भारतीय ग्रामदेवता.‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी,देवी यांसारख्या रोगांची साथ.या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणारी एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली जाते. मरीआईचेच ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’, ‘मरीभवानी’ अशी नामांतरे प्रदेशपरत्वे आढळतात. जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते.कोठे तिच्यावर केवळ आच्छादन असते, तर कोठे नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते. तिच्या उत्पत्तीबाबत विविधकथा रुढ आहेत. मरीआई ही मूळची आंध्र प्रदेशातील देवता असावी, असे प्र. कृ. प्रभुदेसाई यांचे मत आहे. तिचा पुजारी प्राय: पोतुराजा वा पोतराज असतो. तो मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरत असतो. आंध्र प्रदेशात अनेक गावी तिची पूजा होते. कर्नाटकात कारवार जिल्ह्यातही शिर्सी येथे मरीचे एक मंदिर असून दरवर्षी तेथे तिची यात्रा भरते.
दक्षिण भारतातील पोलेरम्मा नावाची ग्रामदेवताही मरीआईचेच रूप असून तिच्याबाबत रेड्याशी तिची झुंज झाल्याची कथा रूढ आहे. रोगराईपासून ती गावाचे संरक्षण करते, अशी समजूत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मरीलाच मरीआई, विदर्भात मरीमाय व उत्तर भारतात मरीमाई, मरी वा मरीभवानी म्हणतात. उत्तर भारतातही ती पटकीसारख्या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणाऱ्री देवता मानली जाते.
महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतातील मरीआईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व आहे. पोतराज हा मरीआईचा उपासक वा भगत असून त्याच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते, अशी सर्वत्र समजूत आहे. गावात आलेल्या साथीच्या शमनार्थ मरीआईचा गाडा गावसीमेपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो. मंगळवारी वा शुक्रवारी हा गाडा गावसीमेपर्यंत नेण्याचा विधी असायचा.त्यामुळे गावातून साथ सीमेपार जाते अशी लोकश्रद्धा होती. हा गाडा सीमेपार नेण्याच्या कार्यक्रमाला वा विधीला ‘जरी-मरीची जत्रा’ म्हणतात. भाविक लोक तिला विविध नवस करतात व ते मोठ्या श्रद्धेने फेडतात. बगाड घेणे, विस्तवावरून अनवाणी चालणे, शरीरातून दाभण वा सुया टोचून घेणे इ. प्रकारे शरीरक्लेश करून घेण्याचे प्रकार ह्या नवसात विशेष आढळतात. पोतराजालाच काही ठिकाणी जरीमरी वा कडकलक्ष्मी म्हणतात.
पहा : ग्रामदैवते, पोतराज.
संदर्भ :
- Dubois, Abbe, J. A. Beauchamp. H. K. Hindu Manners, Customs and Ceremonies, Oxford, 1959.
- जोशी, महादेवशास्त्री, गाजती दैवते, पुणे, १९५९.३. प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरुप अर्थात देवीकोश, खंड ३ रा, पुणे, १९६८.