कथेंतल्या किंवा गीतांतल्या आणि कलाकृतींतल्या बीजरूप अंशाला शास्त्रीय परिभाषेत कल्पनाबंध असे म्हणतात. अनेक कथाबीजांची कथावस्तू किंवा संविधानक तयार होते. या कथावस्तूलाच लोकसाहित्याच्या परिभाषेत कथाविशेष (Tale-type) म्हणतात. प्रत्येक कथाविशेषांत अनेक बदलणारी कथाबीजे एका ठराविक क्रमांत गोवलेली आढळून येतात. कथाबीजे बदलली तरी अनुक्रम बदलत नाही आणि म्हणूनच गोष्ट एकच असते पण तिचे पर्याय मात्र अनेक आढळून येतात. भावबंध आणि कल्पनाबंध म्हणजे ‘लोकबंध. मानव प्राकृतिक विश्व आणि नैतिक विश्व या दोन्ही स्तरांवर ‘लोक’ मध्ये जगत असतो. या जगण्याला मानवी मनाला आत्मिक आणि वासनादेह यानुसार मिळालेल्या स्वभावविशेषांचा आधार असतो. हे त्याचे ‘लोक’ मधील जगणे सामूहिक स्वरूपाचे असते म्हणजे अंगस्वरूपलोकचा तो घटकलोक असतो.त्यामुळे जगत असताना मनाच्या स्वभावविशेषांमुळे आलेल्या अनुभूतीतून,निर्माण झालेल्या भावनांना सामूहिक स्वरूप प्राप्त होते.घटकलोकची भावना समूहभावनेचे रूप धारण करते आणि समूहाची भावना म्हणजे ‘अंगस्वरूपलोक’ची भावना घटकलोकच्या भावनेचे रूप धारण करते. म्हणूनच ती भावना ‘भावबंध’ रूपात जाणवते. या भावनांचे प्रकटीकरण करताना घटकलोकमधून कल्पनांचे अनेक पर्याय निर्माण होतात. त्यांतील एखादी कल्पना अंगस्वरूप लोकभावनेला व्यापते. ती कल्पना अंगस्वरूपलोक मध्ये स्वीकृत होते. त्या कल्पनेच्या आधारे अंगस्वरूपलोक भावना प्रगट होते. म्हणजे त्या कल्पनेच्या आधारे लोकची धारणा होते. येथेच त्या कल्पनेला कल्पनाबंधाचे स्वरूप प्राप्त होेते. या कल्पनाबंधांच्या आधाराने लोकचे पारंपरिक वर्तन सुरू असते म्हणूनच या कल्पनाबंधांना ‘लोकबंध’रूप प्राप्त होते. म्हणजेच भावबंध ही (समूहमनाची) अंगस्वरूपलोकची भावावस्था असते, तर ‘कल्पनाबंध’ हे या भावावस्थेचे प्रकटीकरण असते. या भावावस्था आणि त्यांच्या प्रकटीकरणातून ‘लोकधारणा’ सिद्ध झालेली असते. लोकपरंपरेमध्ये ‘लोकधारणा’ अगोदर की भावावस्था अगोदर हे लक्षात येत नाही. किंबहुना त्यांचे एकरूपत्व आढळते म्हणूनच भावबंध आणि कल्पनाबंध म्हणजे ‘लोकबंध’ होत. अर्थात ‘लोक’चे जे जगणे अनुभवाला येते ते लोकमानसाचे लोकबंधांच्या स्वरूपातील आत्मप्रकटीकरण असते. हे लोकबंध स्थलकालपरिस्थितीसापेक्ष नित्यवर्तमान असतात, म्हणूनच ‘लोकबंधां’च्या या प्रकटीकरणासाठी लोकसाहित्य असते. या लोकबंधांतून ‘लोक’ची सर्व अंगे (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) प्रकट होत असतात. लोकबंध प्रकटीकरणासाठी भाषा, चित्र, चिन्हे, आकृत्या, नकाशे, नाट्य, संगीत ही सर्व माध्यमे वापरली जातात. अर्थातच लोकसाहित्य या सर्व स्वरूपात आपणास जाणवते. लोकबंधप्रकटीकरण म्हणजेच लोकसाहित्य, असे लक्षात घेतले की लोकसाहित्याचे मूलगामी, स्वाभाविक, प्रयोगसिद्ध, मौखिक असे स्वरूप लक्षात येते. लोकबंध हेही मनाचे सृजनच असते. अर्थात ते सामूहिक स्वरूपाचे असते. या सृजनाला आदिम बिंदूपासूनचा लोकप्रवासाचा संदर्भ असतो. स्थलकालपरिस्थितीसापेक्ष परिवर्तनाची परंपरा असते व त्यातून ‘लोकबंधां’चे चिरंतनत्व सिद्ध होत असते. आरंभबिंदूपासून वर्तमानापर्यंत परिवर्तन परंपरांतील प्रत्येक पर्याय सत्यच असतो. यावरून लोकजीवन लोकबंधातून प्रकट होत असते. म्हणजेच ‘लोक’ लोकसाहित्यात जगत असतात. तेच ‘लोक’चे अगदी स्वाभाविक असे जगणे असते. म्हणूनच ‘लोक’च्या साहित्य, संस्कृती, कला आणि शास्त्रे यांच्या मुळाशी हे लोकसाहित्य असते.

संदर्भ :

  • देवरे, रमेश, (संपा), लोकसाहित्य दर्शन,कर्मवीर प्रकाशन, पुणे, २००९.

प्रतिक्रिया व्यक्त करा