श्लेष्मल कवके हा सूक्ष्मजीवांचा एक वैशिष्ट्यपूर्ण गट आहे. त्यांच्या जीवनचक्रातील काही अवस्था कवकांशी, तर काही आदिजीवांशी साधर्म्य दाखवितात. त्यामुळेच त्यांची गणना कधी आदिजीव गटात, तर कधी कवकांमध्ये केली गेली आहे. आधुनिक वर्गीकरण पद्धतीनुसार मात्र त्यांच्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले आहे. हे बहुपेशीय सजीव आहेत, परंतु बहुपेशीय प्राण्यांप्रमाणे या गटात चेतासंस्था, पचनसंस्था अशा संस्था विकसित झालेल्या नसतात. थोडक्यात हे सजीव बहुपेशीय प्राण्यांचे आद्यरूप दर्शवितात. वातावरणातील बदलांप्रमाणे त्यांचे अवस्थांतर होत असते. मुख्य म्हणजे पेशीविभाजनाची एकच अवस्था एका वेळी सर्व पेशीत (Synchronous) असते. उत्क्रांत प्राण्यांमध्ये मेंदू इतर अवयवांना आदेश देतो व त्याप्रमाणे ते अवयव कृती करतात. चेतासंस्था नसताना बाह्य वातावरणाला दिलेला प्रतिसाद व एकाच अवस्थेतील सर्व पेशींचे विभाजन या दोन वैशिष्ट्यांमुळे सर्व आनुवंशशास्त्रज्ञ, रेणवीय जीवशास्त्रज्ञ व वर्तणूकशास्त्रज्ञ यांच्या दृष्टीने हे सूक्ष्मजीव आदर्श ठरतात.
आनुवंशशास्त्रासाठी आदर्श नमुना : श्लेष्मल कवकांच्या फायसॅरम (Physarum), ट्रायकिया (Trichia), हेमिट्रायकिया (Hemitrichia), अर्सिरिया (Arcyria) इत्यादी प्रजाती प्रामुख्याने आढळतात. त्यांपैकी फायसॅरम पॉलिसेफॅलम (Physarum polycephalum) या जातीचा रेणवीय जीवविज्ञान व आनुवंशशास्त्रात प्रामुख्याने अभ्यास होतो. त्याच्या जनुकावलीची (Genome) एकूण लांबी तीन कोटी नत्रबेस आहे. या जनुकावलीत सुमारे ४०% भाग पुनरावर्ती असून त्यात शंभर कुटुंबातील सुमारे दोन हजार जागा बदलणारी जनुके (transposons) आहेत. इतर बहुपेशीय सजीवांप्रमाणे या गटातील जनुकेही बाह्यजनुके (exons) व अंतर्जनुके (introns) यामध्ये विभाजित असतात. एका संपूर्ण जनुकात सुमारे १३८ नत्रबेस लांबीचे तीन ते चार अंतर्जनुके असतात. ही अंतर्जनुके ॲडेनीन व थायमीनने समृद्ध असतात. इतर सजीवांच्या तीन टोकाकडे एकवटलेले थायमीन व सायटोसीन या गटात संपूर्ण अंतर्जनुकात पसरलेले असतात. एकूण जनुकांची संख्या सुमारे ३१ हजार असून बाह्य व अंतर्जनुकांच्या संयोगस्थानी ग्वानीन – थायमीन / ॲडेनीन – थायमीन / अडेनीन – ग्वानीन अशा जोड्या असतात. जीवनचक्रातील वेगवेगळ्या अवस्थांनुसार पेशीविभाजनाच्या पद्धतीत फरक पडतो. तसेच कार्यशील जनुकेही बदलतात. बहुतांश जनुके अमीबा, डिक्टीओस्टेलियम, प्लास्मोडियम, काही प्रकारचे यीस्ट यांच्याशी काही प्रमाणात साधर्म्य दर्शवितात. पेशीतील काही प्रथिने व रंगद्रव्ये अमीबा तसेच वनस्पती पेशीतील प्रथिने व रंगद्रव्यांशी साधर्म्य दाखवितात.
औषधी रसायनांचा नवा स्रोत : श्लेष्मल कवके सूक्ष्म व विघटनशील पदार्थांवर आढळतात. घनरूप, द्रवरूप किंवा अर्धप्रवाही माध्यमांमध्ये ही कवके वाढविता येतात. या कवकांची माध्यमांवर वाढ करणे कौशल्याचे काम असते. प्रयोगशाळेत त्यांची वाढ करताना योग्य तापमान व सु. ९० – ९५ % आर्द्रता राखावी लागते. जेव्हा या कवकांचे बीजाणू रुजतात तेव्हा ते प्लास्मोडियमच्या (कोणताही आकार नसलेल्या) स्वरूपात पसरत जातात. वाढीस अनुकूल परिस्थितीत ते माध्यमाचा संपूर्ण पृष्ठभाग व्यापतात. त्यानंतर जर आर्द्रता कमी केली, तर ते अमीबासारख्या दोन पेशीयुग्मकांना जन्म देतात किंवा कधीकधी कशाभिका (flagella) असलेल्या ठरावीक आकाराच्या पेशीना (swarm cells) जन्म देतात. अशा पेशी कशाभिकाच्या (चाबकाच्या) मदतीने हालचाल करतात, तर अमीबा पेशी छ्द्मपादाच्या साहाय्याने हालचाल करतात. अशा दोन पेशी एकत्र येऊन युग्मनज (zygote) तयार होतो. त्यापासूनच पुढे बीजाणुधानी (sporangium) तयार होते.
या सर्व अवस्थांमध्ये ही कवके माध्यमांमध्ये वेगवेगळे रासायनिक पदार्थ सोडतात. त्यात विकरे, प्रतिजैविके, रंगद्रव्ये आदींचा समावेश होतो. फायसॅरम नुडम व फायसॅरम पॉलिसेफॅलम ही श्लेष्मल कवके कृत्रिम माध्यमात अंधारात वाढविली असता काही रंगद्रव्ये सोडतात. थिन लेयर क्रोमॅटोग्राफी (TLC) या तंत्राने वेगळी केली असता ती प्रामुख्याने केराटीन या प्रकारची असल्याचे आढळले. फायसॅरम पॉलिसेफॅलम थोडा वेळ पांढऱ्या प्रकाशात वाढविले तर त्याचे विरंजन होते. पण तेच जर सतत काही दिवस पांढऱ्या प्रकाशात वाढविले तर त्याचे प्लास्मोडियम पिवळ्याऐवजी केशरी रंगाचे होते. विरंजन झालेले प्लास्मोडियम पुन्हा अंधारात ठेवले तर ते पुंन्हा पिवळ्या रंगाचे होते.
माकाबागो आणि सहकार्यांनी सन २०१४ मध्ये श्लेष्मल कवकांच्या १८ जाती अशा प्रकारे माध्यमांवर वाढविल्या. त्यापैकी १० जातीमध्ये अमीबोफ्लॅजेलेटस व ७ जातीमध्ये प्लास्मोडिया तयार झाले. या प्लास्मोडियांनी माध्यमात पेशीबाह्य पचन करणारे अमायलेज, प्रोटीएज असे विकर सोडले. यावरून या कवकांमध्ये भक्ष्य गिळंकृत करण्याच्या (phagotrophic) पद्धतीशिवाय मृतोपजीवी पद्धतीनेसुद्धा (saprophytic) पोषणद्रव्ये मिळविता येतात हे सिद्ध झाले.
मोरीता आणि निशी या शास्त्रज्ञांनी सन १९९३ मध्ये बीटा ग्लुकोसिडेज या विकराच्या क्रियाशीलतेचा अभ्यास केला. हे विकर काही ठरावीक कार्बोहायड्रेटवर अभिक्रिया करून त्यांचे साध्या व पेशीद्रव्यात विरघळणाऱ्या स्वरूपातील शर्करांमध्ये रूपांतरण करतात. या शास्त्रज्ञांनी फायसॅरम पॉलिसेफॅलम या श्लेष्मल कवकाच्या पेशी आवरणापासून (Plasma membrane) तसेच पेशीबाह्य माध्यमांतून ही विकरे वेगळी केली. ही विकरे लॅमिनॅरीन आणि लायकेनीनवर प्रामुख्याने अभिक्रिया करतात. ही क्रियाशीलता ग्लुकोज नसलेल्या माध्यमात जास्त असून ४.५ सामू असताना ती ठळकपणे जाणवते.
अनेक नैसर्गिक रासायनिक द्रव्यांमध्ये टेट्रामिक आम्ल हा मुख्य घटक असतो. हा घटक असलेले फ्युलिगोरुबीन नावाचे द्रव्य मोहलीद व त्यांचे सहकारी यांनी सन २०१५ मध्ये फ्युलिगो सेप्टिका व लिओकार्पस फ्रॅजिलीस या श्लेष्मल कवकांपासून वेगळे केले.
फायसॅरम गायरोसम या श्लेष्मल कवकाचे प्लास्मोडियम व इ. कोलाय बॅक्टिरिया ६.५ सामू असलेले फॉस्फेट बफर, यीस्ट व ०.२ % ग्लुकोज अशा माध्यमांवर एकत्र वाढविले असता हे कवक माध्यमात बॅक्टिरिया विरोधात प्रतिजैविके सोडते. या प्रतिजैविकांचा उपयोग वेगवेगळ्या रोगांवर इलाज म्हणून करता येऊ शकतो.
संदर्भ :
- Collins, ON. R.; Therrien, C. D.and D. A. Batterley. (1970). Genetic and Cytological Evidence for Chromosomal Elimination in a True Slime Mold, Didymium iridis. American Journal of Botany. 65(6): 660-670.
- Kawana, S.; Takano, H.; Imai, J. Morri, K. and T. Kuroiwa. (1993). A Genetic System Controlling Mitochondrial Fusion in the Slime Mold, Physarumpolycephalum. Genetics.133: 213-224.
- Macabago, S.A. B.; Thomas and E. E. dela Cruz. (2014). Preservation and Extracellular Enzyme Production of Myxomycete from Lubang Island, Occidental Mindoro, Philippines. Philippine Science Letters.7(2): 331-336.
- Mohalid, N.; Hamzah, A. S. and Z. Shaameri. (2015). Chemical Exploration of 4-Hydroxybenzylated 3- Substituted Tetramic Acid. Malaysian Journal of Analytical Sciences.19(2): 359-368.
- Morita, M. and A. Nishi. (1993). Purification and Partial Characterization of β-glucosidase from Plasmodial Membrane and Culture Medium of Physarumpolycephalum. Journal of General Microbiology.139: 1685-1641.
- Schrӧder, H. R. and M. F. Mallette. (1973). Isolation and Purification of Antibiotic Material from Physarumgyrosum. American Society of Microbiology. 160-166.
- Stephenson, S. L. and H. Stempen. (2000). Myxomycetes: A handbook of Slime Molds. Timber Press.
समीक्षक – बाळ फोंडके