निकोटीन हे तंबाखूवर्गीय वनस्पतींद्वारे तयार केले जाणारे एक महत्त्वाचे रसायन असून निसर्गातील पहिले कीटकनाशक म्हणून ओळखले जाते. त्याशिवाय चित्रक आणि सूर्यफुलाच्या कुलातील काही वनस्पतीदेखील अल्प प्रमाणात याची निर्मिती करतात. तंबाखू वनस्पतीच्या मुळांमध्ये त्याची निर्मिती होते आणि त्याचे वहन पानांपर्यंत केले जाते. निकोटीन तंबाखूच्या पानाच्या वजनाच्या सुमारे ४% पर्यंत प्रमाणात असते. या तंबाखूच्या पानांचा अर्क कीटनाशक म्हणून सोळाव्या शतकापासूनच वापरला जात होता. १८२८ मध्ये जर्मन संशोधक विल्हेल्म हेन्रिक पोसेट आणि कार्ल लुटविग राएनमान यांनी तंबाखूच्या वनस्पतीतून निकोटीन अलग केले आणि हा शोध लागल्यानंतर निकोटीन हेच कीटकनाशक तत्त्व असलेले रसायन असल्याचे लक्षात आले.

निकोटीन हे द्रव स्वरूपात असून ते पाणी आणि स्निग्ध पदार्थांमध्ये सहजगत्या मिसळते. या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे सेवनानंतर आतड्याद्वारे हे निकोटीन कीटकाच्या पचनसंस्थेत शोषले जाते. तेथून रक्तात आणि रक्तावाटे मेंदू म्हणजेच चेतासंस्थेपर्यंत पोचते. चेतासंस्थेचे एकंदर कामकाज त्यांच्या पेशीमधील प्रभारित कणांचे वहन कसे होते यावर अवलंबून असते. या प्रक्रियेवर नियंत्रण करण्याचे काम पेशीपटलावरील ॲसिटील कोलीन या संग्राहक रसायनाकडे सोपविलेले असते. निकोटीनच्या संयुगातून तयार होणारे निकोटीन ॲसिटील कोलीन हे संयुग या संग्राहकाची हुबेहूब नक्कल करून त्याच्या कामकाजात गोंधळ उडवून देते. त्यामुळे प्रभारित कणांचे वहन अव्याहत चालू राहून चेतासंस्थेचे काम कमजोर होते आणि त्यामुळे कीटकाची हालचाल मंदावते आणि हळूहळू शरीरक्रिया बंद होतात. या निकोटीनच्या प्रभावामुळे कित्येक वनस्पति-भक्षक कीटकांचा विनाश ओढवतो.

हा सगळा परिणाम अभ्यासलेल्या कीटकांच्या पुढच्या पिढ्यांनी या विनाशकारी निकोटीनचा प्रतिकार करणारी यंत्रणा शरीरात विकसित केली आणि त्यामुळे निकोटीनचा प्रभाव कमी होऊ लागला. यावर उपाय म्हणून शास्त्रज्ञांनी निकोटीनच्या रासायनिक रचनेत बदल करून निओ-निकोटीनॉइड ही रसायनाची एक श्रेणीच विकसित केली. ही सगळी रसायने आता बाजारात इमिडॅक्लोप्रीड, थायमेथोक्झाम, क्लोथीॲनिडीन, ॲसिटॅमिप्रीड या नावानी कीटकनाशके म्हणून अतिशय प्रभावी ठरत आहेत.

                                                                                                                                                                                                                           समीक्षक : डॉ. बाळ फोंडके