जोशी, गजाननराव : (३० जानेवारी १९११ – २८ जून १९८७). प्रख्यात व्हायोलीनवादक व ग्वाल्हेर घराण्याचे नामवंत गायक. त्यांचा जन्म गिरगाव, मुंबई येथे झाला. त्यांच्या आई इंदिराबाईंचे गजाननराव लहान असतानाच निधन झाले. त्यांचे वडील पं. अनंत मनोहर जोशी (अन्तुबुवा) यांना गायनाकरिता औंध संस्थानची शिष्यवृत्ती मिळाली होती. ते औंध संस्थानचे राजगायकही होते. अन्तुबुवा हे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य होते. गजाननरावांचे आजोबा मनोहरबुवा हे देखील उत्तम गवई होते. अन्तुबुवांनी गिरगावला राहत्या घरी ‘श्रीगुरुसमर्थ गायनवादन विद्यालय’ सुरू केले होते. त्यामुळे लहानग्या गजाननरावांवर बालपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण झाले होते. पुढे गजाननरावांच्या वडिलांनी त्यांना घरीच गायनाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडून ते तबला शिकले. यथावकाश त्यांनी रामकृष्णबुवा वझे (ग्वाल्हेर घराणा) आणि प्रौढवयात उस्ताद भूर्जीखाँ (जयपूर घराणा), उस्ताद विलायत हुसेनखाँ (आग्रा घराणा) यांच्याकडेही गाण्याची तालीम घेतली.

गजाननरावांची लहानपणी वडिलांबरोबर धारवाड, बेळगाव, सांगली, औंध अशी अनेक ठिकाणी भ्रमंती झाली. औंधमध्ये त्यांच्या व्हायोलिनवादनास गती मिळाली. त्यानंतर ते घराबाहेर पडले व वयाच्या साधारण सोळाव्या वर्षापासून व्हायोलीनवादनाचे जाहीर कार्यक्रम करू लागले. त्यांना पुण्यामध्ये भारत गायन समाजात संगीतशिक्षकाची नोकरी मिळाली. १९२८ पासून त्यांनी मुंबई आकाशवाणीवर गायन व व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एच.एम.व्ही. कंपनीने त्यांच्या व्हायोलीनवादनाची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. ही खूप गाजली. १९३७ मध्ये त्यांनी उत्तर हिंदुस्थानचा पहिला दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम केले, यास श्रोत्यांचा खूप प्रतिसाद मिळाला. जयपूर घराण्याची गायकी शिकण्याच्या निमित्ताने कोल्हापूरातही काही वर्षे ते राहिले. पुढे दिल्ली आकाशवाणीवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले. या नोकरीमुळे त्यांची मुंबई, इंदूर, लखनऊ अशी अनेक ठिकाणी भ्रमंती झाली (१९५६–१९६८). गजाननबुवा मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातही प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक संगीतपरिषदांमधून भाग घेतला होता.

गजाननरावांना १९७२ मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, आयटीसी सन्मान (१९८२) व मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार (१९८५) लाभला.

गजाननरावांचा विवाह दुर्गाबाई यांच्याशी झाला (१९३३). त्यांना तीन मुले व तीन मुली. त्यांचे मनोहर, मधुकर हे पुत्र आणि कन्या सुचेता बिडकर (मालिनी जोशी) प्रसिद्ध गायक आहेत, ते व्हायोलीनवादनही करतात. धाकटे पुत्र नारायण तबला वाजवतात.

उत्तर हिंदुस्थानी संगीत व्हायोलीनवर भारदस्तपणे वाजवून या वाद्याचे स्वतंत्र कार्यक्रम करण्यात गजाननरावांना अग्रगण्य मानले गेले. केवळ एक असामान्य व्हायोलीनवादकच नव्हे तर ग्वाल्हेर घराण्याचा निष्ठावंत पाईक आणि विद्यादानाद्वारे संगीतकारांची मोठी नवीन पिढी तयार करणारे शिक्षक म्हणूनही त्यांची ख्याती होती. आवाजाची फारशी अनुकूलता नसतानादेखील लयकारी व रागदारीवर प्रभुत्व स्थापित करून अतिशय मेहनतीने त्यांनी आपले स्थान निर्माण केले. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा या तीन घराण्यांचा रंग असणारा भारदस्त गायक अशी त्यांची ओळख होती व या गुणग्राही कलाकाराबद्दल सर्वत्र आदर होता.

गजाननरावांनी उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर, जयश्री पाटणेकर, वीणा सहस्रबुद्धे यांना गायनाची तालीम दिली. तर श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीनवादक त्यांचे शिष्य. त्यांची शिष्यपरंपरा त्यांच्या मुलांसोबतच पुढील पिढीनेही वाढविली आहे.

गजाननरावांच्या अध्यक्षतेखाली औंधमध्ये ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली (४ जानेवारी १९८१). गेली अनेक वर्षे ही संस्था संगीत शिक्षण शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे, विविध कार्यशाळा घेऊन संगीताचा प्रचार व प्रसार करीत आहे. या संस्थेतर्फे दिवाळीच्या सुमारास होणारा औंध संगीत महोत्सव आपले वेगळे स्थान टिकवून आहे. महोत्सवामध्ये रियाझ या स्मरणिकेचे दरवर्षी प्रकाशन करण्यात येते. या संस्थेतर्फे अन्तुबुवा आणि गजाननराव यांच्या रचनांचे पुस्तक व ध्वनिमुद्रिका मालानिया गुंदे लावोरी  २००८ मध्ये प्रकाशित करण्यात आली.

गजाननरावांचे डोंबिवली येथे निधन झाले.

संदर्भ :

  • http://www.gajananbuwajoshi.com/

https://www.youtube.com/watch?v=1Lpk3XE4ADk