दीपपूजेच्या दिवशी साजरा होणारा जिवती हा झाडीपट्टीतील सण वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिवतीचा दिवस हा श्रावण महिना सुरू व्हायच्या पुर्वीचा दिवस होय. हा दिवस आपल्या आईवडिलांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाची आठवण म्हणून झाडीपट्टीत साजरा करतात. स्वयंपाकघरातील देव्हा-याजवळची भिंत गाईच्या शेणाने छान सारवून तिच्यावर गृहिणी वैशिष्ट्यपूर्ण जिवती चितारतात. ओल्या पिठात सूत व कापसाचा बोळा बुडवून त्याच्या सहाय्याने त्या खांद्यावरील कावडीत आपले आईबाप घेतलेल्या श्रावण बाळाचे चित्र त्या भिंतीवर रेखाटतात. सोबत तुळस, चंद्र, सूर्य, मोर, झाडे इत्यादी काढतात. तसेच शेते, नांगर, वखर, कामगार आणि पाच नाग चितारतात. भिंतीवरील ही सुषोभित जिवती म्हणजे झाडीपट्टीतील गृहिणीच्या कलात्मकतेचा व कल्पना रम्यतेचा अप्रतिम नमुनाच असतो. जिवतीच्या दिवशी गावचा वाडई म्हणजे सुतार पुढल्या दारावर खिळा ठोकून जातो आणि सोनार जिलॅटीन कागदाच्या जिवत्या देऊन जातो. त्याबद्दल त्या दोघांना तांदूळ, डाळ, तिखट, मीठ यांचा सिदा गृहिणीकडून प्राप्त होतो. संध्याकाळी जिवतीची पूजा करून भिंतीच्या वरच्या भागास सोनाराने पाठविलेल्या जिवत्या लावतात. तसेच दारावर, आलमारीवर, पेटीवर या जिवत्या डिकवतात. मुले आपल्या वहयापुस्तंना मोठया आवडीने या जिवत्या डिकवतात. आपल्या मुलाची जीवनज्योत दीर्घकाळ तेवत राहावी यासाठी आईचा आशीर्वाद या दिवशी लाभत असतो. म्हणूनच जिवती हा शब्द ज्योतीपासून व्युत्पादिता येतो. जिवती पासून पोळयापर्यंत श्रावण महिना असल्यामुळे या काळात मांसाहार वर्ज्य असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा