नज़ीर, अहमद (२७ जानेवारी १९३२ – ८ जून २०१३).
कॅरिबियन मृदाशास्त्रज्ञ. प्राध्यापक डॉ. नज़ीर अहमद हे त्यांच्या उष्ण प्रदेशीय मृदेवरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जातात. मृदा व मृदासमस्या यांचे सल्लागार म्हणून त्यांनी जगाचा प्रवास केला. त्यांनी ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये मृदा वर्गीकरणाची तत्त्वे, मूलभूत मृदा रसायनशास्त्र आणि मृदा व्यवस्थापन इत्यादींचे सर्वेक्षण केले. कॅरिबियन आणि लॅटिन अमेरिकन विभागांतील मृदाशास्त्र संशोधन कार्यासाठी, इण्टर-अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर को-ऑपरेशन इन अॅग्रिकल्चर (IICA) यांच्याकडून त्यांना सुवर्ण पदक देण्यात आले.
नजीर अहमद यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतील गियाना राज्यातील दुण्डीमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण (DICTA) (१९४९–५२) आणि पदव्युत्तर शिक्षण (AICTA) (१९५२-५३) उष्ण कटिबंधीय कृषी इंपिरियल कॉलेज (ICTA), त्रिनिदाद येथे झाले. १९५४ मध्ये कॅनडा नॅशनल रिसर्च कौन्सिलने त्यांना कॅनडा नॅशनल कौन्सिलतर्फे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधन प्रकल्पासाठी अनुदान मिळवून दिले. त्यामुळे १९५५ मध्ये त्यांना तेथे पदव्युत्तर पदवीपूर्ण करण्याची संधी मिळाली. १९५७ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी नॉटिंगॅम विद्यापीठात प्राप्त केली. पीएच् डी. पदवीधर झाल्यानंतर ते ब्रिटिश गियानास परत आले. त्यांनी ब्रिटिश गियाना कृषी मंत्रालयात कृषी रसायने आणि मृदाविज्ञान विभाग प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला.
नजीर अहमद यांनी १९६१ मध्ये महाविद्यालय, वेस्ट इंडीज विद्यापीठ, त्रिनिदाद येथील विज्ञान आणि कृषी विभागांत मृदाशास्त्र प्राध्यापकाचे पद स्वीकारले. त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण या संस्थेमध्येच झालेले होते. १९६९ मध्ये ते मृदाशास्त्र प्राध्यापक व त्या विभागाचे प्रमुख झाले. त्यांनी अनेक पदांवर काम करताना विद्यापीठात संशोधन आणि शिक्षण सुविधा सुधारण्यासाठी अविरत काम केले. मृदाशास्त्र या विशेष शाखेतील पदव्युत्तर संशोधनाची उपलब्धता त्यांनी विकसित केली. याकामासाठी अनेक ठिकाणांहून अनुदाने मिळविण्यात ते यशस्वी झाले .
नजीर अहमद यांनी मृदा संशोधन आणि व्यवस्थापन तसेच मृदाशास्त्र शाखेतील अनेक आंतरराष्ट्रीय संस्था व आंतरराष्ट्रीय मंडळांवर काम केले आहे. मलेशियाच्या रबर संशोधन आणि विकास मंडळावरील त्यांची नेमणूक उल्लेखनीय आहे. असंख्य आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये विशेष आमंत्रित शास्त्रज्ञ म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट ऑगस्टीन येथील विद्यापीठात चार परिषदांचे आयोजन झाले. १९९५ मध्ये विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर एका वर्षानी त्यांना सन्माननीय प्राध्यापक, मृदाशास्त्र असे विद्यापीठातील सन्मानदर्शक पद देण्यात आले. निवृत्तीनंतर ते राष्ट्रीय कृषी संशोधन संस्था (NARI), गियाना हिचे संचालक होते. २००० मध्ये ते संचालक पदावरून मुक्त झाले. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांत चिकण मातीचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये पाणी साठले म्हणजे माती फुगते आणि पाण्याचा अंश कमी झाला म्हणजे त्यामध्ये मोठ्या भेगा पडतात. अशा जमिनीस मृदाशास्त्रात ‘व्हर्टिसॉल’ म्हणतात. व्हर्टिसॉल मृदाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांवर त्यांनी मोलाचे संशोधन केले आहे.
अखेरपर्यंत ते वेस्टइंडीज विद्यापीठ, त्रिनिदाद येथील अन्नोत्पादन विभाग संलग्नित विज्ञान व कृषी अध्यापन संस्थेत गुणश्री अध्यापक म्हणून कार्यरत होते. विभागाशी संलग्न असलेल्या विज्ञान आणि कृषी अध्यापन संस्थेमध्ये सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
समीक्षक – मोहन मद्वाण्णा