मानव इतर प्राण्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ व अधिक ज्ञानी समजून जगण्याच्या अधिकारासाठी, तो इतर प्राणी आणि पर्यावरण यांच्या क्षतीबद्दल निष्काळजी राहतो. त्या राहण्याच्या दृष्टिकोनाला मानवकेंद्रवाद म्हणतात. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतर जीवसृष्टी व वृक्षवल्ली यांच्या हानीकडे दुर्लक्ष करतो, ही मानव केंद्रवादाची मुख्य लक्षणे होत.

गेल्या दोन-अडीचशे वर्षांत मानवाने जंगलतोड, शिकार, खोदकाम, भूजलाचा अवास्तव वापर, ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब इत्यादींद्वारे विषारी वायूचे केलेले अभिसरण यांद्वारे पर्यावरणाचा विनाश केवळ अतृप्त तृष्णा शमविण्यासाठी केला आहे. मानवाची विकासाची अतृप्त भूक जणूकाही या परिस्थीतीस मुख्य कारणीभूत ठरली आहे. या संबंधी अनेक प्रश्न उद्भवतात. जसे की, पर्यावरणऱ्हासाचे मुख्य कारण नेमके काय? मानवाचा पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे काय? ज्यामुळे अशा घटना घडतात. पर्यावरणाची अतिशय झपाट्याने होणारी घसरण ही मुख्यत: मानवकेंद्रित आहे का? यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

पृथ्वीच्या इतिहासात मानवाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्यांनी तिच्या भूपृष्ठावर अतोनात बदल केलेले नाहीत. पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व सु. एक लक्ष वर्षांपासून आहे, असे म्हटले जाते; परंतु या कालावधीत मानवाने पृथ्वीचे भूपृष्ठ आणि अंतराळ यांत एवढा बदल केलेला नाही, जेवढा तो गेल्या दोन-अडीचशे वर्षांत झाला आहे. दोन शतकांतील औद्योगिक क्रांतिमुळे त्याने निसर्गस्रोतांची कमतरता, पृथ्वीतलावर परिस्थितिजन्य क्षालन न होणाऱ्या पाऊलखुणा सोडत आहे. जसे की, विषारी वायूंचे उत्सर्जन, अविघटनशील पदार्थ. परंतु या परिस्थितीचे कारण काय? काय या गतीला आवर न घालणारी वैज्ञानिक प्रगती जबाबदार आहे? किंवा ते आपण चुकीने घेतलेल्या मूल्यांच्या धोरणात आहे? या व अशा अनेक प्रश्नांवर विचार केल्यानंतर असे लक्षात येते की, पाश्चात्त्य संस्कृतीत सुरुवातीपासूनच मानवकेंद्री दृष्टीकोन रुजवलेला आहे आणि पाश्चात्त्यीकरणाचा प्रभाव संपूर्ण जगावर पडलेला असल्याने या पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत.

मानवकेंद्र दृष्टिकोनाचा मूलस्रोत : ज्यू व ख्रिस्ती हे दोन मोठे धर्म मानवकेंद्रित दृष्टिकोनाचे प्रेरणास्थान व स्रोत आहेत. बायबलच्या प्रथम प्रकरणात जेनेसीस (‘जगाची उत्पत्ति’) या पुस्तकात असे वर्णन आहे की, “ईश्वराने त्याच्या प्रतिमारूप मानवाची निर्मिती केली आहे आणि बाकीच्या सगळ्या जीवसृष्टीला मानवाचे आज्ञापालन करण्याची आज्ञा दिलेली आहे आणि अन्य प्राणिमात्रांची मानवाची सेवा कशी करावी, हे सांगितले आहे”.

त्यानंतर ईश्वर म्हणाला, “आपण आपल्यासारखीच माणसांची निर्मिती करूया, माझ्या प्रतिबिंबासारखे. त्यांनी समुद्रातील माशांवर, हवेतील पक्षी, आणि प्राणी यांवर राज्य करावे”, अशा प्रकारे ईश्वराने त्याची निर्मिती केली आहे. त्यांना पुरुष, स्त्री असे निर्मिले आहे. ईश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला, “फलदायी हो, संतती वाढो, पूर्ण पृथ्वी भरून काढ, पृथ्वीला वश करून ताब्यात आण व हवेतील पक्षी, समुद्रातील मासे आणि सृष्टितील प्रत्येक सजीव जी जमिनीवर चल करते, त्या सर्वांवर राज्य कर.” नंतर म्हणाला, “या पृथ्वीतलावरील प्रत्येक बीजयुक्त रोप मी तुला देतो आणि प्रत्येक वृक्ष ज्यास बीजयुक्त फळ आहे, ते तुझे अन्न असतील, तसेच सृष्टितील संपूर्ण प्राणिजात ज्यात श्वसन-जीवन आहे, आणि प्रत्येक हिरवा वृक्ष हे सर्व तुला अन्न म्हणून देतो.” असेच ते झाले (पुस्तक एक : जेनेसिस २७ ते ३०). अशा प्रकारचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन ज्यात माणूस हाच केंद्रस्थान आहे आणी जिथे या सृष्टिनिर्मितीचे प्रत्येक अंग माणसाकरिताच आहे, या दृष्टिकोनाला मानवकेंद्री दृष्टीकोन असे म्हणतात.

ग्रीक तत्ववेत्ता अ‍ॅरिस्टॉटलनेसुद्धा आपल्या पुस्तकात असे दर्शविलेले आहे की, निर्सगाने त्यातील प्रत्येक गोष्ट विशेषेकरून माणसाकरिता निर्मिली आहे (पॉलिटिक्स बुक -१- प्रकरण ८). तो पुढे म्हणतो की, निसर्गातील वस्तू, प्राण्याला, स्वाभाविक असे स्वतःचे मूल्य नाही. यांचे मूल्य केवळ मानव जीवनाच्या उपयोजनावरच अवलंबून आहे. हा मानवकेंद्री दृष्टीकोन इस्लामनेदेखील स्वीकारलेला दिसतो. इस्लाम धर्मानुसार मानव हा ईश्वर निर्मितीचे परिपूर्ण रूप आहे आणि मानवाकरिता हे जग निर्माण करण्यात आले आहे.

ज्यू, ख्रिस्त आणि इस्लाम धर्म मानतात की, निर्मात्याने मानवाचे जीवन हे एकवेळचीच संधी म्हणून दिलेले आहे. म्हणून जीवन जास्तीत जास्त गोष्टींनी भरून काढणे हे एकमेव साध्य बनते. मानवाकरिता प्रत्येक वस्तू ही मौजमजा, आनंदाचा स्रोत आहे, असे बघितले गेल्याने ही पद्धतीच प्रत्येक निसर्ग साधनसंपत्तीच्या शोषणाचा मार्ग बनली आहे.

पर्यावरण तत्त्वज्ञानात नुकतेच झालेले काही बदल : अशा प्रकारे पाश्चात्त्य जगाने, जे वारसा म्हणून त्यांच्या संस्कृतीने सुरुवातीपासून जे मानवकेंद्री मूल्ये जोपासलेले आहे, आणि या दृष्टिकोनानुसार संपूर्ण विश्वात इतर प्राण्यांपेक्षा मानव हा अत्यंत उच्च दर्जाचा अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा मध्यवर्ती जीव आहे. या दृष्टिकोनानुसार मानव हा निर्सगापासून केवळ वेगळाच नाही, तर तो निसर्गाहून श्रेष्ठ आहे. ह्या निर्सगातील इतर सर्व घटक उदा., वनस्पती, प्राणी, खनिज द्रव्ये ही सर्व मानवासाठीच आहेत. मानव ह्या सर्वांचा वापर स्वत:च्या फायद्यासाठीच करू शकतो. या दृष्टिकोनामुळे मागच्या दोन-अडीचशे वर्षांमध्ये पर्यावरणाचे खूप शोषण झालेले दिसून येत आहे. असेच काही बदलेलेले दृष्टीकोन खाली देत आहे. परंतु या संदर्भातील नवनवे धोरणसुद्धा पूर्णपणे पर्यावरणकेंद्रित नाही. यातसुद्धा काही प्रमाणात मानवाचा स्वार्थ आणि स्वःताचे संतुष्टीकरण दिसून येत आहे. ब्रॅयन नॉर्टन, क्रीस्टन श्रॅडर आणि जॉन पसॉमोर हे मानवकेंद्र दृष्टिकोनाचे समर्थक आहेत.

