कार्यवादातील उणीवा दूर करून त्यास नवे रूप देण्याच्या, त्याची पुनर्बांधणी करण्याच्या प्रयत्नांतून अमेरिकेत उदयास आलेली एक नवीन विचारसरणी. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सर्वप्रथम उदयास आलेली पुनर्रचनावाद ही संकल्पना शिक्षणाकडे, नवसमाजनिर्मितीकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन आहे. पुनर्रचनावादास कार्यवादाची सुधारित आवृत्ती किंवा कार्यवादाचा वारसदार असे म्हटले जाते.

अमेरिकन समाजावर कार्यवादी तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युई (John Dewey) यांच्या विचारसरणीचा प्रभाव होता. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अमेरिकेत मंदीची लाट आली. या परिस्थितीत प्रयोगशील व सापेक्षतावादी असलेल्या कार्यवादाच्या प्रभावामुळे अमेरिकी समाज अस्थिर, अनिश्चित व दुर्बल झाला; परंतु महायुद्धानंतर परिस्थितीत बदल होऊन कार्यवादी तत्त्वज्ञानाचे तसेच प्रचलित शिक्षणपद्धतीचे मूल्यांकन सुरू झाले. या मूल्यांकनातून अमेरिकन शिक्षणपद्धतीचा दर्जा व त्यातील उणीवा त्यांच्या लक्षात आल्या. कार्यवादाला ध्येयवाद, संस्कृती, परंपरा, मूल्ये इत्यादींबद्दल आस्था नव्हती. कार्यवादाने कोणतीही निश्चित ध्येये व मूल्ये समाजापुढे ठेवली नाहीत. कार्यवाद हा प्रगतीशील असला, तरी त्याची गती संथ होती. कार्यवादाची ही गती समाजाला, राष्ट्राला परवडण्यासारखी नव्हती. देशाला तारून नेण्यासाठी कार्यवाद असमर्थ होता. अशा वेळी समाज, राष्ट्र एकसंध व सामर्थ्यसंपन्न करणे ही काळाची गरज माणून तत्तज्ञानांनी, विचारवंतांनी व शिक्षणशास्त्रज्ञांनी पुनर्रचनेच्या विचारसरणीचा आग्रही पुरस्कार केला. त्यातच रशियाने वैज्ञानिक प्रगती करत अंतराळात पहिला उपग्रह सोडण्यात जे यश मिळविले ते पाहून अमेरिकी शिक्षणशास्त्रज्ञांचे डोळे उघडले. कार्यवादाने तत्त्वचिंतनाची केलेली उपेक्षा, ज्ञान व बुद्धी यांचे केलेले अवमूल्यन, कृतिशील व प्रायोगिक पद्धतींवरील अतिरिक्त भर या उणीवांमुळे शिक्षणाला अवकळा आली, असे आरोप होऊ लागले. त्यामुळे शिक्षणपद्धतीमध्ये पुनर्रचना करण्यात आली आणि कार्यवादाची प्रतिक्रिया म्हणून पुनर्रचनावादाचा उगम झाला.

अमेरिकेमध्ये सुमारे १९३० मध्ये ‘फ्रंटिअर थिंकर्स’ या नावाचा काही विचारवंतांचा एक गट संघटित झाला. त्यांनी नवीन समाजरचनेची व तीला आवश्यक अशा नव्या शिक्षणपद्धतीसंबंधी विचार करण्यास तसेच लेखनास सुरुवात केली. त्या गटातील शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक पुनर्रचनावादाचे संस्थापक थीओडोर ब्रामेल्ड यांनी १९५० मध्ये पटर्न्स ऑफ एज्युकेशन फिलॉसॉफी, १९५५ मध्ये फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन इन कल्चरल पर्स्पेक्टीव्ह्ज आणि १९५७ मध्ये कल्चरल फौऊंडेशन्स ऑफ एज्युकेशन हे तीन ग्रंथ प्रसिद्ध केले. त्यांतून त्यांनी पुनर्रचनावादाची तात्त्विक बाजू मांडून तिच्या आधारे शिक्षणाचे स्वरूपही स्पष्ट केले. तसेच आयझॅक बी. बर्कसन यांनी १९४० मध्ये प्रिफेस टु एज्युकेशनल फिलॉसफी व १९६८ मध्ये इथिक्स, पॉलिटिक्स ॲण्ड एज्युकेशन या पुस्तकांतून पुनर्रचनावादाचा दृष्टिकोन मांडला.

पुनर्रचनावादानुसार शिक्षणाचे स्वरूप हे सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीच्या सिद्धांतानुसार समाजपरिवर्तनाचे, नवसमाजनिर्मितीचे असावे यास प्राधान्य देते. ज्यामुळे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्येमुळे उद्भवणाऱ्या सांस्कृतिक संकटावर मात करता येईल. शिक्षकांनी आपल्या अध्ययनातून विद्यार्थ्यांपुढे नवसमाजनिर्मितीची दिशा स्पष्ट मांडावी आणि तिची आधारभूत मूल्ये त्यांच्यावर ठसवावीत, हेही पुनर्रचनावादाच्या स्वरूपाचा एक भाग होता.

