पांगुळबैल : शिकविलेल्या बैलाच्या सहाय्याने खेळ करणे म्हणजेच नंदीबैल किंवा पांगूळबैल होय. नंदीबैलाच्या खेळाला कोकणात पांगुळबैल म्हणून ओळखले जाते. पिंगुळीच्या पांगुळ घराण्याने नंदीबैलाचे खेळ करणाऱ्या तिरमल घराण्यातील कानडेंकडून नंदीबैलाची कला शिकून घेतली आणि स्वत: नंदीबैलाचे खेळ पिंगुळी परिसरात ते करू लागले, तेव्हापासून या खेळाला पांगुळबैल असे नाव पडले. पांगुळ बैल म्हणजेच शिकविलेला बैल. त्याला खेळवून पांगुळवाला (नंदीवाले) खेळ सादर करतो. पण हा पांगुळ म्हणजे सामान्य बैल नव्हे. साक्षात महादेवाचा नंदी अशी त्याच्याकडे पाहणाऱ्याची भावना असते.

पांगुळबैल हा एक नाट्यकलावंतच असतो. तो पशू असला तरी अभिनय शिक्षण घेण्याची त्याची क्षमता विलक्षण असते. त्याला खेळविणारा पांगुळवाला जे बोलतो ते सगळं हा बैल आत्मसात करतो. त्यामुळे बोलून त्याला त्याच्या सूचना दिल्या जातात त्या सगळ्यावर हुकूम म्हणून हा बैल अभिनय करतो . होकारार्थी / नकारार्थी मान हलविणे, उजवा पाय उचलणे, डावा पाया वर करून धरणे, तुळशीला फेऱ्या मारणे, रुसून जाणे, झोपून देणे, हट्ट करणे, स्वत:चं वजन कमी करत पांगुळवाल्याच्या मांडीवर, खांद्यावर पाय अलगद ठेवणे असे प्रकार पांगुळबैल पांगुळवाल्याच्या सूचनेनुसार करत असतो. या सगळ्या क्रिया तो फक्कडपणे वठवितो. पांगुळबैल खेळ करत भाविकांच्या दारात उभं राहिल्यानंतर घरची स्त्री त्याचे पाय धुते, पूजा करते आणि मग बैलाला भोजन देते. बैलाच्या या नाट्याभिनयाचा लोकांवर फारच परिणाम होतो. अनेक महिन्यांच्या परिश्रमपूर्वक नाट्य शिक्षणाने तरबेज अभिनयपटू झालेला हा बैल वर्षातून आठ महिने सोंग वठविण्याचे काम करतो. हा महादेवाचा नंदी आपल्या दारी यावा, त्याने आशीर्वाद द्यावेत म्हणजे आपल्यावरील किरीवारी ( संकटे ) दूर होतील अशी दक्षिण कोकण, गोवा कारवारकडच्या लोकांची भावना आहे. पांगुळ खेळवणारा नायक, या खेळाला संगीत देणारा ढोलकीवाला आणि प्रत्यक्ष खेळ करणारा खेळगडी सोंगाड्या बैल ही तीन पात्रे पांगुळ नाट्यप्रकारात असतात. दक्षिण कोकण, गोवा राज्य आणि कारवार प्रांतात पांगुळबैलाचे खेळ होतात. पिंगुळीचे ठाकर आदिवासी पांगुळबैलाचे खेळ करतात.

संदर्भ : https://www.thinkmaharashtra.com/node/2028