ग्लॅडिओलस हे लांब दांड्याच्या फुलांमधले एक लोकप्रिय व व्यापारी फुलपीक आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये सजावट व गुच्छ बनविण्यासाठी या फुलांना वर्षभर मागणी असते. याची लागवड खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात करतात. भारतामध्ये या पिकाची प्रथम लागवड १८६२ साली करण्यात आली. अनेक रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या याच्या विविध जाती सध्या महाराष्ट्रात लागवडीखाली आहेत.
जमीन : हे कंदवर्गीय पीक असल्याने कंदाच्या पोषणासाठी व फुलोत्पादनासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली उत्तम निचऱ्याची जमीन निवडणे फायद्याचे ठरते. मध्यम ते भारी परंतु पोयट्याच्या जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनी या पिकास चांगल्या मानवतात. जमिनीचा सामू ६.७-७.५ च्या दरम्यान असावा. जमीन हवेच्या वेगापासून संरक्षित असावी. चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त चिकण जमीन या पिकास लागवडीयोग्य नाहीत.
हवामान : पिकाच्या योग्य वाढीसाठी २०-३००से. तापमान आवश्यक असते. कडक ऊन आणि सततचा जोरदार पाऊस या पिकास मानवत नाही.महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्याने उन्हाळी हंगामातसुद्धा ग्लॅडिओलसची लागवड शक्य होते. पिकाच्या वाढीसाठी व फुलोत्पादनासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश व थंड हवामानाची गरज असते.
जातींची निवड : ग्लॅडिओलसच्या ३० हजारांहून अधिक जाती प्रचलित असून त्यामध्ये दरवर्षी नवीन जातींची भर पडत असते. त्यामुळे व्यापारी दृष्टीकोनातून जातींची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. फुलांचा रंग, फुलदांड्यावरील एकाच वेळी फुललेल्या फुलांची संख्या, दांड्याची लांबी, रोग व किडीसाठी प्रतिकारकता या गुणांचा विचार करून जातींची निवड करणे हितावह ठरते. भारतात तसेच परदेशातील लागवडीसाठी निवड करण्यात आलेल्या काही जातींची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.
अक्र. | जातीचे नाव | फुल येण्यास लागणारे दिवस | फुलदांड्यावरील फुलांची संख्या | फुलांचा रंग |
१ | संसरे | ७७ | १७ | पांढरा |
२ | यलोस्टोन | ८० | १६ | पिवळा |
३ | ट्रॉपिक्सी | ७७ | १४ | निळा |
४ | फुले गणेश | ६५ | १७ | फिकट पिवळा |
५ | फुले निलरेखा | ६६ | २१ | निळा |
६ | फुले प्रेरणा | ८० | १५ | फिकट गुलाबी |
७ | सुचित्रा | ७६ | १७ | फिकट गुलाब |
८ | नजराणा | ८१ | १४ | गर्द गुलाबी |
९ | पुसा सुहागण | ८४ | १४ | लाल |
१० | हंटिंग साँग | ८० | १५ | केशरी |
११ | सपना | ५९ | १४ | पिवळसर सफेद |
बियाण्याची निवड : ग्लॅडिओलसची लागवड कंदांपासून करतात. ग्लॅडिओलस पिकाची यशस्वीता बियाणांच्या निवडीवर अवलंबून असते. कंदाचे मोठे, मध्यम व लहान असे तीन प्रकार असतात. यातील मोठ्या व मध्यम गटातील कंदांच्या फुलदांड्यांचे उत्पादन अधिक येते.लागवडीसाठी शीतगृहात तीन महिने पूर्ण विश्रांती दिलेल्या मध्यम ते मोठ्या कंदांची निवड करावी. साधारणत: हेक्टरी १.२५ ते १.५० लाख कंद लागवडीसाठी लागतात. लागवडीपूर्वी कंदांना बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी कंद कॅप्टॉप या बुरशीनाशकाच्या ३ ग्रॅ./लि.पाण्याच्या मिश्रणात २०-२५ मिनिटे बुडवून लावावेत.
लागवड : ग्लॅडिओलसची लागवड सरी, वरंबा, सपाट अथवा गादी वाफ्यावर करतात. लागवडीसाठी दोन ओळींमध्ये ३० सेंमी. व दोन कंदात १५ ते २० सेंमी. अंतर ठेवावे. पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टीने तसेच लागवडीनंतर आंतर मशागतीच्या सुलभतेसाठी व फुलदांडीच्या सरळ वाढीसाठी आणि फुले काढणीनंतर कंदांच्या योग्य पोषणासाठी ग्लॅडिओलसची सरी वरंब्यावर लागवड करणे फायद्याचे ठरते. सरी वरंब्यावर लागवडीसाठी ४५ x १५ सेंमी अंतर ठेवावे. लागवड करताना मातीत ५-७ सेंमी. खोल कंदांची लागवड करावी.
खत व पाणी व्यवस्थापन : ग्लॅडिओलसच्या उच्च व चांगल्या प्रतीच्या उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. जमीन तयार करताना हेक्टरी ४०-५० टन शेणखत जमिनीच्या गुणधर्मानुसार मातीत मिसळावे. लागवडीच्या वेळी २०० किग्रॅ. स्फुरद व २०० किग्रॅ.पालाश प्रती हेक्टर द्यावे. ३०० किग्रॅ. नत्राची मात्रा लागवडी वेळी अर्ध नत्र व लागवडीनंतर पिकास २, ४ आणि ६ पाने आल्यावर ( सुमारे ३, ५ व ७ आठवड्यांनी) उरलेले अर्ध नत्र समान मात्रेत विभागून द्यावे. लागवडीनंतर नियमित परंतु पिकाच्या योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. जमिनीच्या गुणधर्मानुसार दोन पाण्यातील अंतर ७-८ दिवसांचे असावे. फुले काढल्यानंतर पुढे कंदांच्या वाढीसाठी एक ते दीड महिना पिकाला नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी वेळोवेळी तणाचा नाश करावा. प्रत्येक खुरपणीच्या वेळी पिकाला मातीची भर द्यावी. त्यामुळे फुलदांडे सरळ वाढण्यास तसेच जमिनीअंतर्गत कंदांच्या वाढीसाठी व पोषणासाठी मदत होते.
फुलांची काढणी व उत्पादन : कंदांना दिलेला विश्रांतीचा काळ, आकार व लागवडीसाठी निवडलेल्या जातीनुसार लागवडीपासून सर्वसाधारण ६०-७० दिवसात ग्लॅडिओलसचे फुलदांडे काढणीस तयार होतात. दांडीची एकदा काढणी सुरू झाली की, ती पुढे महिनाभर चालू राहते. फुलदांड्यावरील पहिले फूल रंग दाखवून उमलू लागले की, दांड्याची काढणी करतात. दांडी काढताना मूळ रोपाला ४-५ पाने ठेवून दांडा काढावा. फुलदांड्याच्या लांबीनुसार व रंगानुसार प्रतवारी करावी. प्रतवारी केलेल्या १२ फुलदांड्याची एक जुडी बांधून त्याच्याभोवती कागद गुंडाळून बांबू अथवा पुठ्ठ्याच्या खोक्यात १५-२० जुड्या बांधून बाजारपेठेत पाठवितात. प्रतिहेक्टरमधून १.५ ते २ लाख फुलदांड्यांचे उत्पादन मिळते.
कंदाची काढणी व निगा : झाडाला ४-५ पाने ठेवूनच ग्लॅडिओलसच्या फुलदांड्याची काढणी करावी. फुलदांड्याच्या काढणीनंतर जमिनीत वाढणाऱ्या ग्लॅडिओलसच्या कंदांचे पोषण सुरू होते व ते पुढे दीड ते दोन महिने चालते. त्यामुळे फुलदांडे काढणीनंतर पिकाला नियमित पाणी द्यावे व योग्य ती आंतर मशागत करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून टाकावे. झाडाची पाने नैसर्गिक रीत्या पिवळी पडू लागल्यास कंद काढणीस तयार झाले असे समजावे व पिकास पाणी देणे बंद करावे. पुढे जमीन वाफस्यावर आल्यावर कंद काढावेत. कंद काढताना कंदांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. जातीनुसार कंदांची अलग अशी काढणी करावी. काढलेल्या कंदांची लहान, मोठे व एकदम बारीक अशी प्रतवारी करून त्यांवर कॅप्टॉप बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी ३ ग्रॅ. कॅप्टॉप एक लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या द्रवणात १५ ते २० मिनिटे कंद बुडवून सुकवावेत. अशी प्रक्रिया केल्यावर कंद चांगल्या कापडी पिशवीत बंद करून लेबल लावून शीतगृहात ७ ते ८° से. तापमानाला ३ महिने ठेवावेत. अशा प्रकारे साठवण केलेल्या कंदांची एकसारखी उगवण होऊन फुलझाडांची गुणवत्ता वाढते. हेक्टरी सु. १.५ ते २ लाख मोठे व इतर लहान कंद मिळतात.
रोग व किड व्यवस्थापन : ग्लॅडिओलस या पिकावर कंदकूज हा रोग व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. कंदकूज हा बुरशीजन्य रोग लागवडीत रोगट कंद वापरण्याने होतो. तसेच जमिनीतून पाण्याचा निचरा नसल्यानेही हा रोग फैलावतो. यामुळे पाने पिवळी पडून मरतात. उपाययोजना म्हणून लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत. तसेच रोगट झाडे आढळल्यास ताबडतोब कॅप्टॉप द्रावणाची फवारणी करावी.
पाने खाणाऱ्या अळ्या पानांच्या कडा खरवडून खातात किंवा पानांना भोके पाडतात. कधीकधी ही कीड जमिनीलगत रोप कातरते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागवडी वेळी हेक्टरी २० किग्रॅ. फोरेट जमिनीत मिसळावे. तसेच किडीचा प्रादुर्भाव लक्षात येताच २ मिलि. क्विवॉलकॉस एक लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
संदर्भ :
- Bose,T.K.;Yadav,L.P.“Gladiolus,”Commercial Flowers, Noya Prokash,Calcutta,1989.
समीक्षक – भीमराव उल्मेक