शहरातील जागेच्या वापराचे नियमन आणि सुयोग्य आरेखन हे नगर नियोजन आणि नगर रचना (Town Planning) यांमध्ये समाविष्ट होते. एखाद्या शहराला नियोजनानुसार मूर्त रूप देणे म्हणजे नगर रचना. नगर नियोजन हे प्राथमिकतः विकास योजना किंवा धोरणात्मक असते. शहर किंवा गावाच्या विकासासाठी काय करावे हे नगर नियोजन सांगते तर कसे करावे हा नगर रचनेचा भाग असतो.

एखादे गाव किंवा शहर आपल्याला खूप आवडते. त्या आवडण्यामागे काय असते असा विचार करा. सुंदर इमारती फक्त शहराला सुंदर बनवित नाही तर त्याचबरोबर रस्ते व त्यांचा आकृतिबंध, पादचारी मार्ग, झाडे व हिरवाई, रस्त्यावरील इतर घटक जसे की दिवे, फर्निचर जसे की बसण्यासाठी बाके, माहिती फलक, बसस्थानक, कचराकुंड्या, इत्यादी विविध सुविधा यांचा इमारती एवढाच, किंबहुना थोडा जास्तच सहभाग असतो.  नवी दिल्लीत फिरताना लक्षात राहतात ते झाडांच्या महिरपींनी नटलेले व त्रिकोणी भूमितीवर बेतलेले रुंद रस्ते, दोन्ही बाजूचे रुंद पादचारी मार्ग व सहा रस्ते मिळून तयार होणारे व मध्ये गोल बाग असलेले चौक. मागील इमारती बऱ्याच वेळा दिसत सुध्दा नाहीत. त्यांचे फक्त अस्तित्व जाणवते.

नवीन शहर वसविताना किंवा विद्यमान शहराचा विकास करताना तेथील भौगोलिक स्थान व परिस्थिती, नैसर्गिक संसाधने, खनिज, वन्य व जैविक संपत्ती, समाजाचा आर्थिक स्तर, रोजगाराची साधने इत्यादी बाबींचा विचार करून नगर नियोजनाचे धोरणात्मक निर्णय होतात. तर त्याखेरीज भौगोलिक वैशिष्ट्ये, नैसर्गिक देणग्या, सांस्कृतिक व सामाजिक वारसा, हवामान या अतिरिक्त बाबींचा विचार करून नगर रचना ठरविली जाते.

प्रत्येक शहराची एक विशिष्ट प्रतिमा असते. सदर प्रतिमा ही नगर रचनेच्या विविध घटकांशी व वैशिष्ट्यांशी निगडीत असते. केव्हिन लिंच या नगर रचनाकाराने गेल्या शतकामध्ये या गोष्टीवर विशेष संशोधन करून याबाबत काही सिद्धांत मांडले आहेत. त्याच्या द इमेज ऑफ द सिटी (The image of the city) या १९६० साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामध्ये हे सिद्धांत उद्घृत केलेले आहेत. आजमितीस हे सिद्धांतांन्वये नगर रचनेच्या क्षेत्रात प्रमाण मानले जातात. काय सांगतात हे सिध्दांत?

केव्हिन लिंच – नगर नियोजन घटक

एखाद्या शहराची किंवा नगराची प्रतिमा म्हणजे तेथील नागरिकांच्या मनात तयार झालेला शहराचा आराखडा. नागरिकाच्या रोजच्या शहरातील प्रवासातून तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वावरण्यातून असा आराखडा नकळत मनात बनतो. हा आराखडा म्हणजेच प्रतिमा बनण्याची पहिली पायरी. केव्हिन लिंचला संशोधनातून असे दिसून आले की शहरातील पाच घटक अशी प्रतिमा बनविण्यात महत्त्वाचे कार्य निभावतात. रस्ते, नाके, सीमा, प्रभाग व  महत्त्वाच्या खाणाखुणा हे ते पाच घटक होत.

रस्ते : शहरातील महत्त्वाचे व जास्त वर्दळीचे रस्ते हे प्रतिमेचा वा मानसिक आराखड्याचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतात. या मध्ये वाहतुकीचे रस्ते, पादचारी रस्ते, अंतर्गत लोहमार्ग, अंतर्गत जलमार्ग या सर्वांचा समावेश होतो. शहरातील सदर रस्त्यांचा भौमितिक आकृतीबंध हा सुध्दा यात महत्त्वाचा ठरतो.

नाके : जेथे महत्त्वाचे रस्ते मिळतात, प्रवासाची दिशा बदलावी लागते प्रसंगी वाहतुकीचे साधन बदलावे लागते उदाहरणार्थ मोठे चौक, बस स्थानके, रेल्वे स्थानके, अशा सर्व जागा ‘नाके’ या सदराखाली येतात.

सीमा : शहराच्या प्रत्यक्ष भौगोलिक सीमा व मानसिक सीमा यात फरक पडतो. नागरिकांचा वावर ज्या पध्दतीने होतो त्या नुसार मानसिक सीमा बदलतात. काही वेळा वापर किंवा प्रभागांमध्ये होणारा बदल सुध्दा मानसिक सीमा तयार करतो. शहरातील किंवा आजूबाजूच्या टेकड्या, नद्या, नाले, लोहमार्ग, शहरालगतच्या शेत जमिनी, प्रसंगी शहरातून जाणारा महामार्ग हे सर्व मानसिक सीमा बनू शकतात.

प्रभाग : विविध महत्त्वाच्या पेठा, वसाहती किंवा विशिष्ट वापर असलेले प्रभाग उदाहरणार्थ व्यापारी संकुले असलेला मध्यवर्ती भाग, मोठ्या निवासी वसाहती या ‘प्रभाग’ या प्रकारात मोडतात.

खाणाखुणा : शहरातील महत्त्वाच्या व पटकन लक्षात येणाऱ्या इमारती, पुतळे, मनोरे, स्मारके, या गोष्टी ‘महत्त्वाच्या खाणाखुणा’ या प्रकारात मोडतात. बऱ्याच वेळा शहरातील पत्ता समजावून देताना किंवा घेताना या खाणाखुणांचा संदर्भ दिला जातो.

नगराच्या विकासाचा प्रत्यक्ष रचना आराखडा बनविताना तसेच विविध विभागांचा तपशीलवार आराखडा बनविताना अशा प्रतिमेचा विशेष उपयोग होतो. विविध घटकांचे नागरिकांच्या मनातील स्थान व संदर्भ त्या घटकाचे सबलीकरण किंवा बदल करण्याचे वेळी दिशादर्शक ठरू शकते. एखादा विकास प्रकल्प शहराच्या प्रतिमेमध्ये मोठा बदल घडवू शकतात.

समीक्षक – श्रीपाद भालेराव