उमप, मीराबाई : भारुड सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंत. संतांचे अभंग म्हणजे रूपकाश्रयी अभंग. या अभंगांचीच अभिनित भारूडे झाली. ही भारूडे सादर करणाऱ्या मीराबाई उमप यांचे नाव मानाने घेतले जाते. जन्म मातंग समाजातील वामनराव उमप या आर्थिकदृष्ट्या दूर्बल असलेल्या एका सामान्य कुटुंबात अंतरवली, ता. गेवराई जि. बीड येथे झाला. घरात गायन वादनाचा वारसा. तो वडील वामरावांपर्यंत आला. वामनराव आणि आई रेशमाबाई हे दोघेही गाणे-बजावणे करून कुटुंबाची उपजिविका भागवायचे. वामनरावाप्रमाणेच रेशमाबाईचा गळा गोड त्यामुळे एकदा भजन किर्तनाला सुरूवात केले की रात्र कशी सरायची याच भान दोघांनाही राहत नसे. तसं उमपांच घराण हे गुरू घराणं. संताचे अभंग, लोकगीते, पोवाडे आणि किर्तन हे त्यांना मुखोद्गत पाठ होते. हे दाम्पत्य गाणे बजावणे करून पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षापात्र हातात घेवून गावोगावी रणरण भटकत असे. ओटीपोटाशी मीरा, कोमल, अनुसया, जनाबाई, सावित्री या पाच बहिणी आणि महावीर, दिपक, नामदेव हे तिघे भाऊ असा अकरा लोकांचा कुटुंब कबीला चालवताना वामनरावांनी दमछाक व्हायची. म्हणून मीराबाईच्या हातामध्ये वयाच्या सातव्या वर्षी भिक्षापात्र आले. मीराबाई सर्वात मोठी म्हणून शाळेची पायरी तिला चढता आली नाही बाबा एकतारी वाजवायचे. धाकटा चुलता दिमडी वाजवायचा आणि मीराबाई गात सुटायची. लहान वयातच पाटीवर पेन्सिलीने अक्षर ओढण्याऐवजी दिमडीवर मीराबाईची बोट थिरकायला लागली. पण दिमडीला घरात कुणी हात लावू देत नसे. मग कधी जर्मनची वाटी तर कधी ताट वाजवत बसायची, वय लहान असल्यामुळे कौतुक नसायचे, अचानक भांडण झाल्यामुळे चुलता घर सोडून गेला. आणि खंजिरी वाजवण्याचा उत्तराधिकारी म्हणून आईच्या सांगण्यावरून खंजीरी मीराबाईच्या हाती दिली. चुणुकदार पोरगी असून चुलत्यापेक्षा चांगली खंजीरी वाजवत असल्यामुळे त्यांचे कौतुक होवू लागले. त्यांना घेवून आई-बाबा गावोगावी फिरत असत. लातूर जिल्हयातील म्हैसगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या त्या संपर्कात आल्या. खंजिरी वाजवण्याचे त्यांचे नैपुण्य बघून त्यांनी त्यांना खंजिरी भेट दिली त्यासोबतच कलेची आणि सामाजिक जाणिवेची प्रेरणा दिली.

भारूड, आख्यान आणि पोवाडे यांचे सातत्यपूर्ण गायन त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातल्या खेडया पाडयात, गावगाडयात मीराबाई दिमडीवरच भारूड करतात. फक्त पारंपरिक नाही तर आधुनिक काळात, समाजाला भेडसवणाऱ्या समस्यांना आपल्या गायकीच्या माध्यमातून वाचा फोडते. हुंडाबंदी,दारूबंदी, स्त्री-भृणहत्या, एड्स यासारख्या समस्यांवर भारूड-भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. दलित समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या आशीर्वादाने माणूस म्हणून जगण्याची उर्मी मिळाल्यामुळे संत विचारसोबत बाबासाहेबांना ते आपले दैवत मानतात.

चिखलठाणा येथे आठवडे बाजरात दहा बाय दहाच्या रूममध्ये मीराबाई कुटुंबासह राहतात. मीराबाई एकदाच गायन, त्याबरोबर खंजिरी वादन तसेच एकपात्री अभिनय करून अभिनयाचे चालते बोलते नाट्यशास्त्र उभे करतात. मीराबाईच्या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज त्या लोकमानसात प्रसिद्ध झाल्या आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार, महाराष्ट्र  शासन सांस्कृतिक कार्याचा राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मीराबाईंना गौरवण्यात आले आहे.

संदर्भ :

  • क्षेत्रअध्ययन

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा