लकुलीश : (इ.स.सु. २००). शिवाच्या अठरा अवतारांपैकी लकुलीश हा पहिला अवतार मानला जातो. त्याला ‘नकुलीश’ असेही म्हणतात. गुजरातमधील ‘कायारोहण’ (सध्याचे कारवान) क्षेत्रात हा अवतार होऊन गेला. स्मशानातील मृत शरीरात भगवान शिवाने प्रवेश केला व मृतदेह सजीव झाला. त्याने हातात दंड/काठी/लाकूड(लकुल) धारण केले म्हणून तो लकुलीश या नावाने प्रसिद्ध झाला.
भारतातील पाशुपत पंथाचा लकुलीश अध्वर्यू असून त्याने या पंथाचे तत्त्वज्ञान सुसूत्रपणे मांडले व त्याला दार्शनिक रूप दिले. कलियुगात त्याने शैव मताचा जोरदार प्रचार केला. त्याने सांगितलेल्या या दर्शनाला लकुलीशदर्शन/पाशुपतदर्शन किंवा लकुलीशागम/लकुलागम अशी संज्ञा मिळाली.
लकुलीशाचे कुशिक, गर्ग, मित्र, कौरुष्य हे चार शिष्य होते. सुरुवातीला या पंथाचा प्रसार गुजरात व राजस्थान राज्यांमध्ये झाला. लकुलीशरचित पाशुपतसूत्र हा पाशुपत पंथाचा मूळ ग्रंथ असून त्यावरील पंचार्थीभाष्य हे कौंडिण्य याने रचले आहे (इ.स. चौथे ते सहावे शतक). पंचार्थीभाष्य हे राशीकरभाष्य वा कौण्डिन्यभाष्य म्हणूनही ओळखले जाते. भारतातील अठ्ठावीस प्रसिद्ध योगाचार्यांपैकी लकुलीश हा शेवटचा आचार्य होय.
मूर्ती : लकुलीशाच्या मूर्ती भारतभर, विशेषत: कुमाऊँ प्रदेशात आढळतात. नग्न व ऊर्ध्वमेढ्र (उत्थितलिंग) अशा स्वरूपात त्या आढळतात. मूर्ती तयार करण्यासाठी खालील सूत्र दिले आहे :
न(ल)कुलीशं ऊर्ध्वमेढ्रं पद्मासनमुपस्थितम्|
दक्षिणे मातुलिङ्ग च वामे दण्ड: प्रकीर्तित:|| (विश्वकर्मावतार वास्तुशास्त्र)
अर्थ : लकुलीश पद्मासनात बसलेला व जननेंद्रिय उत्थित असा करावा. उजव्या हातात महाळुंग व डाव्या हातात दंड असावा.
हातातील सोटा हे लकुलीशाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मूर्ती नग्न असल्यामुळे ऊर्ध्वमेढ्र ठळकपणे दिसून येते. गुडघ्याभोवती पट्टबंध असेल, तर ती ध्यानस्थ लकुलीशाची मूर्ती समजावी. ब्रह्मांडपुराणात ऊर्ध्वमेढ्र दाखविण्यामागील एक कथा आढळून येते, ती अशी : ब्रह्मदेवाने रुद्राला प्रजोत्पादनाची आज्ञा दिली. तेव्हा तो ऊर्ध्वलिंगी झाला, पण ब्रह्मदेवाला मरणधर्मी प्रजा हवी होती. ती उत्पन्न करण्यास रुद्राने नकार दिला व तेव्हापासून तो ऊर्ध्वलिंगीच राहिला.
मूर्तीची वैशिष्ट्ये : सोबतच्या छायाचित्रातील मूर्तीतील लकुलीशाचे केस कुरळे, कानाच्या पाळ्या लांब व त्यात रुद्राक्ष धारण केलेले दिसतात. डोळे काचेसारखे असून डाव्या खांद्यावरून उजव्या नितंबापर्यंत वस्त्राची किनार (यज्ञोपवीत) दिसून येते. कर्नाटक येथील संगमेश्वर मंदिर हे इ.स. सातव्या शतकातील चालुक्य राजवटीतील असून तेथील लकुलीशाची मूर्ती सॅण्डस्टोन प्रकारच्या दगडातील आहे.
