औद्योगिक क्रांतीनंतर विकसित झालेले सामाजिक प्रारूप. औद्योगिक क्रांतीत्त्योर समाज हा मानवी समाजाच्या उत्क्रांतीतील औद्योगिकरणानंतरचा टप्पा मानला जातो. ही अवस्था ज्या देशांनी प्रथम औद्योगिक क्रांतीचा अनुभव घेतला अशा देशांमध्ये अनुभवयास येते. अमेरिका, पश्चिम यूरोप आणि जपानमध्ये औद्योगिक क्रांतीत्त्योर समाज पहावयास मिळतो.

१८ व्या शतकात यूरोपात विशेषत: इंग्लडमध्ये उत्पादनपद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाला.शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेऐवजी यंत्रांवर आधारित उद्योगधंदे निर्माण झाले.यंत्राच्या सहाय्याने उत्पादन करण्याची औद्योगिक क्रांती उदयास आली. औद्योगिक क्रांती अनुभवलेल्या देशांमध्ये २० व्या शतकात जी आर्थिक स्थित्यंतरे झाली त्यातून  औद्योगिक क्रांतीत्त्योर समाज निर्माण झाला.औद्योगिक क्रांती झालेल्या देशांमधील अर्थव्यवस्थेमध्ये मुख्य हिस्सा हा उत्पादन क्षेत्राचा होता;परंतु औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजामधील अर्थव्यवस्थेमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा उत्पादन क्षेत्रापेक्षा अधिक असतो.

औद्योगिक क्रांतीउत्तोर समाज ही संकल्पना प्रथम अमेरिकन समाजशास्त्रज्ञ डेनिअल बेल याने वापरली. बेल याने १९७३ साली The Coming of Post-Industrial Society: A Venture in Social Forecasting या ग्रंथामध्ये ही संकल्पना मांडली. बेल याने औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजाचे लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत : अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाऐवजी सेवांच्या निर्मितीवर भर दिला जातो. देशातील फार थोडे उद्योगधंदे प्रत्यक्ष उत्पादन निर्मितीमध्ये असतात. वस्तूंचे उत्पादन करण्यापेक्षा नवीन सेवांची निर्मिती करुन नफा मिळविला जातो. अर्थव्यवस्थेतील प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपेक्षा सेवा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या कंपन्यांचे आर्थिक सामर्थ्य आणि राजकीय प्रभाव वाढतो. सध्या अमेरिकेत गुगल, फेसबुक, बर्कशायर, हॅथवे आदि सेवा क्षेत्रातील कंपन्या या आकाराने उत्पादनक्षेत्रातील कंपन्यांपेक्षा मोठ्या आहेत.

जागतिकीकरण आणि स्वयंचलित यंत्रांच्या उदयामुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे संघटित कामगारांचे, अंगमेहनतीचे काम करणाऱ्या कामगार वर्गाचे महत्त्व कमी झाले. या कामगार वर्गाऐवजी समाजामध्ये संगणक अभियंता, डॉक्टर, बँकर्स, वैज्ञानिक अशा पांढरपेशा व्यावसायिकांचा नवा वर्ग उदयास आला. औद्योगिक कामगार वर्गाची जागा पांढरपेशा कामगार वर्ग घेत आहे. कारण उत्पादन दुसरीकडे (दुसऱ्या देशांमध्ये) हलविले जात आहे. समाजामध्ये शाळा, दवाखाने, संशोधन संस्था आदि संस्था ज्यांच्याकडे नफा मिळविण्याच्या हेतूने पाहिले गेले नव्हते, त्यांमध्ये बाजारपेठ आणि नफा मिळविण्याचा प्रयत्न खाजगी संस्थांकडून केला जातो.

औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजामध्ये ज्ञानाला भांडवलाचा दर्जा प्राप्त होतो. सैद्ध्यांतिक ज्ञानाऐवजी व्यावहारिक ज्ञानाला प्राधान्य दिले जाते. नवीन ज्ञाननिर्मितीतून संपत्ती निर्माण होण्याच्या शक्यता निर्माण होतात. ज्ञाननिर्मितीतून या समाजामध्ये भांडवल निर्मिती होते. नवीन कल्पना किंवा शोध हे अर्थव्यवस्थेला कलाटणी देतात. उद्योगनिर्मितीची पारंपरिक गणितं या समाजात मोडीत निघतात.नव्या कल्पना असणारा व्यक्ती अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहचतो. उदा. फेसबुकच्या माध्यमातून मार्क झुकेरबर्ग या विशीतील युवकाने कोणत्याही औद्योगिक घराण्याच्या पार्श्वभूमीशिवाय उद्योजक होण्याचे स्वप्न साकार केले. Amazon, Pay Pal, Pay Tm, Uber, Facebook आदि कंपन्यांनी केवळ कल्पक विचारांच्या साहाय्याने आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीचा फायदा घेत उद्योगधंदे उभारले. या उद्योगांच्या निर्मितीचे गमक हे भांडवल नसून कल्पनाशक्ती हे आहे. Amazon किंवा Uber या कंपन्यांनी कोणत्याही स्वरुपाची निर्मिती न करता ग्राहक आणि उत्पादक यांना जोडणारे व्यासपीठ निर्माण (माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने) करुन उद्योग उभारले. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचे महत्त्व कमी होऊन वरील कंपन्यांसारखे व्यासपीठ पुरविणाऱ्या कंपन्यांचे महत्त्व वाढले आहे. या समाजामध्ये भांडवल असलेलाच व्यक्ती उद्योजक होईल असे नाही, तर ज्याच्याकडे नवीन कल्पना आहेत अशा व्यक्तीलाही मोठा उद्योजक होण्याची संधी निर्माण झालेली आहे.

माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सायबरनेटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्तनवादी अर्थशास्त्र यांसारख्या नवीन विद्याशाखेचा उदय या समाजामध्ये होतो. या विद्याशाखांच्या माध्यमातून प्रगतीच्या नवीन शक्यतांचा शोध घेतला जातो. नव्याने उदयास येणाऱ्या तंत्रज्ञानाचा समाजावर होणारा परिणाम तपासला जातो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यापीठे आणि तंत्रविद्यानिकेतन संस्थांवर अधिक भर दिला जातो. या संस्थांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजाला आवश्यक अशा प्रमाणात तंत्रज्ञ पुरविले जातात. वर्तनवादी अलगोरिथम आणि तत्सम तंत्राच्या सहाय्याने व्यक्तीवर्तनाचा अभ्यास होतो. या अभ्यासाच्या मदतीने व्यक्तींचे राजकीय वर्तन प्रभावित करण्याचा किंवा तपासण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांच्या अभिवृत्तीनुसार त्यांना वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यासाठी त्यांचा इंटरनेटवरील आणि सोशल मिडीयावरील वापराचा आधार घेतला जातो. औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजात पारंपरिक विद्याशाखेचे महत्त्व कमी होऊन त्याऐवजी नवीन उदयास आलेल्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत शाखांना महत्त्व प्राप्त होते.

औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजात केवळ अर्थव्यवस्थेतच बदल होत नाहीत, तर या बदलांचा परिणाम सामाजिक व्यवहारांवर देखील होतो. उत्पादन प्रक्रियेच्या आउटसोर्सिंग(बाह्यस्रोत) मुळे मूळ देशातील लोकांचा दृष्टीकोन परकियांबाबत किंवा निर्वासितांबाबत बदलतो. समाजातील जे घटक पूर्वी उत्पादन प्रक्रियेशी जोडलेले होते त्यांना नवीन अर्थव्यवस्थेत योग्य ती सामाजिक भूमिका मिळत नाही.

समाज या संकल्पनेशी औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजाचा प्रत्यक्ष परिणाम झालेला दिसतो. समाज ही भौगोलिक सलगतेतून निर्माण होणारी गोष्ट न राहता ती विविध ठिकाणी विखुरलेल्या परंतु समान विचारांच्या व्यक्तींमधील भावनिक जवळीकतेने बनते. इंटरनेट आणि दूरसंचार क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे दूर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तींमध्ये संवाद साधणे शक्य होते.कामाच्या ठिकाणी असणाऱ्या किंवा सहकामगारांपेक्षा वेगळे विश्व निर्माण होण्यास संसूचन साधनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे शक्य होते. त्यामुळे औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजात सोशल नेटवर्कींग वेबसाईटच्या माध्यमातून लोक एकत्रित येताना दिसतात. मानवी संबंधांमध्ये देखील तंत्रज्ञानाने शिरकाव केलेला आहे.

औद्योगिक क्रांतीत्त्योर समाजामध्ये ज्ञान ही सत्ता आहे तर तंत्रज्ञान हे साधन आहे.उत्पादन प्रक्रिया आणि सेवा यांमधील संबंध बदलतात.या समाजातील सेवा,तंत्रज्ञान आणि माहिती यांना उत्पादनापेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. या समाजामध्ये सेवा क्षेत्राचे महत्त्व हे प्राथमिक आणि दुय्यम क्षेत्रापेक्षा अधिक वाढलेले असते.

संदर्भ :

  • Bell, Daniel, The Coming of Post-Indus rial Society, New York: Harper Colophon Books,1974.

प्रतिक्रिया व्यक्त करा