चंद्रनाथ मिश्रा अमर : (२ मार्च १९२५). भारतीय साहित्यातील सुप्रसिद्ध मैथिली साहित्यिक. कवी म्हणून त्यांची प्रमुख ओळख आहे. कादंबरी, एकांकिका, समीक्षा आणि वृत्तपत्रीय लेखन इत्यादी साहित्य प्रकारातही त्यांनी लेखन केले आहे. त्यांचा जन्म  बिहार राज्यातील खोजपूर जिल्ह्यातील मधुबानी या गावात झाला. चंद्रनाथ यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावामध्ये आणि नंतरचे दरबंगा येथे वडील पंडित मुक्तीनाथ मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. त्यांचे वडील संस्कृतचे विद्वान होते. चंद्रनाथ मिश्रा हे व्याकरणाचार्य आणि साहित्य शास्त्री या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाले होते. त्यांनी दरबंगा येथील राज शाळेत शिक्षकी पेशाला सुरुवात केली. महाराणी लक्ष्मीवती अकादमी, लहेरीसराई येथे संस्कृत आणि मैथिली या विषयाचे कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नोकरीस लागले आणि १९८३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. चंद्रनाथ मिश्रा यांचा विवाह श्रीमती हिरा देवी यांच्यासोबत झाला होता.चंद्रनाथ मिश्रा यांनी साहित्य अकादमीच्या मैथिली भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून कार्य केले आहे.

चंद्रनाथ यांनी सुरुवातीच्या काळीत वैदेही या मैथिली पाक्षिकाचे संपादन केले होते. नंतर या नियतकालिकाचे रुपांतर मासिकात झाले. त्याचे अनेक वर्ष त्यांनी संपादन केले. तसेच ते निर्माण  या हिंदी साप्ताहिकाचे संपादक होते. नंतरच्या काळात मैथिलीमधील पहिले दैनिक स्वदेशचे ते सहसंपादक होते. आयज्योत  या त्रैमासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर त्यांनी मैथिली पत्रकारितेचा इतिहास लिहिला. मैथिलीतील विविध नियतकालिकांतील ते एक प्रसिद्ध स्तंभलेखक होते. चंद्रनाथ मिश्रा यांनी वयाच्या २१ व्या वर्षी एक कवी म्हणून लेखनास सुरुवात केली. त्यांची प्रकाशित साहित्य संपदा : कवितासंग्रह  गुदगुदी (१९४६), युगचक्र (१९५२), ऋतुप्रिया (१९६३), अंतपल (१९७२), आशा-दिशा (१९७५); कादंबरी– वीर कन्या (१९५०), बिदागरी (१९६३); लघुकथा जलसमाधी (१९७२); समीक्षा एम. एम. मुरलीधर झा (१९८०), काशीकांत मिश्रा मधुप (१९९४); एकांकिकासमाधान; संकीर्ण त्रिफला (१९४८), मैथिली पत्रकारितेचा इतिहास (म.शी.) (१९८१), स्वतंत्र स्वर (१९९४), बेरयाल कथा (१९९५).

समकालीन इतर कवींमध्ये चंद्रनाथ यांच्या साहित्यकृतीमध्ये असलेले उपरोधीक व्यंगचित्र हे अत्यंत स्फोटक होते. अंतपल  या त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये परिपक्व व्यवहारज्ञान आणि उपहास पाहायला मिळतो. त्यांच्या संपूर्ण साहित्यिक रचनेत तीन प्रवाह दिसून येतात. त्यातील पहिला म्हणजे संस्कृत साहित्यातील शास्त्रीय आणि सांस्कृतिक वारसा त्यांनी आपल्या अनुभवविश्वात जतन करून ठेवला आहे. त्यांच्या साहित्यातील इतर दोन प्रवाहांपैकी एक सर्वाधिक आवडीची म्हणजे पत्रकारिता आणि दुसरे राजकीय समस्या. ऋतुप्रिया मध्ये ऋतूचक्रामधील बदलत्या निसर्गासंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या कवितांचा आशय हा संपूर्ण मानव जातीला तसेच नवीन पिढीला संदेश देणारा आहे. चंद्रनाथ मिश्रा अमर यांचे आधुनिक मैथिली काव्याच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांनी वाङ्मयातून शिक्षण दिल्यामुळे त्यांचे काव्य उदात्त आणि शुद्ध ठरते. आपल्या लिखाणात जिथे संधी मिळेल तिथे म्हणी आणि वाक्प्रचार यांचा वापर त्यांनी केला आहे. निबंध आणि अग्रलेखामुळे ते मैथिली आणि मीथिलाचे सेनानी ठरतात. चंद्रनाथ मिश्रा खेड्यात राहिल्यामुळे त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे जीवन जवळून पाहिले होते. ते वास्तववादी साहित्यिक असले तरी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होता. त्यांनी साहित्यातून कधीही अश्लील चित्रण केले नाही. त्यांच्या पात्रांची भाषा नेहमी शुद्ध आणि त्यांच्या विचारांना साजेशी अशी होती. संस्कृत ज्ञानाचा उपयोग त्यांनी अभिजात काव्य आणि शास्त्रोक्त तालबद्ध मुक्त काव्य रचताना केला. 

हरीनंदन सिंग पुरस्कार ,साहित्य अकादमी पुरस्कार (१९८३) इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. समाजातील तळागाळातील लोकांची उन्नती साहित्याद्वारे होऊ शकते यावर चंद्रनाथ मिश्रा यांचा पूर्ण विश्वास होता. ते एक जाण असलेले अलौकिक असे मैथिली, हिंदी, संस्कृतचे प्रसिद्ध शिक्षक म्हणून लक्षात राहतात. तसेच त्यांच्यामध्ये शिस्तप्रियता आणि वक्तशीरपणा देखील होता. ते एक उत्तम नट होते. त्यांनी मैथिली नाटकाच्या विकासात भरीव असे योगदान दिले. त्यांनी मैथिलीतील पहिला चित्रपट कन्यादानमध्ये अभिनय केला. चंद्रनाथ मिश्रा हे व्यासपीठावरून सादर होणाऱ्या त्यांच्या कवितांच्या उच्चारणांसाठी देशभरात विशेषत:  मैथिली भाषिकांमधे प्रसिद्ध आहेत.

संदर्भ :  http://sahitya-akademi.gov.in/library/meettheauthor/chandra_nath_mishra_amar.pdf