कार्याचे समवायीकारण म्हणजे द्रव्य होय. समवायी म्हणजे जे कार्यात समवाय संबंधाने राहते असे कारण. उदा., माती हे घटाचे किंवा तंतू (धागे) हे पटाचे (वस्त्राचे) समवायीकारण आहे. यालाच इतर दर्शने उपादानकारण म्हणतात. क्रिया आणि गुण द्रव्याच्या आश्रयानेच राहतात. उदा., श्वेत या गुणाचा आश्रय दुग्ध हे द्रव्य होय. वायू हे द्रव्य गमन या कर्माचा आश्रय होय. म्हणूनच वैशेषिक सूत्रांमधील द्रव्याच्या व्याख्येमध्ये ‘क्रिया आणि गुणाने युक्त समवायीकारण म्हणजे द्रव्य असे म्हटले आहे (वै.सू. १.१.१५). परंतु न्यायदर्शनानुसार निर्माण झाल्यानंतर पहिल्या क्षणी द्रव्य हे गुणरहित असते. त्यामुळे ‘द्रव्यत्व’ या जातिने युक्त ते द्रव्य असेही द्रव्याचे लक्षण सांगितले आहे.

पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिक्, आत्मा, आणि मन अशी नऊ द्रव्ये आहेत. या द्रव्यांचे निरनिराळे गुण आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या द्रव्यांवर बाह्य इंद्रियांनी समजणारे विशेष गुण राहतात. म्हणून त्यांना ‘भूत’द्रव्ये म्हणतात. परिमाणावरून द्रव्यांची विभागणी विभू, अणू आणि मध्यम अशी केली जाते. आकाश, काल, दिक् आणि आत्मा ही विभू परिमाणांची द्रव्ये आहेत. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि मन यांचे अणू असतात. अणूंच्या संयोगाने झालेली पृथ्वी, जल, तेज, वायू ही मध्यम परिणामाची द्रव्ये आहेत. विभू आणि अणू परिणामांची द्रव्ये ‘नित्य’, तर मध्यम परिणामाची द्रव्ये ‘अनित्य’ असतात.

पृथ्वी द्रव्याचा गंध हा विशेष गुण आहे. रूप, रस, स्पर्श, संख्या इ. इतर द्रव्यात आढळणारे गुणही पृथ्वीत आहेत. सर्व पार्थिव पदार्थ अत्यंत सूक्ष्म आणि अविभाज्य अशा परमांणूपासून उत्पन्न होतात. म्हणून कारणभूत परमाणूत राहणारी पृथ्वी नित्य, तर कार्यभूत पृथ्वी अनित्य आहे. अनित्य पृथ्वीची शरीर, इंद्रिये आणि विषय अशी तीन रूपे आहेत. शीतस्पर्शाने युक्त द्रव्याला जल आणि उष्णस्पर्शयुक्त द्रव्याला तेज म्हणतात. पृथ्वीप्रमाणेच त्यांचेही नित्य आणि अनित्य असे भेद आहेत. रूपरहित स्पर्शयुक्त द्रव्याला वायू नाव आहे. शब्द हा आकाश द्रव्याचा विशेष गुण आहे. आकाशाची उत्पत्ती किंवा विनाश होत नसल्याने ते नित्य आहे. भूत, वर्तमान व भविष्य यांचे असाधारण कारण काल आहे. एखादी घटना दुसऱ्या एखाद्या घटनेच्या आधी घडली, त्याच वेळी किंवा नंतर घडली असे जे ज्ञान आपल्याला होते त्याचे कारण काल हेच आहे. त्याचप्रमाणे इथे-तिथे, जवळ-दूर, पूर्व-पश्चिम इ. लोकव्यवहाराची कल्पना दिक् द्रव्यावर आश्रित आहे. वस्तुतः काल आणि दिक् अखंड आहेत. पण उपाधी भेदाने काळाचे लव, निमेश, प्रहर इ. तर दिक् चे पूर्व-पश्चिम इ. भेद होतात. प्रत्येक शरीरात आत्मा असतो जो नित्य असून ज्ञानाचा आश्रय आहे. इच्छा, सुख, दुःख, द्वेष इ. त्याचे गुण आहेत. मन हे अणू परिमाणाचे द्रव्य असून मनाच्या साहाय्याने आत्मा सुख-दुःखांचा अनुभव घेतो.

मीमांसकांनी ‘तम’ (अंधार) हे दहावे द्रव्य मानले आहे. परंतु न्याय-वैशेषिक मतानुसार तम म्हणजे तेजाचा अभाव होय.

संदर्भ :

  • Chandra, Narendra Vedantatirth, Ed. Sivadityas  Saptapadarthi, Calcutta, 1934.
  • Shastri, Acharya Dhundhiraja, Prashastapadbhashyam, Varanasi, 2002.
  • चाफेकर, नलिनी, तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.

                                                                                                                                                                          समीक्षक – कांचन मांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा