दर्शनाचा उगम दु:खाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी या हेतूने झाला आहे. ज्याप्रमाणे चिकित्साशास्त्रात रोग, रोगाचे कारण, रोगाचा नाश आणि रोग नष्ट करण्याचा उपाय या चतुर्विध आयामांचा रोगमुक्तीसाठी सांगोपांग विचार केला जातो, त्याप्रमाणे योगशास्त्रातही दु:ख, दु:खाचे कारण, दु:खाचा कायम स्वरूपी नाश अर्थात मोक्ष किंवा कैवल्य आणि मोक्षप्राप्तीचा उपाय या चार आयामांचा विचार केला जातो. व्यासभाष्यात असे म्हटले आहे की, संसार हा दु:खप्रचुर आहे. प्रकृती आणि पुरुषाचा संयोग त्या दु:खाचे कारण होय. या संयोगातून पुरुषाची निवृत्ती हा दु:खनाश आहे आणि दु:खाचा नाश करण्यासाठी अविद्येचा नाश अर्थात ज्ञानाची प्राप्ती हा उपाय आहे. अविद्येचा नाश झाल्यावर पुरुषाला कैवल्याची प्राप्ती होते. (पातञ्जल योगसूत्र  २.१५ वरील व्यासभाष्य ).

पतंजलींनी कैवल्याची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. “सत्त्वादि गुणांना पुरुषाचे काही प्रयोजन न उरल्यामुळे त्यांचा जो आपापल्या कारणात लय होणे अथवा पुरुषाचे केवळ आपल्या स्वरूपाने राहणे याला कैवल्य (मोक्ष) म्हणतात” (पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति। योगसूत्र  ४.३४)

महर्षि पतंजलींनी या सूत्रात दोन प्रकारे कैवल्याचे प्रतिपादन केले आहे. (१) गुणांचा अर्थात प्रकृतीचे महत्, अहंकार, बुद्धी इत्यादी जे त्रिगुणात्मक विकार आहेत त्यांचा आपल्या उपादान कारणात क्रमाने लय होत होत शेवटी मूल प्रकृतीत (प्रधानात) लय (प्रतिप्रसव) होणे आणि (२) पुरुषाचे स्वरूपात अवस्थित होणे.

यातील पहिला मोक्ष प्रकृतीचा आहे कारण त्रिगुणात्मिका प्रकृती पुरुषार्थापासून म्हणजे पुरुषाला भोग व अपवर्ग प्राप्त करून देण्यापासून तो कार्यभाग साधल्यामुळे निवृत्त होते. प्रकृतीचे कैवल्य म्हणजे मूल प्रकृतीपासून (प्रधानापासून) निर्माण झालेल्या त्रिगुणात्मक सृष्टीचा क्रमाने मूळ कारणात लय होणे. प्रकृती म्हणजे त्रिगुणांची साम्यावस्था होय. त्या त्रिगुणांमध्ये विषमता उत्पन्न झाल्यावर सृष्टी उत्पन्न होते.

पुरुषाला भोग आणि अपवर्ग प्रदान केल्यामुळे ज्यांचे कार्य संपले आहे व म्हणून जे  ‘पुरुषार्थशून्य’ आहेत अशा बुद्धी, अहंकार, मन इत्यादी रूपांनी परिणत गुणांचा म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचा आपल्या कारणात अर्थात प्रधानात लय याला प्रतिप्रसव, प्रतिसर्ग किंवा प्रकृतीचे कैवल्य म्हणतात. यामध्ये २३ तत्त्वे आपापल्या कारणांमध्ये लय होऊन शेवटी प्रधानात लय पावतात. ही प्रक्रिया सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्रमाच्या विरुद्ध (प्रतिलोम) असते. यात महाभूते तन्मात्रात, तन्मात्र, इंद्रिये व मन अहंकारात, अहंकार बुद्धीत (महत्तत्त्व) लय पावतो व बुद्धी प्रकृतीत लय पावते. हा प्रकृतीचा मोक्ष आहे.

दुसरा मोक्ष पुरुषाचा आहे, कारण दृश्याशी संयोग पावलेल्या पुरुषाला प्रकृतीच्या सृष्टिपासून किंवा बुद्धीपासून आपण पृथक् आहोत असे ज्ञान झाल्यावर त्याचा दृश्यापासून वियोग होऊन त्याला कैवल्य प्राप्त होते. ‘दृश्य’ म्हणजे ‘पाहिले अथवा जाणले जाणारे’. मूल प्रकृतीपासून उत्पन्न झालेली बुद्धी, अहंकार, मन, ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ तन्मात्र, ५ महाभूते या २३ तत्त्वांचा अंतर्भाव ‘दृश्या’त होतो. ‘द्रष्टा’ म्हणजे या २३ तत्त्वांना ‘पाहणारा’ किंवा ‘जाणणारा’  पुरुष. द्रष्टा पुरुष आणि दृश्यरूप २३ तत्त्वे यांचा संयोग दु:खाला कारणीभूत आहे. सुख, दु:ख आणि मोह हे क्रमश: सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचे स्वभावधर्म आहेत. पुरुष हा त्रिगुणातीत असल्याने त्याचा सुख-दु:खाशी वस्तुत: संबंध नाही. परंतु, अविद्येमुळे चैतन्यस्वरूप पुरुषाला शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी या अचेतन दृश्य पदार्थांशी तादात्म्य पावल्याचा व त्यातील गुणांमुळे उत्पन्न होणाऱ्या सुख-दु:खाचा अनुभव येतो. अशा प्रकारे दृश्याशी संयोग त्याच्या दु:खाचे  कारण  होतो. विवेकज्ञानाच्या उदयाने  ‘मी शरीर, इंद्रिये, अहंकार, चित्त, बुद्धी नसून त्यापेक्षा वेगळा चैतन्यस्वरूप पुरुष आहे. समस्त दृश्य जगत् भोग्य आहे; मी भोक्ता आहे, अविद्येने माझे द्रष्टा किंवा साक्षी हे स्वरूप झाकून टाकले होते आणि मी दृश्याशी जणू संयोग पावलो होतो.’ याप्रकारचे ज्ञान त्याला उत्पन्न होते. चैतन्यस्वरूप पुरुष आणि त्रिगुणात्मक २३ दृश्य पदार्थांना एक समजणे, हे अविद्येचे रूप आहे आणि ते पृथक् पृथक् आहेत असे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे विवेकज्ञान होय. विवेकख्यातीचे दृढ ज्ञान प्राप्त झाल्यावर योग्याला निश्चितपणे कैवल्य प्राप्त होते.

कैवल्य प्राप्तीचा मार्ग – योगाचा साधक यम-नियम इत्यादी योगांगांचे त्याचप्रमाणे तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधानाचे अनुष्ठान करतो. धारणा, ध्यान आणि समाधी याद्वारे चित्ताची एकाग्रता साधतो. योगसाधनेने वैराग्यभावना दृढ होते, चित्तातील अशुद्धीचा ऱ्हास होतो, चित्तातील सत्त्वगुणात प्रकर्षाने वृद्धी होते आणि योग्याची ज्ञानाकडे अधिकाधिक प्रवृत्ती होते. अंतिमत: त्याला विवेकज्ञान प्राप्त होते. हे विवेकज्ञान म्हणजे बुद्धिसत्त्व आणि पुरुष हे भिन्न आहेत असे विशेष ज्ञान होय. विशेष ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषाची ‘आत्मभावभावना’ नाहीशी होते. म्हणजे त्याचा ‘मी कर्ता, भोक्ता, ज्ञाता आहे’ असा अभिमान दूर होतो (योगसूत्र ४.२५). पुरुषाचा अविद्येशी वस्तुत: संबंध नसल्यामुळे स्वभावत: पुरुष शुद्ध असतो अर्थात् पुण्य किंवा पाप, सुख आणि दु:ख, जन्म आणि मरण हे धर्म त्याला बाधक नसतात. विवेकज्ञानामुळे जे चित्त पूर्वी बहिर्मुख होते, विषयाभिमुख होते, अज्ञानमार्गात संचार करणारे होते ते आता एकाग्र व  स्थिर होते आणि कैवल्याकडे प्रवाहित होते (योगसूत्र  ४.२६).

स्फटिकावर जास्वंदाचे फूल ठेवले असता त्या उपाधीमुळे स्फटिक लाल रंगाचा भासतो. ती उपाधी दूर झाल्यावर तो मूळ रूपात दिसतो. उपाधी दूर झाल्यामुळे त्याच्या मूळ रूपात कोणताही नवीन धर्म उत्पन्न होत नाही. पुरुषाचा प्रकृतीशी संयोग बुद्धीच्या माध्यमातून होत असतो. ज्यावेळी पुरुषाचा बुद्धीशी संबधाचा आत्यंतिक अभाव होतो; बुद्धीच्या उपाधीतून मुक्त झालेला पुरुष ज्यावेळी बुद्धिसत्त्वाशी संबंध न होण्यामुळे स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होतो तेव्हा त्याला ज्ञेय असे काहीही उरत नाही, यालाच कैवल्य असे म्हणतात (तदभावात् संयोगाभावो हानं तद् दृशे: कैवल्यम् | योगसूत्र  २.२५). थोडक्यात सांगावयाचे झाल्यास कैवल्य म्हणजे पुरुषाचे दुसऱ्या कोणत्याही तत्त्वाशी संयोगाशिवाय राहणे. चितिशक्तिरूप पुरुषाचे सर्वदा या अवस्थेत राहणे याला पुरुषाचे कैवल्य म्हणतात (व्यासभाष्य  ४.३४). पुरुषाच्या या स्थितीचा निर्देश तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थानम् । योगसूत्र  १.३ या सूत्रात आढळतो.

कैवल्य प्राप्त केलेल्य पुरुषाला ‘केवल’ अथवा ‘कुशल’ असे म्हटले आहे. कैवल्य शब्दाची व्युत्पत्ती ‘केवलीभाव: कैवल्यम् |’ ‘केवल’ ‘एकटा  राहणे’ अशी केली जाते. कारण २३ तत्त्वांशी त्याचा संयोग राहत नाही. हा पुरुष ‘स्वस्थ’ होय. स्वस्थ शब्दाचा अर्थ ‘स्वस्मिन् तिष्ठति इति स्वस्थ: |’ असा आहे. हा स्वस्थ पुरुष म्हणजेच कैवल्य प्राप्त केलेला जीवन्मुक्त होय.

कैवल्य हे प्रकृतीलाच प्राप्त होत असले तरीही तिच्याशी संबंधित पुरुषालाही ते प्राप्त होते असे मानले जाते. म्हणून सांख्यकारिकेत (६२) “पुरुषाला बंध नसतो, मोक्ष नसतो, संसार नसतो; तर बुद्धी इत्यादी नाना आश्रय असलेली प्रकृतीच संसार करते, बंधनात पडते आणि तिचा मोक्ष होतो.” असे म्हटले आहे. यामुळे उभयतांच्या कैवल्याची उपपत्ती लागते.

                                                                                                                                                                                           समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर