेरी’ या अर्थी असलेला पारिभाषिक शब्द लावलेला आहे. जीवात्म्याच्या कर्मानेच देह व भोवतालचे विश्व निर्माण होते. सर्व सृष्टी ही जीवात्म्याच्या कर्मफलाच्या भोगार्थ, अनादी कालापासून निर्माण होत असते. कर्म हे जीवाचे बंधन आहे. प्रत्यक्ष होणारे कर्म सत् असेल, तर त्यातून पुण्य उत्पन्न होते व असत् असेल, तर त्यातून पाप उत्पन्न होते. पाप व पुण्य ह्यांनाच ‘अदृष्ट’ अशी संज्ञा आहे. त्यांना अदृष्ट म्हणण्याचे कारण, कर्म जसे दिसते तसे कर्माचे पाप किंवा पुण्य हे परिणाम जीवात्म्याला किंवा कर्त्याला दिसत नाहीत. जैन मतानुसार कर्मद्रव्य (पुद्गल=द्रव्य) अदृष्ट असते. भोगरूप फळ उत्पन्न होईपर्यंत ती पाप-पुण्ये जीवात्म्यात राहतात; ती त्याला फळ दिल्याशिवाय सोडत नाहीत; म्हणून कर्मास ‘बंधन’ असे म्हटले आहे. अदृष्ट पाप-पुण्यालाही ‘कर्म’ हीच संज्ञा आहे. इंद्रादी देव, असुर, गंधर्व, किन्नर, राक्षस, पिशाच किंवा भूत, मनुष्य, पशू, पक्षी, सरीसृप, कीटक, मत्स्यादी जलचर, वृक्षवनस्पती इ. उद्भिद या सर्व जीवयोनी होत. अद्वैत वेदान्त मताने ब्रह्मदेव हाही अत्यंत उन्नत स्थितीला गेलेला देव जीवात्माच आहे. द्वैती वैष्णवांच्या मते ब्रह्मदेव व शिव हे दोन्हीही विष्णुभक्तीने पराकाष्ठेस पोहोचलेले जीवात्मेच होत. परंतु सांख्य तत्त्वज्ञानाचा अंगीकार केलेले वेदान्ती किंवा न्याय-वैशेषिक हे सेश्वरवादी काही तत्त्वज्ञ ब्रह्मा, विष्णु व शिव ही क्रमाने रज, सत्त्व व तम या गुणांनी उत्पत्ती, स्थिती व लय ही सृष्टीची कार्ये करणार्या एकाच ईश्वराची तीन स्वरूपे होत, म्हणून हे तिघे जीवात्मे नव्हेत असे मानतात. चांगल्यावाईट कर्माच्या प्रतीप्रमाणे या वर उल्लेखिलेल्या विविध जीवयोनींत जीवात्मा जन्म घेतो. योनी दोन प्रकारच्या : कर्मभूमी व भोगभूमी. मनुष्यदेह ही कर्मभूमी मानलेली आहे; ती भोगभूमीही आहे. परंतु मनुष्येतर योनी ह्या साधारणपणे भोगभूमीच मानल्या आहेत. स्वर्गलोग, मृत्युलोक व नरकलोक असे भोगभूमीचे तीन विभाग धर्मग्रंथांत सांगितले आहेत. सत्कर्म दुष्कर्मापेक्षा अधिक असल्यास, जीवात्म्याचा स्वर्गीय संसार सुरू होतो. सत्कर्म व दुष्कर्म समान असल्यास मनुष्ययोनी प्राप्त होते आणि दुष्कर्म अधिक असल्यास जीवात्म्याचा नरकलोकीय संसार सुरू होतो, असेही पुराणांमध्ये म्हटले आहे. तात्पर्य, कर्मवादाच्या सिद्धांताची तीन गृहीततत्त्वे आहेत : (१) जीवात्मा, (२) कर्मांचा अदृष्ट पाप-पुण्यरूप परिणाम व (३) कर्माप्रमाणे मृत्यूनंतर देहांतराची अवश्य प्राप्ती म्हणजे अनादी जन्म-मरण-परंपरा अथवा संसार. एकंदरीत कर्मवादाचे वरीलप्रमाणे स्वरूप आहे.
ही तीन गृहीततत्त्वे सनातनी हिंदू, बौद्ध, जैन, शीख इ. सर्व भारतीय उच्च धर्मांची गृहीततत्त्वे होत. जगातील यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम, पारशी इ. उच्च धर्मांमध्ये या गृहीततत्त्वांपैकी तिसरे गृहीततत्त्व म्हणजे संसारतत्त्व अथवा पुनर्जन्मतत्त्व अथवा अनादी जन्म-मरण-परंपरा, मानीत नाहीत. यहुदी, ख्रिस्ती, इस्लाम इ. पश्चिमेकडील धर्म देहव्यतिरिक्त जीवात्मा आणि स्वर्ग व नरकरूपी परलोकगती किंवा मरणोत्तरस्थिती मानतात. जीवात्मा हा ईश्वरसृष्ट असून तो अमर आहे, असेही ते मानतात. भारतीय उच्च धर्म जीवात्मा अनाद्यनंत किंवा नित्य आहे, असे मानतात. भारतीय धर्मांचा दुसरा विशेष असा आहे, की स्वर्ग किंवा नरक यांच्यात जीवात्म्याचा निवास शाश्वतकालपर्यंत असतो, असे ते मानीत नाहीत; तसे पश्चिमेकडील धर्म मानतात. शाश्वतकालपर्यंत मृत्यूनंतर जीवात्मा स्वर्गात किंवा नरकात अनंतकालपर्यंत कायम राहतो, असे ते मानतात. परंतु भारतीय धर्मांच्या दृष्टीने पाप किंवा पुण्य हे कर्मजन्य असल्यामुळे तेही सान्तच आहे; म्हणून स्वर्गवास किंवा नरकनिवास सान्तच ठरतो. स्वर्गापेक्षा किंवा कोणत्याही सुस्थितीपेक्षा अत्यंत उच्च अशी स्थिती भारतीय धर्मांप्रमाणे मोक्षस्थिती होय. मोक्ष हा तेवढा नित्य होय.
भारतीय धर्मांप्रमाणे कर्मे कायिक, वाचिक व मानसिक अशी तीन प्रकारची असतात. ह्या तीन प्रकारांपैकी प्रत्येक प्रकार हा सुकृत किंवा दुष्कृत ह्या दोनही प्रकारांपैकी असतो. ह्या दोन प्रकारांचाच निर्देश बौद्ध व जैन ‘कुशल कर्म’ व ‘अकुशल कर्म’ ह्या दोन संज्ञांनी करतात. सत्कर्म व असत्कर्म हे कसे ठरते? या प्रश्नाचे उत्तर धर्मशास्त्राप्रमाणे ठरते, असे आहे. हिंदूंप्रमाणे वेद हे मुख्य धर्मशास्त्र होय व वेदांवर आधारलेले स्मृतिग्रंथ व पुराणे हीही धर्मशास्त्रे होत. वेदादी धर्मशास्त्रे हा ईश्वराचा आदेश होय. हा आदेश म्हणजेच वेद. हे वेद शाश्वत किंवा नित्य असून ईश्वर प्रत्येक सृष्टीत हा वेदरूप आदेश प्रगट करतो, असे पूर्वोत्तर मीमांसक मानतात. वैशेषिकादी दर्शनकार हा आदेश म्हणजे वेद देवकृत आहे, म्हणजे पौरुषेय आहे, असे मानतात. वेदकर्ता पुरुष म्हणजे देव. जैन व बौद्ध मतांप्रमाणे बुद्ध, महावीर इ. वीतराग, सर्वज्ञ मुनींनी दिलेले आदेश धर्मशास्त्र होय. धर्मशास्त्रात जे विहित कर्म ते पुण्यकारक किंवा पापनाशक असते आणि धर्मशास्त्राने निषिद्ध ठरविलेले कर्म हे पापकारक व पुण्यनाशक असते. विहित सत्कर्माने सुखप्राप्ती व दुःखनाश होतो आणि निषिद्ध असत्कर्माने दुःखप्राप्ती व सुखनाश होतो, असा सर्व भारतीय धर्मांचा आशय आहे. कर्माचे अधिक स्पष्ट असे नित्य, नैमित्तिक, काम्य व निषिद्ध असे चार प्रकार धर्मशास्त्राने सांगितले आहेत. नैमित्तिक कर्मांत प्रायश्चित्तही येते. प्रायश्चित्ते ही पापक्षालनार्थ आचरावयाची असतात. नित्यकर्मे म्हणजे दैनंदिन आचरावयाची कर्मे होत. उदा., प्रातःस्नान, देवांची व पितरांची पूजा, संध्यावंदन, ईश्वरप्रार्थना इ. नित्यकर्मे होत. आश्रमभेदाप्रमाणे काही नित्यकर्मे भिन्न असतात. अग्निहोम, गुरूंचे अभिवादन इ. ब्रह्मचर्याचे नित्यधर्म होत. देवपूजा किंवा वैश्वदेव, पितृतर्पण, दान म्हणजे मनुष्ययज्ञ, भूतबली व काककीटपतंगादी प्राण्यांना अन्नदान, ही गृहस्थाश्रमाची नित्यकर्मे होत. नैमित्तिक कर्मे ही विशिष्ट निमित्त झाले असता, करावयाची असतात. उदा., विवाहयोग्य वय होणे, हे निमित्त; शिक्षणास योग्य वय होणे, हे निमित्त; नातलगांपैकी कोणी मृत झाल्यावर वर्षाने आलेली मरणतिथी, हे निमित्त; अशा ह्या निमित्तांची प्राप्ती झाली असता विवाह, उपनयन व श्राद्ध करणे प्राप्त होते. ही नैमित्तिक कर्मे होत. सगळे संस्कार ही नैमित्तिक कर्मे होत. एकादशी व्रत हे नैमित्तिक कर्म होय, नित्य नव्हे. एकादशी व्रत हे काम्यही असते. निरनिराळी व्रते प्रतिवर्षी त्या त्या देवतांच्या निमित्ताने विहित तिथीस करावयाची असतात. ती नैमित्तिक व्रते होत. यांना काही धर्मशास्त्रकार ‘नित्यकर्म’ अशीही संज्ञा देतात. कारण ती ठरलेल्या नियमाने प्रतिवर्षी येणार्या तिथीस करावी लागतात. सण व उत्सव ही नैमित्तिक कर्मे होत. त्यांत काम्य कर्मांचाही अंतर्भाव होतो. काम्य कर्मे म्हणजे पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती, रोगनिवारण, विविध प्रकारच्या यज्ञांची प्राप्ती व्हावी इ. विविध प्रकारच्या फलांच्या कामनेने प्रेरित होऊन संकल्पपूर्वक केलेली व्रते, होम, यज्ञ, पूजा, तीर्थयात्रा ही कर्मे होत. नित्य व नैमित्तिक कर्मे अनिवार्यपणे आचरावयाची असतात. ती विहित काळी न आचरल्यास पाप लागते. स्वतःच्या हातून एखादे पापकर्म घडले, तर त्याकरिता देहाला, इंद्रियांना व मनाला कष्ट देणारे तप आचरणे योग्य असते. या तपासच प्रायश्चित्त असे म्हणतात. पापाचरण हे त्याचे निमित्त होय. निषिद्ध कर्मे कोणती व निषिद्ध नसलेली कर्मे कोणती, हे धर्मशास्त्राच्या आधाराने ठरते. निषिद्ध कर्माने पाप लागते. नित्य, नैमित्तिक, काम्य व निषिद्ध कर्मांची कमीजास्त प्रतवारी असते. त्या प्रतवारीप्रमाणे तज्जन्य पुण्यसंचय, पापनाश किंवा पापसंचय ह्यांची प्रतवारी ठरत असते.
हिंदू, जैन, बौद्ध, शीख इ. भारतीय उच्च धर्म आणि चार्वाकाच्या नास्तिक भौतिकवादी दर्शनाशिवाय बाकीची वेदान्त, मीमांसा, न्यायवैशेषिक, सांख्य-योग, शैव, वैष्णव, शाक्त इ. दर्शने कर्मवाद मानतात. नीतिनियम हे ऐहिक मानवी जीवनापुरतेच मर्यादित आहेत. मनुष्यसृष्टीबाहेरच्या विश्वाच्या व्यापारात किंवा प्रक्रियेत नीतिनियमांना काही मूल्य नाही, असा ऐहिकवादी नीतिशास्त्राचा सिद्धांत भारतीय धर्मांना मान्य नाही. सदाचरण व दुराचरण म्हणजेच कर्म, हे विश्वरचनेचे तत्त्व आहे. विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय ही प्रक्रिया कर्माधीन आहे. विश्वात न्याय आहे, विश्वाची रचना नैतिक आहे, असा कर्मवादाचा अभिप्राय आहे. विश्वात न्याय आहे, ही गोष्ट जगातील सर्वच उच्च धर्म मानतात; परंतु विश्व ही कर्माची परिणती आहे, विश्वप्रेरणा ही कर्मप्रेरणा आहे, असा विचार केवळ भारतीय धर्मांनी मांडला आहे. येथे कर्म म्हणजेच पाप-पुण्यरूप अदृष्ट होय.
वेदान्त, सांख्य व योग या दर्शनांच्या मते पाप-पुण्यरूप अदृष्ट हे साक्षात जीवात्म्याच्या ठिकाणी म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नसते, तर ते त्रिगुणात्मक प्रकृतीच्या अंतःकरणरूप विकारांमध्ये उत्पन्न होते. कर्म हे संकल्पजन्य असते; म्हणजे इच्छाजन्य निर्णयाने उत्पन्न होते. राग व द्वेष ही इच्छेचीच स्वरूपे होत. संकल्प किंवा इच्छा हा मनोधर्म आहे. मनोधर्माच्या योगाने कर्म घडते. म्हणून कर्माचे परिणाम हे मनामध्येच अदृष्ट किंवा संस्काररूपाने वास करतात. यालाच ‘पुण्यवासना’ व ‘पापवासना’ असे बौद्ध धर्मात म्हटले आहे. वासना म्हणजे ‘संस्कार’. न्याय व वैशेषिक ही दर्शने पाप-पुण्यात्मक अदृष्ट हा आत्मधर्म मानतात; म्हणजे जीवात्मा हे अदृष्टाचे अधिष्ठान होय, असे मानतात. बौद्ध हे ‘आलयविज्ञान’ व ‘प्रवृत्तिविज्ञान’ अशी मनाची द्विपुटी मानतात. दोन्ही विज्ञाने ‘क्षणिकसंतान’ म्हणजे क्षणिक वस्तूंचे प्रवाह होत. प्रवृत्तिरूप कर्माला ‘कर्म’ ही संज्ञा जैन देत नाहीत. प्रवृत्तीला ते ‘योग’ अशी पारिभाषिक संज्ञा देतात. जीवात्म्याची प्रवृत्ती विषयांकडे होते, तेव्हा पाप-पुण्यात्मक पुद्गल म्हणजे द्रव्य जीवात्म्यात शिरते; पाप-पुण्यात्मक अदृष्ट द्रव्य म्हणजेच कर्म होय. पाण्यात ज्याप्रमाणे मळ मिसळून पाणी गढूळ होते, त्याप्रमाणे कर्म व जीवात्मा हे एकमेकांत मिसळून जीवात्मा बनतो व तो संसारबंधाचा भोग घेतो, असे जैन मानतात. जीवात्म्यात कर्मद्रव्य शिरण्याची पद्धती किंवा मार्ग म्हणजे ‘आस्रव’ होय. हा आस्रव अश्रद्धा मिथ्याज्ञान व मोह यांच्या योगाने विषयांकडे भोगार्थ होणार्या प्रवृत्तीने सतत सुरू असतो. संयमाच्या योगाने म्हणजे काया, वाचा व मन यांच्या निग्रहाने आणि तत्त्वचिंतनाने व तत्त्वश्रद्धेने कर्म जीवात्म्यात शिरण्याची क्रिया बंद होऊ लागते किंवा कमी होते. हा ‘संवर’ होय. देहक्लेशरूप तपाच्या योगाने व तत्त्वचिंतनाने जीवात्म्यात शिरलेले कर्म हे क्षय पावू लागते, हा क्षय ‘निर्जर’ होय. हा क्षय पूर्ण झाल्यावर जीवात्मा अत्यंत शुद्ध होतो, त्याच्या ठिकाणचे सहज चिद्रूप प्रगट होते; यास ‘मोक्ष’ म्हणतात. या मोक्षामुळे म्हणजे जीवात्म्यावरचे कर्मबंधन संपूर्ण नष्ट झाल्यामुळे, शुद्ध चिद्रूप जीवात्मा उच्चतम अशा आकाराप्रत पोहोचतो, असा जैनांचा कर्मवाद आहे.