शिक्षणाची ध्येये : पुनर्रचनावादाच्या शिक्षणाचे ध्येय पुढीलप्रमाणे :

  • मानवजातीपुढील प्रचंड अडचणी दूर करण्यास मदत करणे.
  • मानवजातीच्या जीवनाचा स्तर उंचावण्यास मदत करणे.
  • नवीन समाजरचना निर्माण करण्यास मदत करणे.
  • संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांचे समाधान करणे.
  • सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये आणि नवीन आर्थिक व वैज्ञानिक मूल्ये यांचा समन्वय कसा साधावा, यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
  • विद्यार्थ्यांना सौंदर्यात्मक बाबींचे उद्बोधन करणे.
  • विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ज्ञानात्मक व भावनात्मक अंगांचा विकास करणे.
  • विद्यार्थ्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय घटनांमध्ये सातत्याने भाग घेण्याची सवय लावणे.

मूल्य मीमांसा : शिक्षण ही संस्कृतीकरणाची प्रथा आहे. संस्कृतीकरणाची प्रक्रिया म्हणजे विविध मूल्यांचे उद्बोधन होऊन त्यानुसार वर्तन करणे होय. पुनर्रचनावादानुसार मूल्य उद्बोधनाचे चार प्रकार पडतात. (१) पुनःस्थापनात्मक मूल्यांचे उद्बोधन : सत्य, शिव, सुंदर अपरिवर्तनीय व कालातीत मूल्यांची जनमानसात पुनर्स्थापना करणे. (२) प्रेषणात्मक मूल्यांचे उद्बोधन : नवीन सांस्कृतिक परिस्थितीमुळे प्राप्त कौशल्ये, सवयी, अभिवृत्ती, चालीरिती यांचे ग्रहण करणे. (३) समायोजनात्मक मूल्यांचे उद्बोधन : नवीन काळाशी समायोजन करणे. (४) संक्रमणात्मक मूल्यांचे उद्बोधन : संस्कृतीची पुनर्रचना करण्यावर विश्वास व श्रद्धा ठेवणे.

मूल्य उद्बोधनाचे मार्ग : लोकांच्या मूल्य उद्बोधनासाठी पुनर्रचनावाद्यांनी खालील मार्गांचा अवलंब करण्यास सांगितले आहे.

  • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याची सवय लावावी.
  • राज्यशास्त्र व विविध कला, विविध तत्त्वज्ञानाच्या शाखा, वर्तनवादी शास्त्रे यांच्या मदतीने संस्कृती व त्या माध्यमाने संस्कृतीची पुनर्रचना करावी.
  • पुनर्रचनेच्याबाबतीत सर्वांमध्ये एकवाक्यता निर्माण करावी.
  • समाजातील जास्तीत जास्त सामाजिक व वैयक्तिक आत्माविष्कारांची संधी द्यावी.
  • लोकशाहीचा पुरस्कार करावा.

मूल्यांच्या अधिष्ठानाशिवाय समाजात स्थैर्य निर्माण होणार नाही. शिवाय समाज संघटित व सामर्थ्य संपन्न होणार नाही, अशी पुनर्रचनावादी विचारवंताची धारणा होती. याउलट काल्पनिक आदर्श, सत्य मूल्ये यांकडे दुर्लक्ष करून केवळ वर्तमानातील समस्या सोडविण्यावर कार्यवादाने भर दिला. त्यामुळे कार्यवादी विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या अमेरिकन शिक्षण व शिक्षणप्रणालीला मुक्त करून शिक्षणाची पुनर्रचना केल्याशिवाय सामाजिक विकास व सामुदायिक कल्याणकारी राज्य निर्माण होणार नाही, या विचारांतून अमेरिकेमध्ये पुनर्रचनावादाचा उदय झाला. अमेरिकेच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक विकासात पुनर्रचनावादी विचारांचे फार मोठे योगदान आहे.

संदर्भ :

  • अकोलकर, ग. वि., शिक्षणाची आधुनिक तत्त्वज्ञाने, पुणे, १९७१.
  • दुनाखे, अ., प्रगत शैक्षणिक तत्त्वज्ञान, पुणे, १९९८.
  • पारसनीस, न. रा., शिक्षणाची तात्त्विक व समाजशास्त्रीय भूमिका, पुणे, १९८७.

          समीक्षक – बाबानंदन पवार

This Post Has 13 Comments

  1. Khushi

    उत्तम..!! nice information..!!

  2. Rutuja Bhansali

    Very good and informative content ????

  3. हेमलता

    मार्गदर्शक असा आहे । अध्यापन करताना खूप महत्वाची भूमिका विचाराची असते ।त्या विचारला दिशा दाखवते।

  4. Vinita Milind Patil

    शिक्षण पूनर्रचना संकल्पना खूप कार्यकारी आहे. देशाचा विकासाचा पाया मजबूत होईल याने. खूप ठळक बाबी नमूद करण्यातआलेआहे. It will very helpful for our Bright future… Very nice thought….

  5. Shailaja Dongar Bhangale

    अचुक व नेमके

  6. Nilesh Shaligram Patil

    Nice information about “dnyanrachanavad”. Thanks mam

  7. SAGAR DILIP PATIL

    आपला लेख शिक्षणव्यवस्थेतील अमूलाग्र बदलाची गरज व महत्त्व स्पष्ट करतो.केवळ ज्ञान असून उपयोग नाही तर त्यास मूल्यांची जोड आवश्यक आहे.शिक्षणव्यवस्थेचे वास्तवस्वरूप व आदर्शस्वरूप यातील अंतर दर्शविणारा हा मार्मिक लेख आहे.

  8. Dr Priya Narendra Kurkure

    Very good,useful and essential information about Reconstructionism. Thanks Respected ma’am for sharing this information.

प्रतिक्रिया व्यक्त करा