संस्कृतमधील नीतिकथांचा प्रसिद्ध ग्रंथ. पंचतंत्राचा हा बंगाली पाठ होय. बंगालचा राजा धवलचंद्र ह्याच्या आश्रयास असलेल्या नारायण पंडितांनी तो लिहिला. संस्कृत तज्ज्ञांच्या मते नारायण पंडित ११व्या  किंवा १२व्या शतकात होऊन गेला असावा. इ.स.१३७३ मध्ये या ग्रंथाचे हस्तलिखित नेपाळमध्ये प्राप्त झाले. हितोपदेशाच्या आरंभीच नारायण पंडिताने पंचतंत्राचे ऋण मान्य केले आहे; तथापि यात पंचतंत्रातील कथांशिवाय काही नवीन कथा विशेषतः पंचतंत्रावरील विविध पाठात आढळणाऱ्या असून, कामंदकीय-नीतिसार या  ग्रंथातील बराचसा मजकूर नारायण पंडिताने त्यात अंतर्भूत केला आहे.या ग्रंथाची निर्मिती बंगालमध्ये झाली असल्यामुळे त्यातील एका कथेत गौरीपूजेचा धर्मविधी सांगितला आहे.त्यावरून नारायण पंडितावर शाक्तधर्माचा प्रभाव असल्याचे स्पष्ट होते. हा ग्रंथ मित्रलाभ, सुहृदभेद, विग्रह आणि संधी अशा चार परिच्छेदात विभागलेला आहे. संस्कृतातील  सुभाषितांचा चपखल उपयोग हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य होय.

ग्रंथाच्या सुरवातीस विष्णुशर्मा राजकुमारांना कथा सांगत आहे,असे दर्शवून पंचतंत्राविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. हितोपदेशातील सर्व कथा ह्या प्राणिविश्वाच्या कथा असून प्राणिविश्वाच्या परस्पर संवादातून मानवी जीवनाला उपयुक्त अशी नीतिमूल्ये ह्या कथांमध्ये आढळतात.संस्कृत भाषेचे वैभव वृद्धिंगत व्हावे आणि शहाण्या वर्तुणूकीचे ज्ञान प्राप्त व्हावे, हा या ग्रंथमागचा उद्देश आहे. त्याची लेखनशैली विष्णुशर्मनप्रमाणे साधी,सुबोध व आकर्षक आहे. या ग्रंथाचे पहिले भाषांतर सम्राट अकबराने अब्दुल फजलकडून करून घेतले.पुढे त्याची इंग्रजी व मराठीत अनुक्रमे भाषांतरे झाली.ख्रिस्ती धर्मप्रचारक विल्यम कॅरी आणि सर चार्ल्स विलिकन्झ हे काही इंग्रज प्रमुख अनुवादक होत. त्याचे पहिले मराठी भाषांतर मोडी लिपीत प्रसिद्ध झाले (१८१५). त्यानंतर बापूजी मार्तंड आंबेकर (१८३१), कृ. सुं. कीर्तीकर (१८८२) आणि रा. ग. बोरवणकर (१९३६) यांनी हितोपदेशाची मराठीत भाषांतरे केली आहेत.

संदर्भ :

समीक्षक – मंजूषा गोखले

प्रतिक्रिया व्यक्त करा