लकुलीशाच्या प्राचीन मूर्तींपैकी एक इ.स. चौथ्या शतकातील गुप्तकालीन शिलालेखाच्या वर चौरसात कोरलेली आहे. मथुरा येथील पुराणवस्तुसंग्रहालयात एक मूर्ती ठेवलेली आहे. आणखी एक मूर्ती प्रभासपट्टण येथील सिद्धनाथ मंदिराच्या आवारात आढळते. द्वितीय चंद्रगुप्ताने उभारलेल्या स्तंभलेखात ‘गुरुवायतन’चा उल्लेख आढळतो. या गुरुवायतनाची स्थापना उदिताचार्याने केली, असाही उल्लेख त्यात आहे. हा उदिताचार्य कौशिकापासूनचा दहावा शिष्य आहे, असा उल्लेख लिंगपुराणात सापडतो.
इसवी सन अकराव्या शतकाच्या सुमारास लकुलीश पंथाचा प्रसार दक्षिणेकडे झाला. एलिफंटा गुहांमध्ये सुद्धा लकुलीशाची मूर्ती आढळते. भुवनेश्वर येथील लक्ष्मणेश्वर मंदिरसमूहामध्ये सुद्धा ‘शत्रुघ्नेश्वर’ या नावाने लकुलीशमूर्ती आढळते.
लकुलीशाचे पाशुपतसूत्र भेदाभेद-तत्त्व मानते. पशु म्हणजे सजीव आणि पती म्हणजे महेश्वर किंवा शिव. या पंथात शिव ही सर्वोच्च शक्ती मानली आहे. कुठल्याही साधनाशिवाय त्याने विश्वनिर्मिती केली म्हणून तो स्वतंत्र कर्ता आहे. तोच सर्व कार्यांचे कारण आहे. मात्र काही विद्वानांच्या मते लकुलीश पंथ पूर्वीपासूनच प्रसिद्ध होता. लकुलीश या पंथाचा पहिला गुरू होता. डॉ. भांडारकर यांनी लकुलीश पंथाचे पाशुपत पंथाशी साधर्म्य दाखविले आहे.
प्रसार : लकुलीशाच्या चार शिष्यांनी भारतभर हिंडून लकुलीश पंथाचा प्रसार केला. कुशिकाने उत्तर दिशेला प्रसार केला. त्याचा दहावा शिष्य उदिताचार्य याने उपमितेश्वर व कपिलेश्वर या दोन शिवलिंगांची स्थापना केली. गर्ग या शिष्याने गुजरातमध्ये या पंथाचा प्रसार केला. अनहिलपट्टण येथे सोळंकी राजवटीत जे मठ आणि देवळे निर्माण झाली त्यांचे निर्माते गर्गशाखेचेच होते.
लकुलीशाच्या जन्मानंतरचा जवळपास नऊ शतकांचा इतिहास स्पष्टपणे उपलब्ध नाही. इ.स. अकराव्या शतकातील सोळंकी राजवटीपासून या पंथाचा उल्लेख किंवा इतिहास पुन्हा उपलब्ध होतो. या पंथाला दिलेली चालुक्य राजांची दानपत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. सौराष्ट्रामधील लकुलीश पंथाच्या अस्तित्वाचा पुरावा कुमारपालाच्या राजवटीतील एका शिलालेखात सापडतो (इ.स. १३०३).
म्हैसूर राज्यातील बेलगामी येथे लकुलीश पंथाचे महत्त्वाचे केंद्र होते. संगमेश्वर येथील शिलालेखात (इ.स. ११४७) विजापूर येथील काश्मीरमुनीच्या वंशावळीतील शेवटचा लकुलीश हा शिवतत्त्वज्ञ झाला, असा उल्लेख सापडतो. लकुलीशाला भक्तांमध्ये ‘शिरोरत्न’ व लकुलागम या अमृतसागरातील चंद्र असे म्हटले आहे. दक्षिण भारतात या पंथाच्या जुनी व नवी अशा दोन शाखा होत्या, असे म्हैसूर राज्यातील गोळकेरी येथील शिलालेखावरून दिसते.
संदर्भ :
- ‘श्रीमाधवाचार्य’ कंगले, र. पं. सर्वदर्शनसंग्रह, मुंबई, १९८५.
- https://www.wisdomlib.org/hinduism/book/a-history-of-indian-philosophy-vol5/d/doc210070.html
समीक्षक : प्राची मोघे