झोप ही शरीराची एक पुनरावर्ती अवस्था आहे. जागेपणी शरीराच्या ज्या क्रिया-प्रतिक्रिया घडून येतात त्या झोपेमध्ये कमी होतात. तसेच चेतांकडून आलेल्या संवेदनांना प्रतिसाद मिळत नाही. झोपलेल्या व्यक्तीस आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जाणीव नसते. मात्र मोठ्याने ओरडल्यास, नावाने हाक मारल्यास किंवा दिवा लावल्यास ती व्यक्ती जागी होऊ शकते. मनुष्य आणि इतर अनेक प्राण्यांना दिवसाकाठी ठराविक काळ झोपेची गरज असते. झोपल्यानंतर डोळे झाकले जातात, स्नायू शिथिल होतात, हृदयाचे ठोके सावकाश पडतात आणि श्वसन क्रियेचा वेग मंदावतो. झोपलेली व्यक्ती अधूनमधून कूस बदलते. बहुतेक व्यक्ती रात्री झोपतात. मात्र, रात्री काम करणाऱ्या व्यक्ती दिवसा झोपतात. काही देशांमध्ये (उदा., स्पेन) आणि दक्षिण अमेरिकेतील व्यक्ती दिवसा वामकुक्षी आणि रात्री असे दोन वेळा झोपतात. परंतु, त्यांच्या झोपेचा एकूण कालावधी अन्य देशांतील व्यक्तींएवढाच असतो.
नुकतीच जन्मलेली बालके दिवसरात्र झोपून राहतात. २-३ महिन्यांनंतर ती रात्री पूर्ण वेळ आणि दिवसा दुपारी झोपतात. सहा महिन्यांनंतर त्यांच्या झोपेचा काळ कमी होतो. वयाच्या चार वर्षांनंतर बालके सरासरी १०-१२ तास झोपतात तर ९-१२ वर्षे वयाची मुले सरासरी ९-१२ तास झोपतात. प्रौढ व्यक्तीला सरासरी आठ तास झोप लागते. तसेच वृद्ध व्यक्तीलाही सरासरी आठ तास झोपेची गरज असते; मात्र, वृद्धावस्थेत झोपेच्या तक्रारींमुळे हा अवधी कमी होतो. झोपेसंबंधी झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, प्रौढ व्यक्तीचा रोजच्या झोपेचा कालावधी जैविकदृष्ट्या निश्चित असतो. त्यात सहसा बदल होत नाही. मेंदूद्वारे मेलॅटोनिन, सिरोटोनिन, डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन संप्रेरके स्रवली जातात. ही संप्रेरके झोपेचे नियंत्रण करतात.
झोपेचे चार टप्पे असतात. या टप्प्यांना टप्पा १,२,३ आणि ४ अशी नावे आहेत. यातील पहिल्या तीन टप्प्यांना नॉनरेम (नॉन रॅपिड आय मूव्हमेंट) असे नाव तर चौथ्या टप्प्याचे नाव रेम (रॅपिड आय मूव्हमेंट) आहे. झोपेच्या पहिल्या टप्प्यामध्ये (नॉनरेम-१) व्यक्ती पेंगुळलेली असते, डोळे जड झालेले असतात आणि स्नायू शिथिल असतात. झोपेच्या पहिल्या टप्प्यातून जागे झालेल्या व्यक्तींना झोपेपूर्वीचे काही प्रसंग विसकळीत आठवतात. पहिल्या टप्प्यामधून व्यक्ती झोपेच्या नॉनरेम-२ या दुसऱ्या टप्प्यामध्ये गेल्यानंतर डोळ्यांची हालचाल कमी होते. सहसा या टप्प्यामधून व्यक्ती जागी होत नाही. झोपेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आजूबाजूच्या घटनांची जाणीव होत नाही. लहान मुलांमध्ये अंथरूण ओले करणे, झोपेमध्ये चालणे व घाबरून उठणे असे प्रकार या टप्प्यामध्ये घडतात. वृद्धिसंप्रेरके झोपेच्या याच अवस्थेत स्रवतात. झोप लागल्यानंतर ९०-१२० मिनिटांनीr झोपेचा चौथा टप्पा (रेम टप्पा) चालू होतो. या टप्प्यातील झोपेमध्ये श्वास जलद, अनियमित आणि अपूर्ण असतो, डोळ्यांची हालचाल वेगाने होते, स्नायू शिथिल झालेले असतात आणि हृदयाची गती व रक्तदाब वाढलेला असतो. या टप्प्यातून जागे केले असता बऱ्याच व्यक्ती असंबद्ध बोलतात. या टप्प्यात भावनिक स्वप्ने पडतात. झोपेचे चारही टप्पे सरासरी ९०-१२० मिनिटांमध्ये पूर्ण होतात. आठ तासांच्या एकूण झोपेमध्ये तीन ते चार वेळा झोपेच्या चक्राची पुनरावृत्ती होते. यातील चार टप्प्यांचा एकूण कालावधी आणि प्रत्येक टप्प्याचा कालावधी कमी-अधिक असतो. पूर्ण जागे होण्यापूर्वी व्यक्ती रेम टप्प्यापासून परत नॉनरेम टप्प्यामध्ये येते.
निरोगी आयुष्यासाठी झोप आवश्यक असते. झोपेमध्ये हृदयाला विश्रांती मिळते आणि झिजलेल्या ऊतींची भरपाई होते. अतिश्रमानंतर झोपेतून जागे झाल्यानंतर उत्साह वाटतो आणि शरीरावरील ताणही कमी होतो. म्हणून शस्त्रक्रियेनंतर किंवा अपघातातून बचावल्यानंतर डॉक्टर विश्रांतीचा सल्ला देतात. मात्र, पुरेशी झोप न मिळाल्यास गोंधळून जाणे, जांभया येणे, कार्यक्षमता कमी होणे, हृदयाची गती अनियमित होणे, हातापायांना कंप सुटणे, वाढ खुंटणे इत्यादी परिणाम जाणवतात. वाहनचालकांना पुरेशी झोप न मिळाल्यास अपघाताचे प्रमाण वाढते. झोप न येण्याच्या आजारास निद्रानाश म्हणतात. निद्रानाशाची अनेक कारणे आहेत. झोपणे आणि जागे होणे या दोन्ही क्रिया चेतापारेषित रसायनामुळे घडत असल्याने आहार व औषधे यांमुळे झोपेवर परिणाम होतो. नाक मोकळे ठेवण्यासाठी नाकात घालण्याची औषधे व कॉफी घेतल्यामुळे झोप लागत नाही. ताण कमी करणाऱ्या औषधांमुळे रेम झोपेवर परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये झोप अत्यंत कमी असते. त्यांच्या रेम झोपेची वेळ कमी असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची तीन ते चार तासांनी झोपमोड होते. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये झोप पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील असते. त्यांच्याही रेम झोपेचा कालावधी कमी होतो. त्यांना झोपेमधून सहज जागे करता येते.
झोपेमध्ये सामान्यपणे शरीराची तापमान नियमन यंत्रणा मंद होते. थंडीपासून बचाव न करता कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या व्यक्ती मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अत्यंत थंड किंवा उष्ण तापमानाला झोप विसकळीत होते. भूल दिलेल्या व्यक्ती आपल्याला झोप लागली होती, असे सांगतात; परंतु त्या अवस्थेत त्यांना जागे करता येत नाही.
झोपेचे आणि जागे राहण्याचे चक्र जैविक लयबद्धतेशी निगडित असते. सर्व पृष्ठवंशी प्राणी कमी-अधिक काळ झोपतात. सरडा, साप, पक्षी आणि सस्तन प्राणी तुलनेने अधिक काळ झोपतात. कुत्रा, लांडगा, सिंह व वाघ असे शिकारी प्राणी अधिक वेळ, तर हरणे व ससे यांसारखे प्राणी कमी वेळ झोपतात. घोडा उभ्याने अधूनमधून थोडा वेळ झोपतो. मासे एका वेळी फक्त १०-१५ सेकंद झोपतात. साप आणि मासे यांच्या डोळ्यांवर पापण्या नसतात. ते डोळे उघडे ठेवून झोपतात. निशाचर प्राणी दिवसा तर दिनचर प्राणी रात्री झोपतात.