रामकृष्णन, वेंकटरमण 

(५ एप्रिल १९५२ – )

वेंकटरमण रामकृष्णन् यांचा जन्म भारतातील तामिळनाडू राज्यातील चिदम्बरम् या गावी झाला. त्यांचे आई वडील दोघेही संशोधक होते. वडील महाराजा सयाजीराव बडोदा विद्यापीठाच्या जैवरासायनिक विभागाचे प्रमुख होते तर त्यांची आई ललिता रामकृष्णन यांनी १९५९मध्ये अवघ्या १८ महिन्यात मॅकगिल विद्यापीठातून मानसशास्त्र विभागाची डॉक्टरेट मिळवली होती.

वेंकटरमण तीन वर्षांचे असताना, गुजरातमधील वडोदरा शहरात (पूर्वीचे बडोदा) रामकृष्णन कुटुंब रहायला आले. वडोदरा येथे त्यानी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. भौतिकशास्त्रात बी.एस्सी. पदवीनंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. १९७६मध्ये त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्र (थिओरॅटिकल फिजिक्स) या विषयात ओहायओ विद्यापीठातून पीएच्.डी. ही पदवी मिळवली. त्यानंतर त्यांच्या आवडीला कलाटणी मिळाली. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात दोन वर्षे जीवशास्त्राचा अभ्यास केला.

जीवविज्ञानाचा अभ्यास करताना, भौतिकशास्त्रातील न्यूट्रॉन विकिरण तंत्रज्ञानासह इतरही नवी तंत्रे जीवशास्त्राच्या अभ्यासात वापरण्याविषयीचा एक शास्त्रीय लेख त्यांच्या वाचनात आला. हा लेख वाचून वेंकटरमण अतिशय प्रभावित झाले. त्यावेळी जीवशास्त्रातील प्रगत संशोधनासाठी रायबोसोम्स या पेशीघटकाचे संशोधन होणे गरजेचे होते. त्या दृष्टीने तो लेख फार उपयुक्त होता. १९७८ पासूनच रामकृष्णन यांनी रायबोसोम्सचा अभ्यास सुरु केला होता. १९८३ ते १९९५ या काळात ते ब्रुकहेवन राष्ट्रीय प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम करत होते. त्यानंतर उटाह विद्यापीठात ते जैवरसायनशास्त्र  शिकवू लागले.

पेशीं आंतरद्रव्यजलिकेत असणा-या कणांसारख्या भागांना रायबोसोम्स म्हणतात. पेशीद्रव्यातील घटक वापरून, अमिनो आम्लांची जोडणी करून प्रथिनांचे रेणू तयार करण्याचे काम रायबोसोम्स सतत करत असतात. पेशीतील अनुवांशिक संकेतानुसार प्रथिनामध्ये रुपांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण काम रायबोसोम्स करतात. रामकृष्णन यांच्या मते, प्रथिनांमध्ये आणि प्रथिनांच्या बाहेर, असे दोन्हीकडे रायबोसोम्सना जीवशास्त्रात फार महत्त्व आहे. रायबोसोममधील ३० एस या उपघटकाच्या रेण्वीय रचनेवर ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. न्यूट्रॉन विकिरण पद्धतीने त्यानी ३० एस रायबोसोमच्या उपघटकातील प्रथिनांची रचना शोधून काढली. प्रथिनांच्या क्ष-किरण विचलनावरून संबंधित आरएनए घटकाचे स्वरूप समजले. ३० एस रायबोसोमच्या  रेण्वीय मॉडेल मध्ये १५०० आरएनए बेस जोड्या आणि २० संयुक्त प्रथिने आहेत असे त्यानी दाखवून दिले. या प्रथिनांमुळे खूणेचे अमिनो आम्ल ओळखण्यास मदत होते.

१९९९ पासून रामकृष्णन केंब्रिज विद्यापीठात रेण्वीय जीवशास्त्र विषयाच्या प्रयोगशाळेत संशोधन करत आहेत. येथेच त्यांनी रायबोसोम्सच्या अणूंची संरचना नकाशाच्या रुपात मांडली. रायबोसोम्सची अणुसंरचना आणि कार्य या संशोधनासाठी त्यांना रसायनशास्त्र विषयात थॉमस स्टिन्झ आणि अडा योनास यांच्यासह २००९ या वर्षाचे नोबेल पारितोषिक मिळाले. २०१० मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

रामकृष्णन न्यूयॉर्कमध्ये पेशीतज्ञ (सेलिस्ट) म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अमेरिकन पत्नी व्हेरा रोझेनबेरी या मुलांसाठी पुस्तके लिहितात. रामकृष्णन यांना अमेरिका देश आवडत असूनही त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन पुढील संशोधन केले. त्याबद्दल ते म्हणतात, ज्या संशोधन संस्थेचा खूपच कठीण विषयांवर संशोधन करणारी संस्था असा नावलौकीक आहे, अशा संस्थेत मला संशोधन करायचे होते, म्हणून मी केंब्रिजची विद्यापीठातील प्रगत प्रयोगशाळा संशोधनासाठी निवडली.

नोबेल पुरस्कारासंबंधीही रामकृष्णन यांची मते त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मते, कितीतरी महत्त्वाचे संशोधक नोबेल पुरस्कारापासून वंचित रहातात. विज्ञानसंशोधन हे आता प्रामुख्याने एकत्रित किंवा समूहाने करण्याचे काम झाले आहे आणि विज्ञानाकडे स्पर्धारुपाने पाहणे ही गोष्ट अयोग्य आहे. मला मिळालेल्या पारितोषिकाबद्दल मी कृतज्ञ आहे. त्यामुळे रायबोसोम्सचे महत्त्व जगभरात प्रसिद्ध झाले.रामकृष्णन रामकी या नावाने प्रसिध्द आहेत.

संदर्भ :

समीक्षक : मद्वाण्णा, मोहन