कार्तिक पौर्णिमेला झाडीबोलीत कारकत असे संबोधले जाते. अन्यत्र असलेल्या प्रथेप्रमाणे झाडीपट्टीतदेखील या दिवशी सायंकाळी तुळशीचे लग्न लावतात. ज्या उसाकरिता झाडीपट्टी प्रख्यात आहेत त्या ऊसाला या दिवशी फार महत्त्व असते. किंबहुना वाडीतील ऊस कापायला सुरुवात कारकतपासूनच होत असते. शेणाने सारवून आणि खडीने व गेरूने रंगवून तुळशीचे वृंदावन सुशोभित करण्यात येते. संध्याकाळी सारेच गोरज मुहुर्तावर या तुळशीभोवती जमतात. वाडीतून आणलेल्या पाच उसांचा मंडप तुळशीवर करतात. नवीन कापड घेऊन त्याला एक सुपारी व एक नाणे बांधतात आणि ते कापड तुळशीच्या बुंध्यास गुंडाळतात. तसेच सुताने तुळशीला सुतवतात. त्यानंतर सर्वाना अक्षता वाटल्या जातात. मध्ये दुपट्टा धरून मंगलाष्टके म्हटली जातात. विवाहाप्रमाणे प्रत्येक मंगलाष्टकानंतर अक्षता उधळल्या जातात. शेवटी तुळशीची आरती गायल्यानंतर कापूर घेतला जातो. नारळ फोडून खोबरे, गूळ व पोहे यांची सिरनी (प्रसाद) वाटतात. रात्रभर ऊसाचा मांडव तसाच ठेवतात आणि सकाळी तो काढून ऊसाचे तुकडे सर्वांना वाटतात. एकादशीपासून पौर्णिमेपर्यत पाच दिवसात झाडीपट्टीत आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी तुळशीचे लग्न लावतात. तुळशीचे लग्न लावल्यानंतर आपल्या मुलामुलींच्या विवाहाचा विचार वरवधुपिता करतो.
संदर्भ :
- लांजे, हिरामण, समग्र झाडीपट्टी, विवेक प्रकाशन, नागपूर, २००६.