पटेल, भोलाभाई : (जन्म- ७ ऑगस्ट १९३४ – २० मे २०१२) – गुजरातमधील एक प्रसिद्ध लेखक, समीक्षक, अनुवादक, संपादक आणि तौलनिक साहित्याचे अभ्यासक. गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्यातील सोजा येथील एका शेतकरी कुटुंबात जन्म. बनारस हिंदू विद्यापीठातून बी. ए. ची पदवी (१९५७) प्राप्त केल्यावर गुजरात विद्यापीठातून एम.ए. (हिंदी – संस्कृत – १९६०), एम. ए. (इंग्रजी (भाषाशास्त्र) – १९७०) त्यांनी पूर्ण केले. पुढे अज्ञेय : एक अध्ययन – आधुनिकता एवं पाश्चात्य प्रभावों के विशेष सन्दर्भ में याविषयावर पीएच. डी. (१९७७) मिळवली. याशिवाय जर्मन (१९७१) आणि भाषाशास्त्र (१९७४) पदविका प्राप्त केली. गुजरातमधील अरावली जिल्ह्यातील मोडासा याठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून अध्यापनाला सुरुवात करून त्यांनी पुढे अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल कला महाविद्यालयातही अध्यापन (१९६०-६९ ) केले. पुढील काळात गुजरात विद्यापीठातील भाषा संकुलात हिंदी विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्तीपर्यंत ( १९६९-९४) कार्य केले. त्यांची विविध विषयांवरील एकूण साधारणत: ५२ पुस्तके प्रकाशित आहेत. ते गुजराती विश्वकोश मंडळाचे विश्वस्त राहिले असून गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष (१९९८) म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.
गुजरातीसह मराठी, हिंदी, बंगाली, आसामी, संस्कृत, जर्मन आणि फ्रेंच यांसारख्या विविध भाषांचे ते उत्तम जाणकार होते. गुजरातीमधून इतर भाषांमध्ये आणि इतर भाषांमधून गुजरातीमध्ये त्यांनी अनेक पुस्तकांचे अनुवाद केले. कालिदास आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा त्यांनी केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे. बंगाली साहित्याचा इतिहास, बंगाली साहित्याच्या इतिहासाची रूपरेखा (१८८२) यांसह त्यांनी बंगाली कवी जीवानंद दास यांच्या निवडक कवितांचे केलेले भाषांतर (१९७६) हे बहुमोल कार्य म्हणून चर्चिले गेले. हिंदी आणि गुजराथी साहित्याला जोडणारा दुवा असा त्यांचा गौरव केला जातो.
भोलाभाई पटेलांचे गुजराती साहित्यात निबंध आणि प्रवासवर्णनाचे आजपर्यंत जवळपास दहा खंड प्रकाशित झालेले आहेत. त्यांपैकी पूर्वोत्तर (१९७१) , विदिशा (१९८०), कंचनजंघा (१८८५), राधे तारा डुंगरिया पर (१९८७), देवोनी घाटी (१९८९), देवात्मा हिमालय (१९९०), बोले जीना मोर (१९९२), शालभंजिका (१९९२) आणि युरोप-अनुभव (२००४) इ. पुस्तकांचा समावेश आहे. अधुना (१९७३), पूर्वापार (१९७६), कालपुरुष (१९७९), आधुनिकता अने गुजराती कविता (१८८७), साहित्यिक परम्परानो विस्तार (१९९६) इ. समीक्षेची पुस्तके प्रसिद्ध आहेत. याशिवाय संपादित पुस्तके कालासाहेब कालेलकर यांच्या निवडक लेखनासह अन्य महत्त्वाची संपादने त्यांनी केली आहेत.
गुजराती साहित्यप्रसार आणि प्रचारातही भोलाभाई पटेल यांचे मोठे योगदान राहिले आहे. गुजराती साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या परभ च्या संपादक (१९७४) पदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली. भारतीय साहित्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी त्यांना विश्वभारतीय विद्यापीठाकडून शिष्यवृत्तीही (१९८३-८४) प्रदान करण्यात आली होती. याशिवाय इतरही शिष्यवृत्ती मिळाल्या आहेत. १९९२ ला त्यांचा देवोनी घाटी या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुजराथी साहित्य सभेच्या रंजितराम सुवर्णचंद्रक हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार भोलाभाई पटेल यांना १९९५ साली प्रदान करण्यात आला आहे. १९९९ साली बिरेंद्र कुमार भट्टाचार्य यांच्या मूळ आसामी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त इयारूंगम कादंबरीचा गुजरातीत केलेल्या अनुवादावद्दल त्यांना १९९९ साली साहित्य अकादमीचे अनुवादासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००८ मध्ये त्यांना भारत सरकारद्वारा पद्मश्री पुरस्काराने त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्योत्तर गुजराती साहित्यात समीक्षक आणि अनुवादक म्हणून त्यांनी केलेले कार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे. समीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या मांडणीतून गुजराती साहित्यविचार परिणामकारकतेने व्यक्त होते. अनुवादाच्या माध्यमातून गुजराती साहित्याला राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यात तसेच अन्य भारतीय भांषांमधील महत्त्वपूर्ण साहित्यकृती गुजरातीत अनुवादित करून गुजराती साहित्याचे दालन समृद्ध करण्यात त्यांचे योगदान विलक्षण प्रभावी राहिले आहे. त्यांच्या निबंध लेखनातून व्यक्त होणाऱ्या चिंतनातून गुजराती संस्कृतीचे आणि भावविश्वाचे अनोखे दर्शन घडते.
समीक्षक – भगवान फाळके