आखाडी ( झाडीपट्टीतील) : गुरुपौणिमा किंवा व्यासपूजा म्हणून ओळखला जाणारा हा सण झाडीपट्टीत अकाडी (आखाडी) म्हणून साजरा करतात. वर्षभरांतील सणांची सुरूवात या सणापासून होते. मराठी कालगणनेनुसार आषाढ हा पहिला महिना. शेतक-यांसाठीही शेतीकामाचा तसा तो पहिला महिना असतो. गृहिणींचा या सणाला पहिला तेलरांदा (तळणाचा स्वयंपाक) होतो; म्हणजेच घरात पक्वान्न् तयार करण्याची सुरूवात या सणापासून होते. गाई राखणारे गायकी, बैल राखणारे बैलकी, म्हशी राखणारे भसकी आणि गुरे राखणारे ढोरकी यांच्या दृष्टीने हा सण फार महत्त्वाचा असतो. या दिवशी ते आपल्या गुरांना चारा व सावली देणा-या मोह वृक्षाची पूजा करतात. या दिवसापासून मोहाच्या पानांनी तयार केलेल्या पात्रात जेवायला प्रारंभ होत असतो. या सणाला पाटावर पाच किंवा सात तांदळाचे छोटे ढीग टाकून गृहप्रमुख पूजा करीत असतो. अकाडीच्या दिवशी शेतात लावणीचे काम बंद असते. अकाडी, जिवती, नागपूजा, राखी, कानोबा हे सण साधारणपणे धानाच्या लावणीच्या काळात येतात. पण झाडीपट्टीत त्या सणांच्या निमित्ताने रोवणे बंद ठेवले जाते. त्या दिवशी माणसांना व बैलांनाही संपूर्ण सुटी असते. शेतात फेरफटका मारायची देखील परवानगी नसते. हा बंदी हुकुम मोडणा-या गावक-याला गावाच्या रोशास बळी पडावे लागते आणि गाव ठरवेल तो दंड त्याला द्यावा लागतो.

संदर्भ :

  • लांजे हिरामण,समग्र झाडीपट्टी, विवेक प्रकाशन, नागपूर, २००६.

प्रतिक्रिया व्यक्त करा