महाराष्ट्रातील पाशुपत शैवमताचा एक प्राचीन मठ. मुंबई उपनगरातील मुळच्या मजासगावाच्या पश्चिमेस आणि आंबोली गावाच्या पूर्वेस एका टेकाडामध्ये हे लेणे खोदले गेले. येथे भव्य असे एक मुख्य लेणे असून, जवळच इतर लहान लेणीही खोदण्यात आली आहेत. लेण्यात स्थित ‘जोगेश्वरी’ देवीमुळे हे लेणे ‘जोगेश्वरी गुंफा’ म्हणून प्रसिद्ध झाले व या संपूर्ण क्षेत्राला ‘जोगेश्वरी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. हे लेणे आंबोली गावाच्या हद्दीत स्थित असल्याकारणाने जे. एम. कॅम्पबेल व जेम्स बर्जेस या विद्वानांनी या लेण्याला ‘आंबोली लेणे’ म्हणूनही संबोधले आहे. सध्या या परिसराला ‘प्रताप नगर’ असे नाव आहे. येथील फारसा चांगला नसलेला दगड, वर्षानुवर्षे दुर्लक्ष व मानवी वस्तीचे अतिक्रमण यांमुळे या लेण्याची बरीच पडझड झालेली दिसते.

या लेण्यांचा काळ अनेक विद्वानांनी इ. स. सहाव्या शतकाचा पूर्वार्ध मानला आहे. आतापर्यंत या लेण्याविषयी आपले विचार मांडणाऱ्यांमध्ये हेक्टर मॅक्नील, विल्यम हंटर, जॉर्ज वलेन्शिया, हेन्री सॉल्ट, जे. एम. कॅम्पबेल, भगवानलाल इंद्रजी, जेम्स बर्जेस, वॉल्टर स्पिंक, अरविंद जामखेडकर, सौंदरा राजन, बी.एन. चौधरी, दुलारी कुरेशी इ. विद्वानांची नावे घेतली जातात.
हेक्टर मॅक्नील व विल्यम हंटर यांनी अनुक्रमे १७८३ व १७८४ साली या स्थळाला भेटी दिल्या होत्या. यानंतर १८०२ साली जॉर्ज वलेन्शिया यांनी हेन्री सॉल्टसह येथे भेट दिली. या लेण्याचा उल्लेख जे. एम. कॅम्पबेल यांनी संकलित केलेल्या बॉम्बे गॅझेटियरमध्ये आढळून येतो. वॉल्टर स्पिंक यांनी १९६० साली येथे भेट दिली. त्यांच्या मतानुसार हे लेणे म्हणजे अजिंठा येथील बौद्ध लेणी व घारापुरीची हिंदू लेणी यांच्या लयन स्थापत्य संक्रमण अवस्थेतील मधला दुवा आहे. बी. एन. चौधरी यांनी बौद्ध स्थळांच्या यादीत या लेण्याचा उल्लेख केला आहे (१९८२). त्यांच्या मते, ही लेणे मूळतः बौद्ध असून नंतर शैवांच्या ताब्यात आले असावे. कुरेशी यांच्या मते, महिष्मतीचे कलचुरी हे पाशुपत संप्रदायाचे अनुयायी असल्याने, त्यांनी ही लेणे खोदले असावे.
जोगेश्वरीची लयन स्थापत्यरचना फारच वैशिष्ट्यपूर्ण असून, मुळातच तंत्रज्ञानदृष्ट्या ‘लेणे’ असलेले हे ‘मंदिर’ म्हणजे स्थपतींनी घडवलेला चमत्कारच होय. एका टेकडीचा मधला भाग कोरून मंडपाची रचना केली गेली आहे. ही लेणे भारतातील सर्वांत मोठ्या हिंदू लेण्यांपैकी एक असून घारापुरीची मुख्य लेणे व वेरूळ येथील ‘धुमार’ लेण्यांशी बरोबरी साधते. सध्या या लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिम दिशेला आहे. परंतु मूळ प्रवेश हा पूर्वेकडून होत असावा, असे दिसते. पूर्वेकडील प्रवेशद्वाराने सर्वप्रथम अग्रमंडपात प्रवेश करता येऊ शकतो. याच्या दर्शनी भागावर ‘रावणानुग्रह मूर्ती’ आहे. अग्रमंडप ११ x १३.७ मी. असून, दोन्ही बाजूंना चार स्तंभ व दोन अर्धस्तंभावर आधारित खोल्या आहेत. यांच्या मागील भिंतींवर भव्य कोरीव काम केल्याचे निदर्शनास येते. येथे एक गणेश प्रतिमाही आहे. याच्या विरुद्ध बाजूस सप्तमातृकांच्या प्रतिमांचे अवशेष पाहायला मिळतात.

अग्रमंडपातून सु. १२.८ x २०.१ मी. अशा मोकळ्या प्रांगणात येता येते. हे प्रांगण पश्चिम बाजूस असलेल्या खोल्यांच्या तुलनेत मोठे आहे. मोकळ्या प्रांगणातून मुखमंडपात प्रवेश केल्यावर मंडपाच्या द्वारावर दर्शनी भागात नटराजाची प्रतिमा असून नेहमीच्या ठिकाणी दोन्ही बाजूंना प्रतीहार (द्वारपाल) कोरण्यात आले आहेत. याच्या पार्श्व भागावर अतिशय सुंदर कोरीव काम केलेले दिसते. मध्यभागी लकुलीश त्याच्या कुशिका, गर्ग, मित्र आणि कौरुष्य या चार शिष्यांसह दर्शविले आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला ‘कल्याणसुंदर मूर्ती’, तर उजवीकडे शिवपार्वती ‘सारीपाट’ खेळताना दर्शविलेले आहेत. मुखमंडपातील द्वाराच्या दोन्ही बाजूला दोन प्रतीहार असून त्यांच्या सोबत त्यांचे सेवक कोरण्यात आले आहेत. मुखमंडपात दोन्ही बाजूंना चार स्तंभ व दोन अर्धस्तंभयुक्त खोल्या आहेत.
मुखमंडपातून २० स्तंभांवर आधारित विशाल सभामंडपात प्रवेश करता येतो. या मंडपाचे मोजमाप कुरेशी यांनी २९.५ x २८.५ मी., जे. एम. कॅम्पबेल यांनी २८.०४ चौ. मी. व ३.०४ चौ. मी. उंच, तर बर्जेस यांनी २८.०४ चौ. मी. सांगितले आहे. या मंडपाच्या मध्यभागी ‘सर्वतोभद्र’ गर्भगृह (१९ चौ. मी.) असून, एका उंच पीठावर (जगती) मधोमध शिवलिंग असावे. सध्या मध्यवर्ती गाभारा जोगेश्वरी देवीला समर्पित आहे.
पश्चिमेकडील प्रवेशद्वार खोदण्यासाठी एका विशाल कातळाला (खडकाला) कापून त्यातून लांब मार्गिका तयार केली आहे. जे. एम. कॅम्पबेलने या मार्गिकेचे मोजमाप २.४ मी. रुंद व १५.२ मी. लांबीचे सांगितले आहे. उताराच्या शेवटी, सहा पायऱ्या एका छोट्या खोलीत येऊन संपतात, ज्याचे मोजमाप ६ x ५.४ x ६ मी. आहे. येथूनही पुढे मुख्य लेण्यात प्रवेश करण्यास्तव एक द्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना दोन प्रतीहार कोरलेले आहेत. येथे आवाराच्या दोन्ही बाजूंना दोन स्तंभ व अर्धस्तंभयुक्त खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये नटेश व लकुलिशाच्या भग्न मूर्तींचे अवशेष आहेत.

मुख्य सभामंडपाच्या दक्षिणेकडील बाजूला तीन दरवाजे व दोन खिडक्या आहेत. त्यांची दारे मोठ्या आवारात व व्हरांड्यात उघडतात. आवार ३६.५ मी. लांबीचे असून दहा स्तंभ व दोन अर्धस्तंभावर आधारले आहे. त्यांच्याभोवती आणखी काही खोदकामही करण्यात आलेले दिसते.
कातळात खोदलेल्या मार्गिका वगळता या संपूर्ण लेण्याची लांबी पूर्व-पश्चिम सु. ७६ मी. तर पश्चिम-दक्षिण सु. ६१ मी. आहे. लेण्यात सहाव्या शतकातील संस्कृत भाषेतील एक भग्न शिलालेख आहे. याशिवाय येथे मुख्य लेण्याबरोबरच इतर लहान लेणीही खोदलेली आहेत. खडकांची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांची अवस्था खराब झालेली आहे. त्यांतील एका लेण्यात शिवलिंग आहे.
शब्द संकेत : जोगेश्वरी गुंफा, पाशुपत, लकुलीश.
संदर्भ :
- Campbell, J. M., Gazetteer of the Bombay Presidency, Vol. XIV., Bombay, 1882.
- Chaudhary, B. N., Buddhist Centers in Ancient India, Calcutta, 1982.
- Fergusson, James & Burgess, James, The Cave Temples of India, New Delhi. 1880.
- Qureshi, Dulari, Rock-Cut Temples of Western India, Delhi, 2010.
- Saundara Rajan, K. V., Cave Temples of the Deccan, New Delhi. 1981.
समीक्षक : सुरज पंडित; मंजिरी भालेराव
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.