घोड्याच्या कानाच्या आकारासारखा पानांचा आकार असलेल्या या पानझडी वृक्षाचे कुल क्राँब्रेटेसी आहे. टर्मिनॅलिया पॅनिक्युलॅटा असे शास्त्रीय नाव असलेला हा वृक्ष हिरडा, अर्जुन आणि ऐन यांच्या प्रजातीतील आहे. संस्कृतमध्ये याला अश्वकर्णी म्हणतात. तो भारतात मिश्र वनांत हमखास सापडतो. महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक या राज्यांत, खास करून समुद्रकिनारी तसेच पश्चिम घाटात विपुल प्रमाणावर आहे. सागरासारख्या उंच वाढणार्या या वृक्षाच्या खोडाचा रंग गर्द तपकिरी असून त्याची साल खडबडीत असते. अधूनमधून त्यावर भेगा असतात. पाने लांब असतात. फांद्यांवरील खालच्या आणि वरच्या पानांची मांडणी वेगळी असते. वरची पाने एकाआड एक तर खालची पाने थोडीशी समोरासमोर असतात. पानांचा आकार देठाच्या बाजूला चौकोनी-गोल, तर पुढे टोकदार असतो. फुले तांबूस व लहान असून कणिशावर झुपक्याने असतात. फुले जुलै ते सप्टेंबर यांदरम्यान आणि फळे डिसेंबर ते मे या महिन्यांत येतात. फळे तांबूस रंगाची व आठळीयुक्त असतात. फळांवर लव असते. बिया पंखधारी असतात. पंख तीन व असमान असतात. या वृक्षाचे लाकूड सागाऐवजी वापरले जाते. नौका व जहाजांसाठी ते वापरतात. सालीतून काढलेले टॅनीन कातडी कमावण्यासाठी वापरतात. साल मूत्रल व हृदयासाठी शक्तिवर्धक समजली जाते.
- Post published:14/10/2019
- Post author:किशोर कुलकर्णी
- Post category:जीवसृष्टी आणि पर्यावरण / वनस्पती