मॉरिस, डेस्मंड (जॉन)
(२४ जानेवारी १९२८ – )
डेस्मंड मॉरिस यांचा जन्म पुर्टॉन, विल्टशायर येथे डेस्मंड जॉन मॉरिस मार्जोरी आणि हॅरी मॉरिस यांच्या पोटी झाला. नंतर मॉरिस कुटुंब स्विन्डन येथे रहायला गेले. स्विन्डनमधील वास्तव्यात डेस्मंड यांना निसर्ग विज्ञान व लेखनामध्ये रस वाटायला लागला. पुढे बोर्डिंग स्कूलमध्ये त्यांना आधुनिक चित्रकलेमध्ये गोडी वाटायला लागली. पणजोबांच्या पुस्तक संग्रहातील व्होयाज ऑन बिगल हे चार्ल्स डार्विनचे पुस्तक त्यांनी शालेय वयातच वाचले. पुढे त्यांना घरातील माळ्यावरच्या खोलीत एक पितळी सूक्ष्मदर्शक सापडला, ज्याविषयी त्यांना कुतूहल निर्माण झाले. त्यांना प्राणीशास्त्राचा अभ्यास करण्यामागे या दोन्ही गोष्टी प्रेरणादायक ठरल्या.
दुसरे महायुद्ध सुरु झाल्यानंतर मॉरिस अतिवास्तववाद (सरिअॅलिझम) या कलाविष्काराकडे आकर्षित झाले. कलेच्याद्वारे कलाकाराच्या सुप्त मनाचा अविष्कार करता येतो व करावा, असा कला आणि साहित्य यातील विचार म्हणजे आधुनिक वाद आणि असा वाद अनुसरणारे कलाकार म्हणजे अतिवास्तववादी .
आपल्या चित्रांमधून दुसऱ्या महायुद्धात झालेल्या संहाराविरुद्धची कळकळ डेस्मंड यांनी प्रभावीपणे व्यक्त केली. या चित्रांचे पहिले प्रदर्शन (वयाच्या) २० व्या वर्षी स्विन्डन आर्ट सेंटरमध्ये भरवले. डेस्मंड यांनी दोन वर्षे देशसेवेसाठी सैन्यात नोकरी केली. दुस-या वर्षी आर्मी महाविद्यालयात ते चित्रकला शिकवू लागले. पुढे बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी प्राणीशास्त्र या विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉक्टरेट पदवीसाठी नाव नोंदवले. १९५४ मध्ये त्यांनी ‘टेन-स्पाइन्ड स्टिकलबॅक’ (Pygosteus Pungitius) या नदीत सापडणा-या माशाच्या प्रजनन वर्तणुकीचा अभ्यास करून डॉक्टरेट मिळवली. तसेच त्यांनी ‘पक्ष्यांमधील प्रजनन वर्तन’ या विषयावर प्रबंध सादर करून डी. फिल. ही पदवी प्राप्त केली.
प्राण्यांचे नैसर्गिक वर्तन डेस्मंड मॉरिस यांच्या अभ्यासाचे आणि आवडीचे क्षेत्र. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास मॉरिस यांनी प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहूनच केला. प्राण्यांचे वर्तन त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहूनच अभ्यासायला हवे असे ते म्हणत. ते शक्य नसेल तर प्रयोगशाळेत त्या प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवासासारखे वातावरण निर्माण करायला हवे. त्यांनी प्राणी वर्तनासंबंधी केलेल्या अभ्यासानंतर प्राण्यांच्या वर्तन अभ्यासास नवी दिशा व दृष्टी मिळाली.
१९५६ मध्ये मॉरिस झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनच्या दूरदर्शन आणि चित्रफिती या विभागात रुजू झाले. या ठिकाणी त्यांनी प्राण्यांच्या वर्तनावर आधारित कार्यक्रम लिहिले आणि प्रसारित केले. त्यानंतर त्यांनी बी. बी. सी. साठी ‘झू टाईम’, ‘लाईफ इन दि अॅनिमल वर्ल्ड’, ‘अॅनिमल रोड शो अॅण्ड अॅनिमल कन्ट्री’ अशा शीर्षकांखाली जवळपास ८००-९०० कार्यक्रम केले.
डेस्मंड मॉरिस यांनी वयाच्या ३८ व्या वर्षांपर्यंत प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला व नंतर माणसाचा नैसर्गिक प्राणी म्हणून अभ्यास केला. मानव म्हणजे प्राण्यांचीच एक जात आहे असा विचार ‘दि नेकेड अेप’ (केस गळालेला कपि म्हणजे माणूस) या पुस्तकातून मांडला. एकूण २३ भाषांमध्ये या पुस्तकाची भाषांतरे झालेली आहेत. ‘अॅनिमल वॉचिंग’ व ‘मॅन वॉचिंग’ या त्यांच्या दोन पुस्तकामधून ते जगभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या ‘मॅन वॉचिंग’ या पुस्तकानंतर मानवी देहबोलीचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरु झाला.
वयाच्या ९० व्या वर्षीदेखील डेस्मंड यांची चित्रे काढण्याची, लेखन करण्याची आणि प्रवासाची इच्छा कमी झालेली नाही. त्यांच्या मते प्रत्येक चालू वर्ष हे पुढच्या येणाऱ्या अनेक वर्षांपेक्षा जास्त महत्त्वाचे असते.
#कळीचे शब्द – प्राण्यांचे वर्तन, नैसर्गिक वातावरण, मनुष्यप्राण्याचा अभ्यास.
संदर्भ :
- Desmond Morris – Interview by Dan Schneider
- desmond-morris.com
- Desmond (John) Morris : biography
- https://brill.com/view/journals/beh/4/1/article-p233_16.xml
समीक्षक : मद्वाण्णा, मोहन