कदंब हा रुबिएसी कुलातील एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव निओलॅमार्किया कदंब असून अनेक ठिकाणी याची लागवड मुद्दाम करतात. नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार व भारत या देशांत हा आढळतो. भारतात कोकण, कर्नाटक, आसाम आणि हिमालयाच्या पायथ्याशी हे वृक्ष मोठ्या संख्येने आढळून येतात.
कदंबाचे खोड सरळ व १२-२१ मी. उंच असते. घेर १.८-४.५ मी. असतो. फांद्या लांब व जमिनीला समांतर पसरलेल्या असतात, हे या झाडाचे वैशिष्टय आहे. कोवळे भाग लवदार; पाने साधी, समोरासमोर, मोठी, ३० सेंमी. लांब आणि १५ सेंमी. रुंद, दीर्घवृत्ताकृती किंवा अंडाकृती, वरून चकचकीत तर खालून लवदार असतात. फुलोरे गोल, एकेकटे व अग्रस्थ असतात. फुले नारिंगी, लहान व सुवासिक असतात. पिकलेले फळ पिवळे व लहान संत्र्याएवढे असते. नारिंगी व मांसल पुष्पासनावर बोंडे गर्दीने रचलेली आणि अल्पबीजी असतात. बिया लहान व खरबरीत असतात.
कदंबाची फळे खाण्याजोगी असली, तरी चवदार नसतात. त्याचे लाकूड मजबूत व नरम असून कापण्यास, रंधण्यास सोपे जाते. मात्र लाकूड फारसे टिकाऊ नसते. होड्या, खोकी, तक्ते, फळ्या, आगपेट्या व काड्या, कागद, सजावटी सामान, चहाच्या पेट्या, कातीव व कोरीव काम इत्यादींसाठी या लाकडाचा वापर करतात.
या वृक्षाची साल, पाने व फुले यांचे विविध औषधी उपयोग आहेत. याची साल चवीला कडू, तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक असते. पित्त, दाह, ताप व खोकला झाल्यास सालीचा वापर करतात. व्रण (अल्सर), जखमा झाल्यास पानांमधील अर्क काढून वापरतात. अपचन आणि ज्वर झाल्यास फळे उपयोगी पडतात. या वनस्पतीत सिंकोटॅनिक आम्ल असते.
Thanks & Regards