शिक्षण ही संकल्पना १९६०च्या दशकानंतर आकलनशास्त्राचा (Cognitive Science) उदय झाल्यानंतर प्रचारात आली. या संकल्पनेने शिक्षणविषयक विचारांत आणि व्यवहारांत मूलभूत परिवर्तन घडवून आणले आहे. शिक्षणाचा सामाजिक, राजकिय, व्यावहारिक, तात्विक इत्यादी विचार मुलांच्या दृष्टिकोनातून होणे, म्हणजे बालकेंद्रित शिक्षण होय. या शिक्षणात प्रथमत: मुलांच्या भावनांना व नंतर शिक्षण विषयांना स्थान दिला जातो.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून शिक्षणाच्या आचार-विचारांत वर्तनवादी विचारसरणीचा (Behaviorism) प्रभाव होता. त्यात शिक्षकांचे शिकविणे हे दैनंदिन शिक्षण-व्यवहारात महत्त्वाचे मानले गेल्याने शिक्षणव्यवस्था ‘शिक्षणकेंद्री’ अशी घडली होती. या व्यवस्थेत साहजिकच प्रत्यक्ष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दुय्यम स्थान होते. यात बदल झाला तो मारिया माँटेसरी (Maria Montessori), जॉन ड्युई (John Dewey), जीन पियाजे (Jean Piaget ), लेव्ह स्यिम्योनव्हिच वायगोटस्की (Lev Semyonovich Vygotsky) या शिक्षणतज्ज्ञांच्या शिक्षणविषयक संशोधनांतून व त्यांवर आधारित सिद्धांतांतून. या व नंतरच्या अनेक शिक्षणशास्त्रज्ञांनी ‘मूल शिकतं कसं’ यावर प्रकाश पाडला आणि त्यानंतर शिक्षण विचारांचे पारडे शिकणाऱ्या बालकांच्या अंगांनी झुकू लागले. त्यातून शिक्षणात क्रांती होवून ‘बालकेंद्री’ शिक्षणाची संकल्पना जगापुढे आली.
बालककेंद्रित शिक्षण ही संकल्पना बालककेंद्री अध्ययन शिक्षण, विद्यार्थीकेंद्री अध्ययन, अध्ययनकेंद्री शिक्षण अशा एकाच अर्थाच्या वेगवेगळ्या संज्ञांनी ओळखली जाऊ लागली. या संकल्पनेच्या आशयात अनेक गोष्टींचा समावेश होतो. मूलत: यामध्ये तीन गोष्टी येतात. एक, आपण केंद्रस्थानी नसून विद्यार्थी केंद्रस्थानी असणार आहेत, हे स्वीकारून तशी आपली मानसिकता शिक्षकांना तयार करावी लागते. दोन, या प्रकारच्या नव्या मानसिकतेतून वर्गातील अध्यापनपद्धतीत शिक्षकांना आमूलाग्र बदल करावा लागतो. तीन, आज शिक्षकाची भूमिका बदलत असून तो केवळ अध्यापक न राहता विद्यार्थ्यांना मदत करणारा साहाय्यक होत आहे. या दिशेने शिक्षकाला आपली वागणूक, कौशल्ये, विद्यार्थ्यांशी संबंध या बाबींमध्ये जाणीवपूर्वक बदल करावा लागतो. बालकेंद्री शिक्षणाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्यास बालकांच्या बाबतीत परिवर्तन होते.
बालकेंद्रित शिक्षणातील अभ्यासक्रम : या शिक्षणपद्धतीत बालक शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबींदू असल्याने त्याची आवड, त्याची आवश्यकता, त्याची योग्यता इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना केली पाहिजे. त्यामध्ये
- अभ्यासक्रम जिवनोपयोगी असावा.
- अभ्यासक्रम बालकाच्या आवडी-निवडी नुसार असावा.
- अभ्यासक्र लवचिक असावा.
- अभ्यासक्रम बालकाच्या पूर्व ज्ञानावर आधारित असावा.
- अभ्यासक्रमात शैक्षणिक उद्देश असावा.
- अभ्यासक्रम त्या त्या ठिकाणच्या वातावरणानुसार असावा.
- अभ्यासक्रम बालकांचा भावनिक विकास घडविणारा असावा.
- अभ्यासक्रम बालकांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करणारा व उत्तरोत्तर विकसित करणारा असावा.
- अभ्यासक्रम सामाजाच्या गरजा सोडविण्यास मदत करणारा असावा इत्यादी.
शिक्षकांची भूमिका :
- बालकांना सर्व गोष्टींत मार्गदर्शन करणे.
- शैक्षणिक उद्देशाप्रती जागृत असणे.
- बालकांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता सर्वतोपरी साह्य करणे.
- बालकांना काय शिकवावे, याबाबत शिक्षकाने स्वतंत्रपणे निर्णय घ्यावे.
त्याचबरोबर बालकेंदित शिक्षणात बालकांना स्वप्रेरित करणे, अभ्यासात रस निर्माण करणे, कृतिशील करणे, प्रयत्नशील बनविणे, स्वत:च्या उमेदीने शिकण्यास प्रोत्साहित करणे, आपल्या कलाने, निवडीने, योग्य तो वेळ घेऊन शिकायला उद्युक्त करणे इत्यादी जबाबदाऱ्या घेण्यास बालकांना प्रेरित करण्याचे काम शिक्षकाला करावे लागते. या नव्या पद्धतीची नवी कौशल्ये शिक्षक व विद्यार्थ्यी आपापल्या गरजेप्रमाणे आत्मसात करतात. विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनामुळे शिक्षणव्यवस्थेतही ‘विद्यार्थीकेंद्री वर्गरचना’, ‘विद्यार्थीकेंद्री वातावरण’, शिकण्यासाठी लागणारी साधने व अन्य साधनसामग्री या सर्व गोष्टींत विचारपूर्वक बदल करून त्याचीही शास्त्रे व तंत्रे विकसित केली जातात.
बालकेंद्री शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याच्या पद्धतींतही मूलगामी फरक असतो. मूल्यमापन पद्धतीत सातत्यपूर्ण मूल्यमापनाची पद्धती विचारात घेतली जाते. उदा., विद्यार्थ्यांच्या लेखी-तोंडी परीक्षा इत्यादी. मुलांना प्रत्येक घटकाचे आकलन झाले अथवा नाही हे सातत्यपूर्ण मूल्यमापन पद्धतीद्वारे तपासले जाते. त्यातून सदर संकल्पना मुलांना कितपत समजली आहे अथवा समजली नाही, हे शिक्षक व पालकांनाही कळू शकते. परिणामत: त्यावर उपाययोजना होऊन बालकाला आपला अभ्यास, आपली समज पुढे नेण्यास वाव मिळतो. यातून बालकाचे शिकणे अधिक गुणवत्तापूर्ण होऊ शकते.
या संकल्पनेसंदर्भात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या बालककेंद्री आणि बालकस्नेही (Child Friendly) या दोन दृष्टिकोनांमध्ये फरक करावा लागतो. बालकस्नेही दृष्टिकोन हा शिक्षक व तत्सम प्रौढ यांचा मुलांशी असणारी वागणूक स्नेहपूर्ण किंवा मैत्रीपूर्ण असावी, असे सांगतो. यात कुठल्याही प्रकारच्या शिक्षांना मज्जाव असतो. सर्व मुलांकडे समान दृष्टीने पाहणे अपेक्षित असते. अशा वातावरणात मुलांना सुरक्षित वाटते. आपल्याला किंमत, मान दिला जातो, हे त्यांच्या लक्षात येते. याचा परिणाम मुले सामान्यपणे शिक्षकांचे ऐकून घेण्याच्या व त्यांच्या सूचना पाळण्याच्या मनस्थितीत राहतात. शाळेतील पारंपरिक, वर्तनवादी पद्धतींतही शिक्षकवर्ग आपला दृष्टिकोण बालकस्नेही ठेवू शकतो. अशा शाळेत अर्थातच मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता काही प्रमाणात तरी उंचावू शकते.
बालकेंद्री दृष्टिकोन हा अधिक व्यापक दृष्टिकोन आहे. तो केवळ शिक्षकाच्या वागणुकीशी निगडीत नाही; तर त्यासह तो शाळेचे एकूण वातावरण, व्यवस्थापन, वर्गातील रचना, वर्गातील शिकण्याच्या पद्धती, मुख्यत: मुलांना मिळणारे स्वातंत्र्य आणि त्यांच्या गरजांची घेतली जाणारी वैयक्तिक स्तरावरची दखल या सर्वांशी संबंधित आहे. मुलामुलांमध्ये असणारे नैसर्गिक आणि परिस्थितीजन्य फरकही यात विचारांत घेतले जातात. शालेय वर्गसंस्कृती बदलण्याची व शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण घडविण्याची ताकद या संकल्पनेत आहे.
भारतात केंद्रसरकारने २००५ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘राष्ट्रीय शिक्षणक्रम आराखड्या’त बालकेंद्री शिक्षणाचा दृष्टिकोण ठळकपणे पुढे आणला आहे. भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात अलीकडे अवलंबिलेल्या ‘रचनावादी शिक्षण’ (Constructivism) पद्धतीत बालकेंद्री दृष्टिकोन पूर्णांशाने व्यक्त झालेला आहे. हा दृष्टिकोन केवळ शालेयच नव्हे, तर महाविद्यालयीन व विद्यापीठीय स्तरांवरही मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरतो. यातून मुले स्वत:हून अधिक प्रमाणात व गुणवत्तेने शिकतात. जे शिकतात ते त्यांच्या दीर्घकाळ स्मृतीत राहते. यावर आता जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.
समीक्षक – अनंत जोशी
वर्तनवादी शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना अनेक बंधने असतात त्यामुळे शिकण्याकडे त्याचे लक्ष कमी असते याउलट रचनावादी शिक्षणपद्धतीमध्ये मुलांना स्वातंत्र्य असल्यामुळे मुले खूप चांगल्या पद्धतीने शिकतात हे दिसून येते. वरील लेख छान वाटला. धन्यवाद