डॅनी कोहेन

कोहेन, डॅनी : (९ डिसेंबर १९३७ — १२ ऑगस्ट २०१९).

इझ्राएली अमेरिकन संगणक वैज्ञानिक. डॅनी कोहेन यांचा जन्म हैफा, पॅलेस्टाइन येथे झाला. टेक्निऑन — इझ्राएल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी येथून कोहेन यांनी गणित विषयामध्ये पदवी मिळवली (१९६३). त्यानंतर अमेरिकेतील मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी येथे त्यांनी गणित विभागात अध्ययन केले (१९६५-६७). कोहेन यांनी संगणकीय आरेखन (graphics) क्षेत्रात मूलभूत काम करून विमान चालवण्याच्या प्रक्रियेचे सदृशीकरण (flight simulation) केले (१९६७). प्रत्यक्षात विमान न उडवता ते चालवण्याचे प्रशिक्षण सदृशीकरणाच्या माध्यमातून देण्याची त्यांनी विकसित केलेली सुविधा आजही वैमानिक वापरतात.

संगणकीय आरेखन या विद्याशाखेचे जनक डॉ. इव्हान सुथरलँड (Dr. Ivan Sutherland) यांच्या मार्गदर्शनाखाली कोहेन यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली (१९६९). त्यांच्या विमानोड्डाण प्रक्रियेच्या सदृशकाच्या कामातूनच संगणकीय आरेखन क्षेत्रातील कोहेन- सुथरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदम्स या संकल्पनेचा आविष्कार झाला. त्यांनी काही काळ हार्व्हर्ड विद्यापीठ येथे आणि त्यांनतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे संगणकीय आरेखनाचे अध्यापन केले.

 

 

 

दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये काम करत असताना अमेरिकेच्या संरक्षण खात्याने अर्पानेट (ARPANet) या प्रकल्पांतर्गत कोहेन यांना महाजालक-दूरध्वनी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले होते (१९७०). त्यांनी महाजालकामार्फत दूरध्वनीचा वापर करण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर १९७८ मध्ये कोहेन यांच्या प्रयत्नातून पहिले सांघिक संभाषण (conference call) शक्य झाले,  ज्यामुळे अनेक व्यक्तींना एकाच वेळी उर्वरित सगळ्यांशी संभाषण करता येते. याच प्रयोगातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाला ‘व्हॉइसओव्हर आयपी तंत्रज्ञान’ असे म्हटले जाते. आजच्या काळात आपण कुठल्याही कार्यक्रमाचे संगणकाद्वारे चल प्रसारण (Live streaming) पाहू शकतो, त्याचा पाया कोहेन यांचे तंत्रज्ञान आहे.

कोहेन यांनी स्थानिक संगणक जोडणीसाठी ॲटॉमिक (ATOMIC) नावाने एक तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानाचा विकास करून त्यांनी नंतर मायरिनेट (Myrinet) हे संगणकीय जालकाचे तंत्रज्ञान तयार केले आणि त्याचे व्यावसायीकरण केले.

कोहेन यांनी संगणक क्षेत्रामधील महाजालकासंबंधित (internet) अनेक मूलभूत संकल्पना मांडल्या. संगणकीय बाइटच्या अनुक्रमावर आधारित असलेली एंडियननेस (Endianness) ही संकल्पना १९८० मध्ये प्रथमत: त्यांनी एका शोधनिबंधात मांडली.  संगणकात एखादी माहिती साठवण्यासाठी जर एकाहून अधिक बाइट लागत असतील तर ही संकल्पना वापरली जाते. माहितीच्या द्विमान (Binary) प्रतिनिधित्वाचा शेवटचा बाइट संगणकात प्रथम संग्रहित केला जात असेल तर अशा संगणकाला ‘स्मॉल एंडियन यंत्र’ असे संबोधतात आणि माहितीच्या द्विमान प्रतिनिधित्वाचा पहिला बाइट संगणकात प्रथम संग्रहित केला जात असेल तर अशा संगणकाला ‘बिग एंडियन यंत्र’ असे संबोधतात. अशा दोन्ही प्रकारची यंत्रे प्रचलित असल्याने एका यंत्रावरील माहिती दुसऱ्या यंत्रावर हस्तांतरित करताना त्याचे योग्य त्या एंडियननेसमध्ये रूपांतर करणे आवश्यक असते. अन्यथा त्या माहितीचा चुकीचा अर्थ लागू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.

अनेक संगणक एकमेकांना जोडून अधिक प्रमाणावर माहितीची साठवण, प्रक्रिया व व्यवस्थापन यासाठी आज सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या सांघिक संगणन (Cloud computing) या तंत्राची सुरुवात कोहेन यांनी केली. कोहेन यांनी त्यांच्या जलद विनिमय (fast exchange) या प्रकल्पाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक वाणिज्य व्यवस्थापनाची (E-commerce) सुरुवात केली. ही पद्धती आता सर्व व्यवसायांत खरेदी-विक्रीसाठी रूढ झाली आहे.

कोहेन हे २००१ पासून सन मायक्रोसिस्टिम्स या कंपनीत प्रमुख तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रकाशकिरण आणि विद्युत तरंगांच्या माध्यमातून कमी अंतरावरील संदेशवहन अधिक जलद होण्यासाठी ते संशोधन करीत होते. तसेच ते दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापनाचे कामही करीत होते.

अमेरिकन हवाई दलाकडून त्यांना मेरिटोरियस ‍सिव्हिलियन सर्व्हिस ॲवॉर्ड हे पारितोषिक देण्यात आले (१९९३). नॅशनल ॲकॅडमी ऑफ एंजिनिअरिंग (२००६) या संस्थेचे ते सदस्य होते. आयइइइ, IEEE (२०१०) या विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंत्यांच्या संस्थेचे कोहेन हे अधिछात्र होते.

कोहेन यांची काही प्रसिद्ध प्रकाशने पुढीलप्रमाणे : Satellite Communication of Real-Time Packet Video Images, Electric Commerce,  AI as the Ultimate Enhancer of Protocol Design आणि Technology and Values. त्यांनी अनेक शोधनिबंध देखील प्रसिद्ध केले आणि काही एकस्वेही  मिळवली.

कोहेन यांचा पालो ॲल्टो (कॅलिफोर्निया) येथे मृत्यू झाला.

संदर्भ : https://archive.computerhistory.org/resources/access/text/2019/08/102746173-05-01-acc.pdf

समीक्षक  :  विवेक पाटकर