जैनांप्रमाणेच काही पूर्वमीमांसक कर्मबंधाचा नाश म्हणजेच मोक्ष असे मानतात. त्यांच्या मते काम्य व निषिद्ध कर्मे वर्ज्य करून नित्य व नैमित्तिक कर्मे आणि त्याचप्रमाणे प्रायश्चित्त-कर्मे आचरून पापनाश होतो आणि चित्तशुद्धी होऊन किंवा आत्म्याची शुद्धी होऊन मोक्षप्राप्ती होते. केवळ चित्तशुद्धीने मोक्ष मिळत नाही; त्याकरिता आत्मसाक्षात्काराची किंवा तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते, असे बाकीचे दार्शनिक मानतात. त्यांमध्ये काही ज्ञानकर्मसमुच्चयवादीही आहेत. तत्त्वज्ञान व निष्काम बुद्धीने आचरलेले कर्म ही जोडी, कर्मबंधाचा व कर्मकारण असलेल्या अविद्येचा नाश करते, असे समुच्चयवाद्यांचे मत आहे. शंकराचार्यांच्या पूर्वीच्या मंडनमिश्रापर्यंतच्या वेदान्त्यांचा हा समुच्चयवाद होय. निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते; चित्तशुद्धीने शुद्ध तत्त्वज्ञानाचा उदय होऊन कर्मबंधाचा नाश होतो व मोक्ष मिळतो, असे नैयायिक, वैशेषिक, सांख्य, योगी, शंकराचार्य इ. दार्शनिकांचे मत आहे.
प्रारब्ध, क्रियमाण व संचित असे पाप-पुण्यरूप अदृष्टाचे तीन प्रकार होत. ज्या अदृष्टरूप पूर्वकर्माचे सुखदुःखात्मक भोग सुरू झालेले असतात, त्यास प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध म्हणजे ज्याच्या फळांचा प्रारंभ झाला आहे ते. जन्म किंवा देहप्राप्ती ही प्रारब्धाने होते. उदा., श्रीमंत कुलात किंवा दरिद्री कुलात जन्म हा प्रारब्धाने होतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अंत्यज हे जन्म प्रारब्धानेच प्राप्त होतात. देवयोनी किंवा पशुयोनी प्रारब्धजन्यच होत. क्रियमाण म्हणजे वर्तमान जन्मात जे पाप-पुण्यात्मक कर्म घड असते ते होय. ज्या पूर्वकर्माचे फळ अजून मिळालेले नसते, असे साठून राहिलेले कर्म म्हणजे संचित होय. संचिताचेच फळ सुरू झाले म्हणजे त्याला प्रारब्ध म्हणतात आणि क्रियमाण पूर्ण झाले म्हणजे त्यास फळ मिळेपर्यंत संचित म्हणतात. पूर्व जन्मातील कर्मांना फलद्रूप होण्यापूर्वीच्या स्थितीस मुख्यत: संचित म्हणण्याची रूढी आहे. या तिन्ही संज्ञा सापेक्षतया एकाच कर्माला लागू पडतात. क्रियमाणच पुढील जन्माच्या अपेक्षेने संचित या संज्ञेस प्राप्त होते व पुढील जन्मात फलद्रूप होऊ लागले म्हणजे त्यास प्रारब्ध म्हणतात.
कर्मवाद्यांमध्ये ईश्वरवादी व निरीश्वरवादी असे दोन प्रकार आहेत. पूर्वमीमांसक, सांख्य, बौद्ध व जैन हे निरीश्वरवादी होत आणि सर्व वेदान्ती, नैयायिक, वैशेषिक, पातंजल योगी, शाक्त, शैव व वैष्णव हे व अन्य तंत्रागम सेश्वरवादी होत. कर्माच्याच योगाने जीवाचे कल्याण किंवा अकल्याण होते, असे हे सर्व मानतात. या संबंधात असा आक्षेप सेश्वरवाद्यांवर येतो, की जर सृष्टी, देहप्राप्ती, कल्याण व अकल्याण हे कर्मामुळेच होते, तर ईश्वराची कल्पना मान्य करण्याची काही आवश्यकता नाही. यावर सेश्वरवाद्यांचे उत्तर असे, की कर्म हे जड किंवा आंधळे आहे. कर्माला ज्ञान किंवा विचार नाही. ते कर्म ईश्वरावाचून सृष्टीची उत्पत्ती, व्यवस्था व लय करण्यास समर्थ होऊ शकणार नाही. विश्वाची व्यवस्थित रचना ही बुद्धिपूर्वक झाली आहे, असेच मानावे लागते. विश्वाची नियमबद्धता ही कोणीतरी सर्वज्ञ व सर्वशक्तिमान रचनाकार असला पाहिजे, असे सूचित करते. तो न्यायी असला पाहिजे असेही मानावे लागते. म्हणजे सत्कर्माला सत्फल व असत्कर्माला असत्फल मिळालेच पाहिजे; नाहीतर नीतिनियमांना मूलभूत मूल्य रहात नाही. तात्पर्य, कर्मानुसारी सृष्टिव्यवस्था करणारा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वर मानला पाहिजे. हा युक्तिवाद गृहीत धरला म्हणजे ईश्वर हा सर्वतंत्र, स्वतंत्र ठरत नाही असा आक्षेप कायम राहतो. तो सर्वतंत्र, स्वतंत्र व अर्थात् कर्मनिरपेक्ष मानला, तर विश्व हे त्याने दुःखबहुल केले आहे; तो कर्मनिरपेक्ष असतो असे मानल्यास, जगातील श्रीमंती, गरिबी इ. वैषम्य त्यानेच निर्मिले आहे, असे म्हणावे लागते. दुःखबहुल संसार निर्माण केल्यामुळे तो निर्घृण ठरतो व कर्माधीन नसल्यामुळे तो वैषम्यबुद्धीचा ठरतो. असा हा बौद्धिक पेचप्रसंग उत्पन्न होतो. ईश्वर हा भक्तीच्या योगाने प्रसन्न होऊन पापमुक्त करतो आणि भक्ताचे कल्याण करतो, असे सर्व ईश्वरवादी मानतात. अर्थात भक्ती हे एक कर्म आहे, म्हणून कर्मवादाशी ईश्वरकृपेचा सिद्धांत विसंगत ठरत नाही.
कर्मवादावर आत्मस्वातंत्र्यासंबंधी मूलभूत आक्षेप असा आहे, की मागील कर्म जसे असेल तसा देह प्राप्त होतो व तशी जीवनाची परिस्थिती प्राप्त होते; सुखदुःखे ही प्रारब्धाधीन असतात, असे कर्मवादाप्रमाणे मानावे लागते; त्यामुळे आत्म्याला कसलेच स्वातंत्र्य नाही, असे मानावे लागते. यावर उत्तर असे, की आत्मस्वातंत्र्याचा प्रश्न हा मानवी आत्म्याच्या संदर्भातच उत्पन्न होतो. कोणते कर्म करावे व कोणते करू नये, याची संपूर्ण जबाबदारी मानवी जीवात्म्यावर आहे, असे नीतिशास्त्रदृष्ट्या मानावे लागते. नाही तर सर्व काही पूर्वकर्मामुळेच घडते असे मानले, तर मानवी आत्म्यावर वर्तमान स्थितीत घडणार्या सदसद्कर्माची जबाबदारी पडू शकत नाही. कारण तो पूर्वकर्मपरतंत्र आहे. पूर्वकर्मपरतंत्र असलेल्या जीवात्म्याला कर्माकर्मविवेकाचे स्वातंत्र्य नसेल आणि पापाबद्दल दंड व पुण्याबद्दल कल्याण प्राप्त होत असेल, तरे तो अन्याय ठरतो. कारण पाप करणे किंवा पुण्य करणे याचे त्याला स्वातंत्र्य नाही. यावर उत्तर असे आहे, की मानवी आत्म्याला पूर्वपुण्यामुळे विवेकबुद्धीचा प्रकाश लाभला आहे आणि त्याचमुळे त्याला त्याबरोबर कर्मस्वातंत्र्यही लाभले आहे. म्हणून मानवी देहातील बुद्धिपूर्वक केलेल्या कर्माची जबाबदारी त्याच्यावर पडते.
देहव्यतिरिक्त जीवात्मा अमर आहे आणि त्याचप्रमाणे पाप-पुण्यात्मक कर्मापासून उत्पन्न होणारे अदृष्ट हे जीवात्म्यात किंवा जीवात्म्याच्या अंतःकरणात राहून त्याच्या योगाने त्याला मरणोत्तर स्थितीत कर्मानुसार जन्म प्राप्त होतात, ही दोन्हीही कर्मवादाची गृहीततत्त्वे, धर्मशास्त्राचे प्रामाण्य म्हणजे शब्दप्रामाण्य मानल्याशिवाय, शुद्ध बुद्धिवादाच्या आधारे म्हणजे युक्तिवादाने निर्णायकपणे सिद्ध करता येत नाहीत. तसे भरपूर पुरावे मिळत नाहीत. धर्मशास्त्र म्हणजे सर्वज्ञप्रणीत ग्रंथ किंवा उपदेश. सर्वज्ञाचे अस्तित्वही बुद्धिवादाने सिद्ध होऊ शकत नाही. परंतु मानवी समाजाला नैतिक तत्त्वांचे अधिष्ठान प्राप्त करून देण्यास कर्मवादावरील श्रद्धा हा एक निश्चित उपाय होय, असे म्हणावे लागेल. ख्रिस्ती, यहुदी इ. धर्मांत कर्मवाद मानलेला नाही. त्या धर्मांतील ईश्वरवादावरील मागे सांगितलेल्या वैषम्य व नैर्घृण्य या दोषांचा आरोप निरस्त करता येत नाही. त्यांच्या मते विषम व निर्घृण सृष्टी ईश्वराने का उत्पन्न करावी, हे एक गूढच आहे.
कर्मवादाचे दार्शनिकांनी केलेले समर्थन ‘कृतप्रणाश’ व ‘अकृताभ्यागम’ या द्विविध आपत्तींच्या युक्तिवादावर आधारलेले आहे. कृतप्रणाश म्हणजे केलेल्या कर्माचा फलप्राप्ती न होताच होणारा विनाश आणि अकृताभ्यागम म्हणजे ज्या फलाकरिता आवश्यक ते कर्म केले नाही, त्या फलाची प्राप्ती. पुनर्जन्म न मानल्यास या जीवनात माणसाने केलेली जी सत्कर्मे किंवा असत्कर्मे, याच जन्मात फलद्रूप होत नाहीत, ती कर्मे वाया गेली असे म्हणावे लागते. याला कृतप्रणाश म्हणतात. त्याचप्रमाणे काही माणसांना जन्मत:च दुःखात्मक परिस्थितीत म्हणजे दरिद्र्यात, हीन जातीत अथवा रोगी अवस्थेत जन्म मिळतो व काही माणसांस सुखात्मक परिस्थितीत म्हणजे श्रीमंतीत, उच्च जातीत व निरोगी अवस्थेत जन्म लाभतो. ही जन्मतः प्राप्त होणारी दुःस्थिती वा सुस्थिती, मागील जन्म न मानल्यास दुष्कर्मावाचून वा सत्कर्मावाचून प्राप्त झाली, असे मानावे लागते. याला अकृताभ्यागम म्हणतात. पुनर्जन्म न मानल्यास सदाचरण का करावे व दुराचरण का टाळावे, याचे सम्यक उत्तर देता येत नाही. म्हणून पुनर्जन्म मानावा लागतो, असे सर्व कर्मवादी दार्शनिकांचे मत आहे. न्यायसूत्रात आणखी एक पुनर्जन्माचा समर्थ युक्तिवाद सांगितला आहे, तो असा : “वीतरागजन्मादर्शनात्”, म्हणजे जन्माला आलेले कोणतेही बालक हे जन्मत:च राग (रंग) म्हणजे प्रीती, द्वेष, भय, क्रोध इ. विकारांनी रंगलेले असते. कोणतेही बालक वीतराग म्हणजे वरील रंगांनी म्हणजे मनोविकारांनी रहित असे जन्मत: नसते. विविध विषयांबद्दलचे प्रीती, द्वेष, भय, क्रोधादी मनोविकार हे या जन्मातील अनुभवाशिवाय निर्माण होत नसतात. माता-पित्यांबद्दलची प्रीती ही जशी सहवासातील अनुभवाने उत्पन्न होते, तशीच दुग्धादी अन्नाबद्दलची जन्मसिद्ध असलेली प्रीती अनुभवानेच उत्पन्न झालेली असली पाहिजे. म्हणून पूर्वजन्मीचा अनुभव मानावा लागतो. मूल जन्मतःच रडते तसेच ते जन्मत:च भिते. ज्या विषयांबद्दलचा द्वेष वा भय बालकाला जन्मत:च असते, त्या विषयांचाही अनुभव त्याला पूर्वी असला पाहिजे, असे अनुमान होते. पूर्वी म्हणजे अर्थातच मागच्या जन्मी. सर्व जन्मसिद्ध मनोविकारांबद्दल हेच म्हणावे लागते. या जन्मामध्ये मनोविकारांची मांडणी, परिवर्तन, वाढ किंवा घट या जन्मातील अनुभवांमुळे होत असते. यावरून जन्मसिद्ध मनोविकारही अशाच पूर्वानुभवांमुळे तयार होत असले पाहिजेत, असे अनुमान करणे युक्त ठरते. या युक्तिवादाला आधुनिक डार्विन व तदनंतरचे क्रमविकासवादी यांनी क्रमविकासाच्या सिद्धांताच्या आधारे सयुक्तिक उत्तर दिले आहे, असेही म्हणता येते. त्यांनी हिंदूंप्रमाणे मागचा जन्म मानला नसला, तरी जीवजातीचा मागील इतिहास विद्यमान जन्मजात विकारांचा आधार मानला आहे. म्हणजे जीवानुवंशवाद त्यांनी मानला आहे. आधुनिक क्रमविकासवादाच्यापूर्वी वरील युक्तिवादाला पुनर्जन्म मानल्याशिवाय दुसरे कोणतेही बुद्धिवादी उत्तर देणे शक्य नव्हते. मानवशास्त्राच्या दृष्टीने कर्मवाद हा मुळात माणसाच्या पुराणकथात्मक व बुद्धिवादाधिष्ठित नसलेल्या स्वैर कल्पनांमधून निर्माण झाला आहे असे जरी म्हणता येते, तरी उपनिषदकाळापासून त्याला वरील प्रकारच्या युक्तिवादाच्या आधार मिळू लागला हे सिद्ध होते. आधुनिक क्रमविकासवादाच्या विकासापर्यंत वरील युक्तिवादाशिवाय मानवाच्या मानसशास्त्राची व नीतिशास्त्राची अन्य उपपत्ती सापडत नाही.
वरील कर्मवादाची मांडणी प्रथम छांदोग्य, बृहदारण्यक, कठ, कौषीतकी इ. प्राचीन उपनिषदांमध्ये झालेली दिसते. तत्पूर्वीच्या ऋग्वेदादी वाङ्मयात कर्मवादाची व्यवस्थित मांडणी केलेली दिसत नाही. परंतु ऋग्वेदात मरणोत्तरस्थितीचा अनेक ठिकाणी निर्देश केलेला सापडतो. देहाहून भिन्न असलेला, असु, प्राण किंवा आत्मा हा देवलोकी किंवा यमलोकी प्रयाण करतो किंवा पापीजनांनी त्यांच्या पापकर्माने निर्माण केलेल्या खोल, गंभीर अशा अंधारमय स्थानात (नरकात) त्याला पडावे लागते, असे ऋग्वेदात म्हटले आहे. स्वर्गप्राप्त्यर्थ करावयाचे यज्ञ, इतर वेदांत सांगितले आहेत. मृत्यूनंतर देवयान मार्गाने ज्ञानी व तपस्वी ब्रह्मलोकाप्रत जातात आणि यज्ञादी कर्मे करणारे लोक हे पितृयाण मार्गाने परलोकी जाऊन पुण्य भोगतात व पुन्हा मृत्युलोकात परततात, असेही वेदवाङ्मयात सांगितले आहे. पुनर्जन्माची कर्मवादावर आधारलेली कल्पना उपनिषदांमध्येच प्रथमतः तपशीलवार मांडलेली आढळते. धर्मसूत्रे, मन्वादी स्मृती, महाभारत, भगवद्गीता, जैन आगम इत्यादींत आणि बौद्धांच्या त्रिपिटकांमध्ये, विशेषत: जातकांत, पुनर्जन्माच्या कल्पनेचे विस्तृत विवरण आढळते.
संदर्भ :
- मंडनमिश्र, ब्रह्मसिद्धि:, शासकीयमुद्रणालय, मद्रास, १९३७.
- माधवाचार्य, सर्वदर्शनसंग्रह:, आनंदाश्रममुद्रणालय, पुणे, १९०६.
- वात्स्यायन, न्यायभाष्यम्, आनंदाश्रममुद्रणालय, पुणे, १९२२.
- शंकराचार्य, शारीरकभाष्यम्, आनंदाश्रममुद्रणालय, पुणे, १८९०.
- शंकराचार्य, श्रीमद्भगवद्गीताभाष्यम्, अष्टेकर प्रत, पुणे, १९१६.