बटलर, जोसेफ : (१८ मे १६९२—१६ जून १७५२). अठराव्या शतकातील प्रसिद्ध आणि प्रभावी ब्रिटिश नीतिमीमांसक व ख्रिस्ती धर्मविद्यावेत्ते. जन्म वाँटिज, बार्कशर येथे. बटलर हे प्रथम प्रेसबिटेरियन पंथाचे होते; पण तरुणपणी त्यांनी चर्च ऑफ इंग्लंडमध्ये प्रवेश केला. ऑरिअल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे त्यांचे शिक्षण झाले. तेथून पदवी घेतल्यावर १७१८ मध्ये त्यांची धर्मगुरू म्हणून नेमणूक झाली. १७३८ मध्ये ब्रिस्टलचे बिशप म्हणून व १७५१ मध्ये डरॅमचे बिशप म्हणून त्यांची नेमणूक झाली. राणी कॅरोलाइन आणि राजा दुसरा जॉर्ज यांच्या खाजगी तैनातीमध्येही त्यांनी काही काळ काम केले होते.
बटलर यांचे महत्त्वाचे लिखाण म्हणजे त्यांची ‘प्रवचने’ (सर्मन्स, १७२६) आणि त्यांचा ॲनालॉजी (१७३६) ह्या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेला ग्रंथ. विवेकवादाकडून पारंपरिक ख्रिस्ती धर्मविद्येवर आणि तिच्यावर आधारलेल्या नीतीवर जोरदार हल्ले होत असताना बटलर यांनी धर्मविद्येच्या सिद्धांतांचे आणि त्यांच्यावर आधारलेल्या नीतीचे विवेकवादाला मान्य असलेल्या भूमिकेवरून समर्थन करण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्ती धर्मविद्येचे सिद्धांत आणि त्यांच्यावर आधारलेली नैतिक तत्त्वे ईश्वराने प्रकट केली आहेत व म्हणून ती प्रमाण आहेत, अशी भूमिका ते स्वीकारीत नाही; तर ज्या प्रकारच्या युक्तिवादांच्या साहाय्याने विवेकवादी आपले नीतीविषयीचे किंवा विश्वाच्या स्वरूपाविषयीचे सिद्धांत सिद्ध करीत, त्याच प्रकारच्या युक्तीवादांचा आश्रय घेऊन बटलर ख्रिस्ती धर्मविद्येचे आणि नैतिक सिद्धांतांचे समर्थन करतात.
बटलर यांची नीतिमीमांसा मुख्यतः त्यांच्या सर्मन्समध्ये मांडण्यात आली आहे. नैतिक तत्त्वे ईश्वराने प्रकट केल्यामुळे प्रमाण आहेत, असे जर मानावयाचे नसेल, तर त्यांचे प्रामाण्य कशावर आधारता येईल ? थॉमस हॉब्स, बर्नार्ड मँडेव्हिल ह्या पारंपरिक ख्रिस्ती नीतीचे विरोधक असलेल्या तत्त्ववेत्त्यांप्रमाणेच बटलर ही तत्त्वे माणसाच्या प्रकृतीवर आधारतात; पण हॉब्स आणि मँडेव्हिल यांनी मानवी प्रकृतीविषयीच्या ज्या संकल्पनेचा पुरस्कार केला होता, तिच्याहून बटलर यांनी मांडलेली मानवी प्रकृतीविषयीची संकल्पना वेगळी आहे. हॉब्स व मँडेव्हिल, माणूस पूर्णपणे स्वार्थी असतो, हा सिद्धांत स्वीकारून त्याच्यावर नीतीची उभारणी करू पाहात होते. उलट, शाफ्ट्स्बरी हा नीतिमीमांसक परोपकाराची प्रवृत्ती हा मानवी प्रकृतीतील प्रमुख घटक आहे, असे मानून तिच्यावर नीती उभारू पाहात होता.
मानवी प्रकृतीविषयी बटलर यांनी प्रतिपादिलेली संकल्पना अधिक समतोल आहे. म्हणजे माणसांच्या प्रेरणा आणि त्यांचे वर्तन ह्यांविषयीचा आपला जो सर्वसाधारण अनुभव आहे, त्याच्याशी ती अधिक जुळणारी आहे. ह्या संकल्पनेप्रमाणे मानवी प्राकृतीत विशिष्ट इच्छा सामावलेल्या असतात. पण ह्याबरोबर स्वतःचे हित किंवा सुख साधण्याची अशी एक प्रवृत्ती माणसात असते. हिला बटलर आत्मप्रेम म्हणतात. आत्मप्रेमाशिवाय परोपकाराची–इतरांना सुख देण्याचीही–प्रवृत्ती माणसाच्या ठिकाणी असते. आत्मप्रेम आणि परोपकाराची प्रवृत्ती यांच्यात अपरिहार्यपणे विरोध असतो असे नाही. ह्या दोन प्रवृत्ती परस्परांना पूरकही ठरू शकतात. माझ्या स्वाभाविक परोपकारी प्रवृत्तीचा आविष्कार म्हणून इतरांना मी जे सुख देतो, त्यात मला स्वतःला आनंद तर लाभतोच शिवाय ह्याचा परिणाम म्हणून इतरांना मी आवडूही लागतो; तसेच ते मला सुख मिळेल असे वागतात आणि माझ्या सुखात भर घालतात. उलट, माझे आत्मप्रेम, स्वतःचे हित साधण्याची माझी प्रवृत्ती आणि माझ्या विशिष्ट इच्छा यांच्यामध्ये नेहमीच सुसंवाद असेल असे नाही. आपण एखाद्या इच्छेच्या इतक्या आहारी जाऊ की, जरी तिच्या समाधानाचा आनंद आपल्याला लाभला, तरी आपल्या इतर इच्छांकडे आपले दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्या एकंदर सुखाची, आपल्या अनेकविध पण एकात्म अशा सबंध प्रकृतीचे समाधान करण्यात आपले खरे हित किंवा सुख असते. ज्या तत्त्वांना अनुसरून वागले असता आपल्या सबंध प्रकृतीचे समाधान होते–विशिष्ट इच्छांचे किंवा प्रेरणांचे नव्हे, तर सबंध प्रकृतीचे समाधान होते–ती तत्त्वे सदसद्विवेकबुद्धी ह्या आपल्या प्रकृतीचा घटक असलेल्या मनःशक्तीला प्रतीत होतात. तेव्हा सदसद्विवेकबुद्धी ही विशिष्ट इच्छा किंवा प्रवृत्ती यांच्याहून उच्चत्तर असलेली मनःशक्ती आहे, त्यांचे नियमन करण्याचा स्वाभाविक अधिकार तिला आहे. कोणत्या प्रकारची कृत्ये स्वरूपतःच न्याय्य, योग्य किंवा चांगली आहेत, ह्याचा निर्णय ती करते आणि ह्या तत्त्वांना अनुसरून वागण्यात माणसाचे खरे हित असते. पण सदसद्विवेकबुद्धीला हे ज्ञान कसे होते आणि ते प्रमाण आहे हे आपण कसे ठरवू शकतो, ह्याचे स्पष्टीकरण बटलर करीत नाहीत. ही शक्ती ईश्वराने माणसाच्या कल्याणासाठी त्याच्या मनामध्ये आरोपित केली आहे, अशी अर्थात बटलर यांची धारणा असणार; पण हा सिद्धांत त्यांच्या नीतिमीमांसेचा भाग नाही.
ईश्वराने बायबलमध्ये पारलौकिक पदार्थाविषयीची जी सत्ये प्रकट केली आहेत, त्याच्या आधारावर विकसित केलेल्या धर्मविद्येला ख्रिस्ती परंपरेत ‘प्रकाशित धर्मविद्या’ (Revealed Theology) म्हणतात. उलट, केवळ अनुभव आणि तार्किक अनुमान यांच्या आधारे ईश्वर, आत्मा इ. पदार्थांविषयीचे जे ज्ञान मिळू शकते, त्याला ‘प्राकृतिक धर्मविद्या’ (Natural Theology) म्हणतात. बटलर यांनी प्राकृतिक धर्मविद्येवर जो ॲनालॉजी नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्याच्या सबंध नावाचे भाषांतर असे आहे : ‘निसर्गाची घडण आणि क्रम यांच्याशी प्राकृतिक आणि प्रकाशित धर्माचे असलेले साम्य’. निसर्गाची घडण आणि निसर्गक्रम यांच्या अनुभवाच्या आधारे निसर्गाचा निर्माता आहे, त्याने निसर्गनियम घालून देऊन निसर्गात व्यवस्था निर्माण केली आहे, ह्या व्यवस्थेला अनुसरून माणूस जर वागला, तर तो सुखी होतो असे मानणारे, पण ईश्वराने स्वतःविषयीची सत्ये प्रकाशित केली आहेत व त्यांचा स्वीकार केला पाहिजे, ह्या मताचे खंडन करणारे जे देववादी वा निर्मातृदेववादी (Deist) तत्त्ववेत्ते होते, त्यांना उद्देशून बटलर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचा मध्यवर्ती युक्तीवाद असा आहे : ईश्वराने स्वतःविषयीची सत्ये प्रकट केली आहेत, असे मानण्यात आणि ही जी ईश्वराकडून प्रकट झालेली सत्ये म्हणून पुढे करण्यात येतात त्यांची सत्यता सिद्ध करण्यात अडचणी आहेत यात शंका नाही, पण निसर्गात सुव्यवस्था आहे आणि निसर्गाचा शहाणा आणि दयाळू असा निर्माता आहे, हे अनुभवाच्या आधारे सिद्ध करण्यात जेवढ्या अडचणी आहेत, त्याहून काही त्या अधिक नाहीत. तेव्हा जो देववादी भूमिका स्वीकारायला तयार असेल, त्याला पारंपरिक प्रकटनवादी भूमिका स्वीकारण्यात अडचण येऊ नये. हा अर्थात दुधारी युक्तीवाद आहे. तो सफल झाला, तर देववादी, पारंपरिक ईश्वरी प्रकटीकरणावर आधारलेली श्रद्धा स्वीकारतील किंवा निसर्गात सुव्यवस्था आहे आणि तिचा निर्माता आहे, हा सिद्धांत सोडून देऊन नास्तिक बनतील. [⟶ईश्वरवाद].
परंतु ह्या युक्तीवादाची रचना बटलर यांनी जे एक महत्त्वाचे तत्त्व मांडले, त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. हे तत्त्व असे की, जे निश्चितपणे सत्य म्हणून सिद्ध झाले आहे, त्यावरच आपला व्यवहार आपल्याला नेहमी आधारता येत नाही; अनेकदा अधिक संभवनीय काय आहे, ह्याचा निर्णय करून व्यवहार आखावा लागतो.
बटलर यांची महत्त्वाची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : सेव्हरल लेटर्स टु द डॉ. क्लार्क (१७१६), फिफ्टीन सर्मन्स प्रीचेड ॲट द रोल्स चॅपल (१७२६), ॲनालॉजी ऑफ रिलिजन, नॅच्युरल अँड रिव्हील्ड, टु द कंस्टिट्युशन्स अँड नेचर (१७३६) आणि चार्ज डिलिव्हर्ड टु द क्लर्जी (१७५१).
बाथ येथे त्यांचे निधन झाले.
https://www.youtube.com/watch?v=TIz-JpvgeOc
संदर्भ :
- Babolin, Albino, Joseph Butler, Vols. 2, Padova, 1973.
- Bartlett, Thomas, Memoirs of the Life, Character and Writings of Joseph Butler, London, 1839.
- Cunliffe, Christopher, Ed. Joseph Butler’s Moral and Religious Thought : Tercentenary Essays, Oxford, 1992.
- Darwall, Stephen, The British Moralists and the Internal ‘Ought’ 1640-1740, Cambridge, 1995.
- Duncan-Jones, A. E. Butler’s Moral Philosophy, Middlesex, 1952.
- Mossner, E. C. Bishop Butler and the Age of Reason, New York, 1936.
- Penelhum, Terence, Butler, London, 1985.
- Russell, P. The Riddle of Hume’s Treatise : Skepticism, Naturalism, and Irreligion, Oxford, 2008.
- Sidgwick, H. Methods of Ethics, London, 1901.
- Tennant, Bob, Conscience, Consciousness, and Ethics in Joseph Butler’s Philosophy and Ministry,Woodbridge, 2011.
- https://iep.utm.edu/butler/
- https://plato.stanford.edu/entries/butler-moral/
- https://www.encyclopedia.com/people/philosophy-and-religion/protestant-christianity-biographies/joseph-butler
- https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803095538617
- https://www.rep.routledge.com/articles/biographical/butler-joseph-1692-1752/v-1