भाषेचा अभ्यास करण्याची पद्धती. भाषाभ्यासाच्या या पद्धतीत भाषेचा ऐतिहासिक आढावा घेतला जातो. भाषेचे पूर्वरूप आणि उत्तररूप यातील परस्परसंबंध तपासणे, हे या अभ्यासाचे एक उदिष्ट असते. तसेच अन्य तात्कालिक भाषांशी या भाषेची तुलना केली जाते. एकच भाषा वैकासिक टप्प्यांवर बदललेली दिसते. मराठीच्या बाबतीत यादवकालीन, बहमनीकालीन, पेशवे कालीन आणि अर्वाचीन हे मराठी भाषेचे कालिक वैकासिक टप्पे असून प्रत्येक भाषा अशा कालिक टप्प्यांतून संक्रमण करत असते. प्रत्येक टप्प्यावर या एकाच भाषेत काही ध्वनी (स्वन) परिवर्तने आणि अर्थपरिवर्तने झालेली दिसतात. उदाहरणार्थ पान हा शब्द अर्वाचीन मराठीत पर्ण (संस्कृत)> पण्ण (प्राकृत) या टप्प्यांतून परिवर्तन होऊन आला. कर्ण (संस्कृत)> कण्ण (प्राकृत)> कान (मराठी) या शब्दाच्या बाबतीतही असेच परिवर्तन झालेले दिसते. ‘मृग’ या शब्दाचा अर्थ प्राचीन संस्कृतमध्ये चतुष्पाद प्राणी असा होता. मराठीत तो ‘हरीण’ झाला. ऐतिहासिक भाषाविज्ञानात अशा स्वनपरिवर्तनांचा आणि अर्थपरिवर्तनांचा अभ्यास केला जातो. ही परिवर्तने का झाली याचे नियम सांगितले जातात;मात्र भाषिक परिवर्तनांचा अभ्यास करताना भाषेतील गैररूपे आणि अन्य भाषांतून उसनवारीने घेतलेले शब्द कटाक्षाने बाजूला ठेवावे लागतात. तसे न केल्यास परिवर्तनविषयक निष्कर्ष चुकण्याची शक्यता असते.
वेदकालीन भाषा आणि पाणिनीकालीन भाषा हे संस्कृतचे दोन कालिक टप्पे होत. या दोन टप्प्यांमध्ये कालमानानुसार बरीच परिवर्तने झाली आहेत. हे संस्कृत व्याकरणकारांच्या लक्षात आले होते. पण या परिवर्तनांचा शिस्तबद्ध अभ्यास त्या काळात केला गेला नाही. ऐतिहासिक भाषाविज्ञान सामान्य सिद्ध्तांत रूपाने मांडण्याचे श्रेय सर विल्यम जोन्स (१७४६-१७९४) यांना द्यावे लागते. १७८३ साली ते न्यायाधीश म्हणून कोलकात्याला आले. त्यांना ग्रीक, लॅटिन पर्शिअन, फ्रेंच, इटालियन, इ. भाषा येत होत्या. इथे आल्यावर ते संस्कृत शिकले. तेव्हा त्यांना ग्रीक, लॅटिन आणि संस्कृत या तीन भाषांत विलक्षण साम्ये आढळली. आणि हे साम्य योगायोगाने आलेले नसून यातील भाषा तसेच कदाचित गॉथिक,केल्टिक व प्राचीन इराणी या भाषाही आज जिचा पुरावा उपलब्ध नाही अशा एका मुल भाषेतून निघाल्या असाव्यात,असे त्यांचे विवेचन होते.कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटी पुढे जोन्स यांनी १७८६ मध्ये मांडलेली ही कल्पना संस्कृत व तसं भाषांच्या तुलनात्मक अभ्यासाचा प्रारंभबिंदू होय. जोन्स यांच्या सिद्धांतनाने ऐतिहासिक भाषाभ्यासाला गती मिळाली. मूळ भाषा व तिच्यापासून जन्माला आलेल्या अन्य भाषांना ‘भाषाकुल’ म्हटले जाऊ लागले. ‘इंडो-युरोपियन’ या भाषाकुलाचा सर्वात आधी अभ्यास झाला. त्यानंतर जगातील अन्य भाषाकुलांचा अभ्यास सुरू झाला. काही भाषांचा कोणत्याही भाषाकुलात समावेश करता येत नाही, हेही जाणवले.
एका भाषेत किंवा भाषाकुलात होणाऱ्या कालिक बदल,उगम ,विकास संबंध इत्यादी संबंधीच्या भाषा अभ्यासाला फिलॉलजी (philology) ही संज्ञा रूढ केली. १८व्या व १९व्या शतकात भाषाभ्यासाची हीच पद्धत सर्वाधिक प्रभावी होती. भाषेच्या सुट्या सुट्या अभ्यासाला व व्याकरणाला ‘व्यावहारिक’ व ‘अवैज्ञानिक’ मानले जात असे. २०व्या शतकात भाषेचा ‘वर्णनात्मक’ आणि ‘संरचनावादी’ अभ्यास सुरु झाल्यानंतर ऐतिहासिक भाषाभ्यासाचे स्थान नेमकेपणाने लक्षात आले. त्याच्या मर्यादा आणि सामर्थ्य उलगडले. हे अभ्यासक्षेत्र ‘ऐतिहासिक भाषाविज्ञान’ किंवा ‘द्वि-कलिक (कालक्रमिक) भाषाविज्ञान’ म्हणून आज ओळखले जाते.
ज्याला वर्णनात्मक अभ्यास हे नाव आहे,त्याचे तंत्र भाषेच्या ऐतिहासिक अभ्यासाठी लागू पडते. वर्णनात्मक भाषाविज्ञान आणि ऐतिहासिक भाषाविज्ञान परस्परविरोधी नाहीत, तर परस्परपूरक आहेत. एका भाषाकुलातील दोन भाषांचा किंवा एकाच भाषेतील दोन कालिक टप्प्यांचा आधी वर्णनात्मक अभ्यास केल्याशिवाय परिवर्तनांविषयीचे नियमन नेमकेपणाने करता येत नाही. ‘जनन’ ही संकल्पना मानवी कुलांना जशी लागू पडते तशी ती भाषाकुलांना तंतोतंत लागू पडत नाही. भाषेची एक अवस्था संपून दुसरी केव्हा सुरु झाली याची कालनिश्चिती करणेही अवघड असते. अशा अडचणींचे अभ्यासकांना भान आले आहे. या वैज्ञानिक दृष्टीनेच मूळ भाषा, दोन भाषांतील स्वन-अर्थ परिवर्तने आणि कालिक बदल यांचा ऐतिहासिक भाषाविज्ञानात अभ्यास होऊ लागला आहे.
संदर्भ :
- Arlotto,Anthony ,Introduction to Historical Linguistics,Bosten ,1972
- Bynon ,Theodora , Historical Linguistics, Cambridge University Press,1977.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.