सोरेन, भोगला : (जन्म- ४ सप्टेंबर १९५८). संथाली भाषेतील सुप्रसिद्ध नाटककार, कवी, कादंबरीकार आणि निबंधकार. बिहारमधील सिंघभूम जिल्ह्यातील (सध्याचे झारखंडमधील पूर्व सिंघभूम) खरबंद येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण जन्मगावी. माध्यमिक शिक्षण जन्मगावापासून थोडया अंतरावरील गावी. पच्छिम सिंघभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील टाटा महाविद्यालयातून इंटरमिडेट (१९७८). त्यांनंतर जमशेदपूर को-ऑपरेटिव्ह महाविद्यालयात बी. एस्सी. करिता प्रवेश मात्र स्थानिक परिसरातील दुष्काळामुळे (१९७६-१९७९) पदवी शिक्षण खंडित. शालेय जीवनात त्यांनी बंगाली साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिकांच्या साहित्याचे वाचन केले. शिक्षण खंडित झाल्यानंतर काही काळ त्यांनी शिकवणी वर्ग घेतले. दरम्यान त्यांची भेट प्रसिद्ध विचारवंत, नाटककार आणि वक्ते पंडित रघुनाथ मुर्मू यांच्याशी झाली. सोरेन यांच्या पुढील जडणघडणीवर त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे.
सोरेन यांच्या काव्य व गीत लेखनाची सुरवात शालेय जीवनापासूनच झाली. त्यांचा संथाली गीतसंग्रह (१९७८) प्रकाशित झालेला असून ते त्यांचे पहिले प्रकाशित पुस्तक आहे. उपाल (१९८९) , चापोय (२०११) इत्यादी या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांमधून संथाली जनतेतील पारंपारिक घातक सामाजिक रूढी, अंधश्रद्धा यांचेविरुद्ध बंड करणाऱ्या संघर्षाचे चित्रण येते. तसेच शिक्षणासाठी झगडणाऱ्या व प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीरेखा येतात. त्यांच्या कादंबऱ्यांमधून येणाऱ्या लढाऊ नायिकांच्या व्यक्तिरेखा लक्षणीय आहेत. उत्पादन व्यवस्थेत होत जाणाऱ्या बदलांमधून आकार पावणारी नवी आर्थिक संरचना आणि त्याचे शोषित जगावरील होणारे भीषण परिणाम यांविषयी त्यांच्या कादंबऱ्यांमधून कलात्मक भाष्य करण्यात आले आहे. नाटककार म्हणून सोरेने यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. संथाली नाटय चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहिला आहे. मुहिन (१९८३), सोस्नोक (१९९१), राही रांवाक् काना (२००८), सुडा साकोम (२००९), मान दिसोम पोरान परायनी (२०१०), खोबोर कागोज (२०१०), राही चेतान ते (२०१२) यांसारखी नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राही रांवाक् काना ही संथाल समुहातील दोन समांतर प्रेमकथांची सामाजिक बंध प्रदर्शित करणारी कहाणी आहे. यातील पात्रे आणि संवाद अत्युच्च दर्जाचे असून प्रेम आणि सामाजिक परीस्थितीचे बेमालूम नाटय उभे करणारे आहेत. त्यांच्या नाटकांमधून येणारे विषय संथाली जीवनाचे विविध भावपदर आविष्कृत करणारे आहेत. आदिवासी जीवनजाणिवांचे विलक्षण दर्शन त्यातून घडते. या शिवाय त्यांची हिंदी भाषेत संथाली भाषा, लिपी और साहित्य का विकास (१९९२) , झारखंडी पहचान एवं भाषाएँ (२००४) अशी पुस्तकेही प्रकाशित आहेत.
सोरेन यांनी आपल्या साहित्यातून संथाल समुदायाच्या समकालीन सामाजिक-सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय जीवनाच्या विविध पैलूंना प्रत्ययकारीतेने अभिव्यक्त केले आहे. सशक्त आशय आणि आकलनसुलभ व प्रवाही भाषेमुळे त्यांच्या साहित्याची वाचनीयता अधिक राहिलेली आहे. वाड्मयीन मूल्यांनी प्रभावी असे लेखन करणारे सोरेन हे संथाली भाषेतील पंडित रघुनाथ मुर्मू यांच्या नंतरचे सर्वात महत्त्वपूर्ण नाटककार मानले जातात.
इंजिनिअर असणारे भोगला सोरेन हे सन १९८८ मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय संथाली लेखक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी ओलोंग ह्या संथाली द्वैमासिकात मानद संपादक म्हणून काम केले. शिवाय संथाली, बंगाली आणि हिंदी मासिकांमधून अनेक लेख लिहिले आहेत. भोगला सोरेन यांची पुस्तके अनेक विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली असून अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचे साहित्य गौरविण्यात आलेले आहे. त्यांच्या राही रावांक काना या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान (२०१०) करण्यात आला आहे.
संदर्भ :
- Meet the author : Bhogla soren – Sahitya Akademi, New Delhi, 28 Sept. 2013.
समीक्षक – भगवान फाळके