१. पर्यावरणीय मानवतावाद : पर्यावरणीय मानवतावाद हा मानवाच्या प्रगतीला लगाम लावून नियंत्रित करतो व त्याला नवी योग्य दिशा देण्यावर भर देतो. जेणेकरून सर्व मानवप्रजाती जास्तीत जास्त काळ टिकून राहील, या ध्येयाने स्वतः पुर्नपरिसर परिचीतता करून घेण्याची शिफारस हा पर्यावरणवाद करतो. हा पर्यावरणीय मानवतावाद ज्या बोधवाक्यावरून उभारलेला आहे, ते म्हणजे “जर तुम्ही चुकीच्या दिशेने जात असाल, तर तुमच्या गतीचे काही मूल्य नाही, म्हणून गतीबरोबर दिशानिश्चिती आवश्यक असते”.

हा पर्यावरण मानवतावाद सामाजिक आचारणातील बदलाचा पुरस्कार करतो, परंतु हा सुचविलेला बदल पर्यावरणाची काळजी घेतो म्हणून नव्हे. परंतु मानवाच्या जीवनाला पर्यावरणबदलामुळे येणाऱ्या समस्यांचे निराकारण मात्र आहे, थोडक्यात असे की, पर्यावरणीय मानवतावाद हा केवळ माणसाच्या फायद्यासाठीच पर्यावरण परिसंरक्षणाचा पुरस्कार करतो.

ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटॅगोरस याने असे विधान केले आहे की, “माणूस हाच सर्व बाबींचे मोजमाप आहे.” या विधानाचा प्रभाव पर्यावरण मानवतावादीतसुद्धा आहे. हे धोरण निसर्गास केवळ साधनमूल्यता प्रदान करते आणि निसर्गातील सजीव-निर्जीव यांच्या अंगीभूत मूल्यांना ते मान्यता देत नाही. म्हणून पर्यावरणीय मानवतावादसुद्धा मानवालाच सृष्टीचा केंद्रबिंदू मानून सगळीकडे एक साधनमूल्य दृष्टिकोनातून बघतो.

२. पर्यावरणीय समाजवाद : समाजवादी मतप्रणालीतदेखील पर्यावरण काळजीचा निचरा झालेला आहे आणि समाजवादाशी पर्यावरण परिस्थितिकीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न आजकाल होत चालला आहे. पर्यावरणीय समाजवादाच्या दृष्टीने भांडवलवाद्यांनी भरपूर प्रमाणात मजूर कामाला लावून निसर्गस्रोतांचे शोषण केले व नफा कमावला. म्हणूनच पर्यावरणाची घसरण झाली. उत्तरभांडवलशाही जग जे भविष्यात अंदाज करते की, संपूर्ण जग या भविष्यकाळात असमानता व शोषणापासून मुक्त होईल आणि नुसते मानवप्राणीच नव्हेत, तर संपूर्ण प्राणी, वृक्ष-वेली आणि इतर सर्व जीवसृष्टी या भांडवलशाही शोषणापासून मुक्त होईल.

निष्कर्ष : आपण आपल्या पूर्वजांपासून वारसा म्हणून पृथ्वी घेत नाही. उलट, आपण आपल्या भावी पिढीकडून ती उसनी, उधार घेत असतो. अशी ही महत्त्वपूर्ण समज आजच्या मानवी मनावर, प्रारंभीत झालेली दिसते. पर्यावरणाचे प्रदूषण आणि ऱ्हासाचे कारण वैज्ञानिक प्रगती नव्हे, तर त्याचा मूलस्रोत मानवाने चुकीने निवडलेल्या मूल्य, उपभोगतावाद आणि मानवकेंद्री दृष्टिकोनातच आहे. म्हणून पर्यावरणकेंद्रीय पौर्वात्य संस्कृतीचे मूल्य नुकतेच पुन्हा मानवी दृष्टिपटलावर येत असताना दिसत आहे.

संदर्भ :

                                                                                                                                                                        समीक्षक – संगीता पांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा